Saturday, September 17, 2011

सायकल

मला आईचा केव्हा केव्हा खूप राग येतो. म्हणजे मी छानपैकी झोपलेलो असताना ती जागं करते तेव्हा, किंवा मग 'दात घास' म्हणून पाठीशी लागते तेव्हा, किंवा 'आधी दूध पी' म्हणून ओरडत असते तेव्हा, किंवा तसलं काहीही! पण त्याहूनही जास्त राग तेव्हा येतो जेव्हा ती 'सायकल शीक.. सायकल शीक' असा जप सुरू करते. म्हणजे याऐवजी जर तिने 'ॐ नम: शिवाय' असा जप केला असता ना तर एव्हाना शंकरराव प्रसन्न होऊन प्रकटसुद्धा झाले असते!

तर आज पण एकदम तसंच झालं. म्हणजे आई दादरवरून खरेदी करून आली आणि मी समोर दिसताच लगेच जप सुरू झाला 'सायकल शीक.. सायकल शीक'. ६ अक्षरी मंत्र! बरोब्बर!! तेव्हा माझ्या डोक्यात शंकरराव खरोखर प्रकट झाले तर आई काय करेल ते सगळं चालू झालं. मग ती हात जोडून शंकररावांना म्हणेल की - आमच्या रामला सुबुद्धी वगैरे दे, किंवा आमच्या रामचा पहिला नंबर वगैरे येऊ दे, किंवा आमच्या रामला सायकल वगैरे चालवता येऊ दे, किंवा तसलं काहीही!

तर आई आमच्या समोरच येऊन बसली आणि चालू... "मला साधी भाजी आणायला एवढी पायपीट करावी लागते, त्याचं कुणालाच काही नाही. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून १ लाख वेळा तरी 'सायकल शीक' म्हणून सांगितलं असेल तुला. एव्हाना शिकला सुद्धा असतास."

तर हे ऐकून मी १ लाख म्हणजे एकावर किती शून्य - पाच की सहा, याचा विचार करत बसलो. हातात भस्मासुराचं पुस्तक होतं म्हणून. नाही तर बोटांवर लगेच मोजली पण असती पाच की सहा शून्यं ती! मी काही बोलत नाही हे बघून मग आईचा पारा की काय म्हणतात तो चढला. मग ती अजूनच चिडून बोलली, "आज साध्या कोथिंबीरीच्या जुड्यांसाठी पण मला इतक्या लांब जावं लागलं आणि तू आपला बसला आहेस राजासारखे पाय पसरून, तो भस्मासूर की फस्मासूर वाचत."

म्हणजे मी भाजी आणावी म्हणून सायकल शिकवतायत तर हे मला. म्हणूनच असणार. मग तर मी मुळीच नाही शिकणार. कारण तिथे ती मावशी मी जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा माझे गाल एक फूट तरी ओढते आणि त्याहूनही म्हणजे मला बाळ वगैरे म्हणते. हे म्हणजे तर अतीच! म्हणजे मला एक वेळ राम ऐवजी रावण(!) म्हटलं तरी चालेल. पण बाळ काय? मी मोठा झालोय आता. यावर्षीपासून तर मी शाळेत एकटासुद्धा जाणार आहे. इयत्ता ५वी 'अ'. तर मी हे आईला सांगितलं तर तिचं पुन्हा चालू झालं,

"बरोबरच आहे. तुला सायकल नाही येत ना चालवता अजून, मग लहानच आहेस तू अजून. बाळच एकदम!"

"म्हणून काय झालं? शेजारच्या कामत आजींना पण नाही येत सायकल चालवता. मी कालच विचारलं होतं. त्यांना नाही कुणी बाळ म्हणत!"

हे ऐकलं आणि मग आई जे बोलली ते बोलली. पुढला तासभर मग भजन, कीर्तन वगैरे सारं काही. आमच्या आईचं हे एक बरं की ती एकट्यानेच वाट्टेल तेवढा वेळ बोलू शकते, फक्त समोर कुणी तरी ऐकणारं असलं पाहिजे. आणि त्यातही ते ऐकणारं म्हणजे मी असलो की तर विचारूच नका. तर बर्‍याच वेळाने आई थोडी शांत होणार अशी चिन्हं दिसू लागली आणि नेमके आमचे दादोजी कोंडदेव दारात अवतरले.

"काय? इतका वेळ कुठे गड लढवत होतात?" आईचा गडगडाट सुरूच.

दादाने घरातला आणीबाणीचा प्रसंग लगेच ओळखला असणार, आणि त्यात मी भस्मासूराचं पुस्तक उलटं पकडलंय हे देखील त्याच्या चाणाक्ष चक्षूंनी पाहिलं असणार. तो प्रसंगावधान वगैरे राखून लगेच म्हणाला,

"तूच म्हणाली होतीस की आजपासून क्लासला सुट्टी आहे, तर रामला सायकल शिकव म्हणून! सायकल पंक्चर झाली होती म्हणून मग 'नटसम्राट'कडे गेलो होतो पंक्चर काढायला."

तर 'नटसम्राट' म्हणजे आमच्या शाळेजवळ 'सुंदर सायकल मार्ट' आहे ना त्याचा मालक. श्यामसुंदर. स्वच्छ, काळाकुळकुळीत. पण सुंदर! याच्याजवळ सगळ्या प्रकारचे पाने आहेत. त्यामुळे हा कुठलाही नट अगदी दोन सेकंदात टाइट करून सोडतो. तर म्हणून यास 'नट'सम्राट असा किताब मिळालाय. हे मला आमच्या वर्गातल्या मुकुंदाने सांगितलं होतं एकदा.

तर दादाचं बोलणं ऐकलं आणि त्याबरोबर आईचा पट्टा परत सुरू झाला. मग दादोजी कॊंडदेव क्रूरपणे हसून आत गेले. मला असला राग आला ना त्याचा. असं वाटलं की मी भस्मासूर असायला हवं होतं. मग मी सगळ्यात आधी त्या डबलदांडीच्या सायकलवर हात ठेवून ती भस्म करून टाकली असती आणि मग आमच्या दादोजींच्या मागे लागून त्यांना पळता भुई थोडी केली असती. मग गेले असते ते कैलास पर्वतावर लपायला. ते कैलास पर्वतावर लपणार, इतक्यातच आईने माझ्या हातातलं पुस्तक काढून घेतलं आणि जवळजवळ किंचाळलीच-

"ऊठ आधी या खुर्चीवरून. एक अक्षर ऐकत नाहीस. श्रीरंगा, इथे ये आणि घेऊन जा आधी याला खाली. बघतेच कसा शिकत नाही तो सायकल."

"पण माझे पाय पोचत नाहीत गं जमिनीवर." मी अगदी कळवळून बोललो.

"मी आहे की मागे धरायला." दादोजींनी मध्ये चोच खुपसलीच.

"पण तरी पण.. मला.."

"पण नाही नि बीण नाही. जा रे याला घेऊन खाली. पडला तरी चालेल, पण सायकल आली पाहिजे. जा आधी."

मग काय, सपशेल शरणागती! शेवटी आम्हांला जावंच लागलं. आमच्या चाळीच्या बाजूलाच खूप मोठी जागा आहे. दुपारी गाड्या वगैरे नसतात ना म्हणून मोकळी असते ती. तिथे आम्ही येऊन पोचलो. मग दादोजींनी आम्हांस उपदेश करायला सुरूवात केली.

"हे बघ हा डावीकडचा ब्रेक आहे ना तो मागच्या चाकाचा आणि उजवीकडचा आहे ना तो पुढच्या चाकाचा."

आमचे दादोजी वेडपटच आहेत. सायकलला दोनच तर चाकं असतात! मग मला एकदम सायकल विकत आणली होती ना तो दिवस आठवला. सर्वात जास्त उड्या मीच मारल्या होत्या त्या दिवशी. पण त्यानंतर सायकलची घंटी कशी वाजवायची ते सोडून बाकी काहीच शिकलो नाही मी. मला सगळे 'ढ' म्हणतात ते उगीच नाही.

"लक्ष कुठंय तुझं? हे बघ तुझे पाय नाही पोचत ना सीटवरून, तर कैचीने चालवायला शीक आधी. हे बघ, उजवा पाय या दांडीतून आत घुसवून त्या पॅडलवर ठेवायचा आणि डावा पाय या पॅडलवर. मग अर्धा अर्धा पॅडल मारत जायचं."

"मला नाही जमणार हे असलं. मी सीटवर बसूनच चालवणार."

"तर तर औरंगजेबच ना तू! म्हणे सीटवर बसूनच चालवणार."

"मी नाही चालवत जा मग. मी सांगेन आईला सगळं."

"घे रड्या. बस सीटवर. पण पॅडल हळू मार. समजलं?"

मला वाटलेलं दादोजी नाही म्हणतील. पण कसलं काय? आता सुटका नाही. का नाही?

मग बसलोच मी सायकलवर. श्रीशंकराचं नाव घेतलं आणि मारला पॅडल. दादोजींना सायकल धरून धावावं लागत होतं माझ्यासोबत, हेच काय त्यातल्या त्यात बरं. मग दादोजी कोंडदेवांच्या अगणित सूचना- 'दोन्ही हॅंडल घट्ट धर.' 'हात ब्रेकवर ठेव.' 'समोर बघून चालव.' 'कुणी समोर आलं तर घंटी वाजव.' 'कधी पण मागचा ब्रेक दाबायचा.' वगैरे वगैरे. हे असं बराच वेळ. मग आम्ही घरी आलो आणि आईने बनवलेला गरम गरम शिरा फस्त केला. मग दुसरे दिवशीपासून मी स्वत:च दादोजींसोबत जाऊ लागलो. हे असं शनिवारपर्यंत.

मग रविवारी दुपारी जेवून वगैरे झाल्यावर, दादोजी आम्हाला डबलसीट शाळेच्या ग्राऊंडवर घेऊन आले आणि दिली हातात सायकल. मी आपला नेहमीसारखा सीटवर बसलो. दादोजी मागे पकडून. मग हळू हळू पॅडल मारत सायकल पुढे नेली. "आणखी जोरात मार." दादूजी मागून ओरडत होते. मग मी अजून जोरात पॅडल मारून पुढे गेलो. आणखी. आणखी.

थोड्या वेळाने दादोजींचा आवाजच नाहीसा झाला. म्हणून आम्ही मागे वळून बघितलं तर काय, दादोजी त्या टोकाला. म्हणजे मी स्वत: सायकल चालवली तर एवढी! मग मला जी मजा आली ती आली. आता मी छाती ठोकून आईला सांगणार आहे, मला येते आता सायकल चालवता. मी मोठा झालो आता. पण भाजी आणायला नाही जाणार मी मुळीच. मी शाळेतसुद्धा घेऊन जाईन आता सायकल. मग 'विक्रमवीर चिंटू'सारखी मी पण ३ दिवस ३ रात्र न थांबता सायकल चालवू एक दिवस. मग बघतोच कोण मला 'ढ' म्हणतं ते.

माझ्या डोक्यात असं सगळं चालू असताना अचानक काय झालं कुणास ठाऊक. दोन्ही बाजूंनी आवाज करत जाणारा वारा एकदम गप्पच झाला. आणि माझ्या डोळ्यांसमोर नुसता अंधार अंधार. नाकातोंडाला, शर्टाला, पॅंटला धूळ, माती लागलेली. कोपरातून नि गुडघ्यांतून रक्त यायला लागलेलं. मग तशाच हातांनी डोळे चोळत चोळत मी भर मैदानातच मांडी घालून बसलो. इतक्यात दादोजी माझ्यापर्यंत येऊन पोचले आणि अक्राळ विक्राळ हसत मला उपदेश करू लागले, "हा तुझा शेवटचा धडा! सायकल चालवताना इकडे तिकडे नाही बघायचं!"

वा रे वा! काय पण उपदेशाची वेळ! म्हणजे आपला सख्खा भाऊ इथे भर मैदानात धारातीर्थी पडलाय आणि हे हसतायत. त्याचं ते भयानक हसणं बघून तर मला अजूनच चिडायला झालं आणि रडायला पण आलं. तर हा परत सुरूच- "चल रे रडया. काही नाही झालंय. नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय कुणी पोहायला शिकतं का? तसंच कोपर, गुडघे फुटल्याशिवाय कुणाला सायकल नाही येत चालवता. समजलं. पुरे आता."

हे म्हणजे अतीच होतं. शेवटी मी स्वत:च उठलो. शर्ट नि पॅंट धुळीने माखलेली. ती झाडली. मग डोळे पुसले. तर दादोजींनी मलाच परत बसवलं सायकलवर. मग काय दात-ओठ-जीभ वगैरे सगळं खाऊन बसलो नि सायकल चालवत चालवत मैदानाच्या तोंडाशी नेली. मग दादोजी धावत आले आणि म्हणाले, "थांब. रस्त्यावरून मीच नेतो." मग मी चिडून त्याला म्हटलं, "मी आईला तुझं नाव सांगणार आहे बघ."

तर त्याने उजवा हात हवेत उडवून वगैरे म्हटलं, "सांग जा. आईला माहिती आहे माझं नाव. आम्ही नाही घाबरत तुला. तैमूरलंग कुठचा!"

मग तर मला अजूनच रडू आलं. मग शेवटी दादोजी नि मी डबलसीट घरी आलो. आज रविवार असूनपण घरी कुणीच नव्हतं. आई-बाबा दोघंही बाहेर. मग तर मला अजूनच रडू आलं. मग तसाच सोफ्यावर पडलो आणि जे झोपलो ते झोपलोच. मग रात्री आईने मला जवळ बोलावलं. मग औषध लावलं. मग मी आधी दादोजींबद्दल सांगितलं. तो किती दुष्ट आहे ते सगळं सविस्तर सांगितलं. तर आईने नुसतं 'हं' म्हटलं. मग ती म्हणाली, "हात-पाय दुखत असतील ना? ये मी तेल लावून देते."

मग मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसलो. एकदम थकल्यासारखं वाटत होतं. मग मी आईला म्हटलं, "आई, आज मी मोठा झालो. मला सायकल चालवता येते आता."

"हो बरं. पाहिलं मी आणि बाबांनी. एका ढ मुलाला जमली बुवा सायकल चालवायला."

"म्हणजे? तुम्ही कसं पाहिलंत?"

"म्हणजे तू पडलास ना तेव्हा आम्ही समोरच बसलो होतो, मैदानाच्या कठड्यावर. 'ढ' कुठचा!"

मी मनातल्या मनात १५१ वेळा तरी जीभ चावली असेल. मग आठवलं, मी रडताना समोरच निळी साडी नेसून होती ना ती आईच होती नि सफेद शर्ट घालून होते ना ते बाबा. ते हातसुद्धा दाखवत होते दोघे. आयला, आम्ही 'ढ'च १ नंबरचे. म्हणजे शंभर 'ढ' जर एकत्र आले ना, तर जो मोठ्ठा ढ बनेल ना तोच असणार मी. मग मी काहीच बोललो नाही. मग आपोआपच डोळा लागला. मग डोळ्यांसमोर सगळं येऊन उभं राहिलं. आई, बाबा, दादोजी, सायकल आणि त्यांच्याभोवती एक मोठ्ठा 'ढ'.

[http://www.manogat.com/diwali/2010/node/25.html इथेही आहे]

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!