Friday, July 20, 2012

मार्क दे याचे तरी

त्रास नाही कोणताही मार्क दे याचे तरी
वृद्ध झालो, भार नाही मार्क दे याचे तरी

सोडवूनी हात तू गेलीस तेव्हा, हासुनी
मी उडवली फक्त बाही मार्क दे याचे तरी

तू दिलेल्या सोडचिठ्ठीने असा धक्का दिला
मी पुन्हा झालो प्रवाही मार्क दे याचे तरी

सांजवारा येरझारा कोंडमारा हा तरी
बोललो नाहीच काही मार्क दे याचे तरी

भेटतो मी, हासतो मी, भोगतो सारे ऋतू
श्वास घेतो बारमाही मार्क दे याचे तरी

शक्यतो करणार नाही आत्महत्या मी कधी
जा तुला देतोय ग्वाही मार्क दे याचे तरी

पाहिजे आता कराया एकमेकांना क्षमा
माफ केले मी मलाही मार्क दे याचे तरी

(११ मे, २०१२)

1 comments:

विक्रम वालावलकर. said...

नेहेमीप्रमाणेच....Class!

"सांजवारा येरझारा कोंडमारा हा तरी
बोललो नाहीच काही मार्क दे याचे तरी

भेटतो मी, हासतो मी, भोगतो सारे ऋतू
श्वास घेतो बारमाही मार्क दे याचे तरी

शक्यतो करणार नाही आत्महत्या मी कधी
जा तुला देतोय ग्वाही मार्क दे याचे तरी"

मस्तच...

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!