Saturday, July 25, 2015

काहिच नाही कमी परंतू...

छान चालले असते सगळे
झालो असतो स्थिरस्थावरही
दिनक्रमही ठरलेला असतो
ठरले असते सगळे काही
सगळ्यानंतर...

आठवड्याला एक सिनेमा,
नाटकही एखादे बघतो
हसतो, रडतो, फिरतो, गातो
मस्त रहातो, मजेत जगतो-
तसे निरंतर...

तरी एकट्या सायंकाळी
खिडकीपाशी निवांत बसता
पापण्यांत चुरचुरते किंचित
रेडीओवरी ऐकत असता
बेगम अख्तर...


खिडकीमधली तुळसही तेव्हा
उदासवाणी, मलूल दिसते
काहिच नाही कमी परंतू
सगळे सगळे सगळे असते
तू असतिस तर...  

२०१५

0 comments:

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!