Saturday, May 28, 2016

पूर्वी होती शुद्ध केवढी हवा वगैरे...

पूर्वी होती शुद्ध केवढी हवा वगैरे
श्वास रोजचा जाणवायचा नवा वगैरे

दुखरी बाजू समोर येइल तेव्हा येइल
तोवर कसला नकोच बागुलबुवा वगैरे

नात्यांमध्ये कुठून येइल ओलावा या
हवेतसुद्धा नाही जर गारवा वगैरे

जमिनीवरती धरणे बांधुन पुष्कळ झाली
खोद एकदा हृदयातुन कालवा वगैरे

म्हणूनही ती सोडून गेली असेल बहुधा
आवडायचा त्याला पक्ष्यांचा थवा वगैरे

जाता जाता आपल्यात जे घडले त्याचा
कधी वाटतो किळस, तर कधी दुवा वगैरे

कुणाकुणाला रोज नवनवे सूर लागती
कुणास पुरतो जीवनभर मारवा वगैरे


२७ मे, २०१६.

2 comments:

प्रताप said...

मस्तच आहे बॉ,

तुझी ओळख पूर्ण अजून झाली नाही
घाई कुठे तुला मी भेटलो असेल परवा वगैरे

प्रताप said...

मस्तच आहे बॉ,

तुझी ओळख पूर्ण अजून झाली नाही
घाई कुठे तुला मी भेटलो असेल परवा वगैरे

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!