Saturday, November 18, 2017

स्ट्रिंजर

डोंबिवलीत दिवस लवकर सुरु होतो. पूर्वी सकाळ झाली की ५ मिनिटं अंथरुणावर उलटंपालटं होण्यात जायची. आता डोळे उघडल्यावर पहिली ५ मिनिटं मोबाईल चेक करण्यात जातात सवयीनुसार मिलिंदने डोळे चोळत फोन हातात घेतला. watsappवर बोट ठेवलं, तर स्टेटस अपडेटमध्ये निशीचं नाव. आपल्या तीन वर्षांच्या पोरासोबतचा फोटो टाकलेला तिने. न्यूयॉर्कमधला. ५ वर्षं झाली हिच्याशी बोलून. ४ वर्षांपूर्वी तिने मेल पण टाकलेला. कसा आहेस वगैरे म्हणून. आणि उगाच नको नको त्या चौकश्या. अमेरिकेत कसं सगळं छान, निवांत असतं त्याचं आयघालं वर्णन. मिलिंदने मेलला उत्तर लिहिलं आणि तसंच ड्राफ्ट मध्ये राहू दिलं होतं. जाऊ देत पण. I hate America. I hate her. पोरगं अगदी तिच्यावर गेलंय. नाक, डोळे, भुवया. I hate him too. असं मनातल्या मनात तो पुटपुटला.


watsapp चा हा एक नवीन वैताग आहे. भलत्या वेळेला भलत्या माणसांची नको तितकी आठवण करून देतं हे.ऑफिसचा watsapp चा ग्रुप नसता तर डिलीटच केलं असतं. पण कामाचं बोलतात अधूनमधून म्हणून डिलीट नाही करता येत. बाकी अख्खा वेळ फालतुगिरीच चालते त्यावर. वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, आई-बाप दिवसांच्या शुभेच्छा, महिला दिनाच्या शुभेच्छा वगैरे. चुत्येगिरी सगळी. नुसते एकमेकांचे बोचे खाजवणं. जाऊ देत पण. सकाळी सकाळी हे असले विचार नको करायला. अजून अख्खा दिवस पडलाय. असा विचार करून तो अंथरुणातून उठला. तोंड धुतलं. प्रेशर आलं नव्हतं म्हणून त्याने म्हटलं आधी अंघोळ उरकून घेऊ. मग आंघोळीचं पाणी तापवत ठेवलं आणि आरामखुर्चीत येऊन टी.व्ही. चालू केला. हा त्याचा रोजचा कार्यक्रम. सकाळी सकाळी इंद्रिय कुरवाळत बातम्या बघणे किंवा वर्तमानपत्र वाचत बसणे. ही सवय मुंबईत आल्यापासूनची. पुण्यातल्या किंवा गावाकडच्या थंडीत तसंही ते अशक्य होतं. तो दोन वृत्तपत्रं आणि एक वाहिनी यांची कामं घ्यायचा.

तर आधी आपल्याच वाहिनीवर काय चाललंय हे बघायला त्याने चॅनेल लावला. तर आदल्या दिवशीचं रिपीट टेलिकास्ट. विषय काय तर अमुक अमुक खासदाराच्या पोराच्या लग्नात तमुक कोटी खर्च केला. हे योग्य की अयोग्य? च्यायला. पॅनेलवर पुण्यात दोन फ्लॅट असलेले कम्युनिस्ट कार्यकर्ते. यांची पोरं अमेरिकेत शिकतात हे सांगताना भारतात उच्च शिक्षणाची कशी दुर्दशा झालीये, अमेरिकेत शिकणं कसं गरजेचं होतं आणि त्यांचा संपूर्ण खर्च कसा कुठल्या तरी स्कॉलरशिपद्वारे होतोय हे लोकांना सांगत फिरणारे हे गृहस्थ. अंगावर येणारं म्हातारपण घालवायला कुठल्याशा ngo त पार्ट टाईम काम करून जगाला फुल टाईम उपदेश करणारे एक विचारवंत. हे अजून भयंकर. स्वत:ला तत्वज्ञानी म्हणवून घेणारे. यांचं तत्वज्ञान म्हणजे सगळं निरर्थक आहे. कशाला काहीच अर्थ नाही वगैरे. सतत आंबलेला चेहरा करून आयुष्य कसं दु:खंमय आहे हे सांगत सुटलेले हे लोक. मग दोन पक्षांचे नेहमीचेच प्रवक्ते. त्यातला एक सहा महिन्यांपूर्वीच तिसऱ्याच पक्षातून उडी मारून आलेला आणि पवित्र करवून घेतलेला. आणि या थोर लोकांच्यात लावालावी करणारा हा शिंदे. च्यायला या शिंद्यानेच गेल्या आठवड्यात स्टाफला पार्टी दिलेली. कुठल्या तरी मोठ्याशा हॉटेलमध्ये. पर प्लेट १००० रु. होतं तिकडे. आणि हे फुकटगांड लोक आता दुष्काळ, कुपोषण, शेतकरी आत्महत्या वगैरेच्या चर्चा झाडणार. आपल्या वाहिनीच्या मालकाकडे किती गाड्या आहेत हे दाखवतील काय हे भोसडीचे. जाऊ देत. आपण पण त्याच ओळीतले. स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांपैकी एक. जाऊ देत. असं मनातल्या मनात बोलून त्याने वर्तमानपत्रं हातात घेतली.


प्रत्येक वर्तमानपत्रातलं संपादकीय आणि प्रतिक्रिया झरझर वाचून काढल्या. आज काही विशेष नाही असं म्हणून तो अंघोळीला शिरला. सवयीनुसार १२-१५ मिनिटांत सगळं उरकलं. चेंबुरला १० पर्यंत पोचायचं म्हणजे ९ च्या आधी निघायला हवं म्हणून घाईघाईने सगळं आवरलं आणि लॅपटॉपची बॅग काखेत अडकवून, पायात चप्पल सरकवून तो वेगात घराबाहेर पडला.

जिन्याच्या जवळ पोचताच नकळत त्याचा वेग कमी झाला. जिन्याला लागून असलेल्या घरात मयेकर राहायची. सोबत तिचा मुलगा. ४थीला असलेला. तिचा ४ वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला. LIC त कामाला होती ती. दिसायला अगदी आकर्षक. चेहऱ्याने आणि अंगानेही. त्यात एकटी राहणारी बाई म्हणून आणखीनच आकर्षक. तशी ४०शीच्या आतलीच. एकदा असंच बाल्कनीतून जाताना मिलिंदला दाराच्या फटीतून तिचा अर्धा क्लिव्हेज दिसला होता. त्यानंतर तसं परत कधी झालं नसलं तरी तिच्या दारासमोरून जाताना अपोआप घरभर नजर फिरायची त्याची. आतासुद्धा त्याने तशीच नजर फिरवली आणि पायऱ्या उतरत खाली येऊन पोहोचला. मग दर वेळेप्रमाणे त्याला स्वत:चीच लाज वाटू लागली.ठरवूनसुद्धा ही गोष्ट आपण थांबवू शकत नाही याची त्याला प्रचंड चीड आली.


मग स्टेशनपर्यंत तेच सगळं डोक्यात. मग एम.ए.ला असताना वाचलेली एक गोष्ट त्याला आठवली. त्यात चंपा नावाच्या रांडेला इंद्र येऊन भेटतो आणि म्हणतो – Impotence is wonderful! A blessing! For the first time I feel free from anxiety. I can now see you as a human being, not as a creature with so many holes. As if you were a golf course! I enjoy this state of being. No more the anxiety of having to seduce a woman, or of not being able to. My wife can no more complain that I regard her only as a sexual object. Isn’t that wonderful?

च्यायला म्हणजे बाईकडे माणूस म्हणून बघणं इंद्राला पण इंपोटंट झाल्यावरच शक्य झालं तर! कुठल्याही गोष्टीतून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढण्याची पत्रकारांची सवय आपल्यात पूर्णपणे उतरलीये याचा त्याला अजूनच राग आला. एव्हाना तो स्टेशनला लागून असलेल्या ब्रिजपर्यंत येऊन पोहोचला. स्टेशनरोडवरच एक फ्रेम्सचं दुकान होतं. त्यात गणपती, विष्णू आणि स्वामी समर्थ यांच्या फ्रेम्सच्या मधोमध आंबेडकरांचा फोटो. खालच्या ओळीत आणखी गर्दी. मग प्लॅटफॉर्मवर आणखी जास्त गर्दी. ती बघून मग त्याचा उरला सुरला उत्साहसुद्धा नाहीसा झाला.

अंबरनाथवरून येणारी ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. लोक मारामाऱ्या करत ट्रेनमध्ये चढू लागले. एक ४०शीचा माणूस हातातली बॅग सावरत, धावत ट्रेनपाशी आला आणि धडपडून पडला. त्याबरोबर आजूबाजूंच्या लोकांचा एकच गलका. पण तो माणूस लगेच उठला, शर्ट झाडत पुन्हा जोमाने ट्रेनमध्ये घुसला आणि ट्रेन सुटली. बाजूने जाणारा एक म्हातारा बडबडू लागला – ‘क्या चुतिया आदमी है | खुद की जान की कीमत भी नही सालेको.’

जान की कीमत. च्यायला. इतक्या प्रचंड गर्दीत एखाद्या जिवाची किंमत ती काय? गेल्या महिन्यात एक पोरगं ट्रेनखाली आलं होतं भांडुपला. २१-२२ वर्षांचा असणार. आत्महत्येचं हे वय तसं पर्फेक्टच. तर मग त्यावर चर्चा सुरु डब्यात. बाजूला असलेल्या माणसाने कुर्ल्यापर्यंत ऐकलं. मग कानात हेडफोन घालून मोबाईलवर कुठला तरी पिक्चर बघत बसला. आपण पत्रकार वगैरे असल्याने दादर येईपर्यंत ऐकत राहिलो इतकंच. जान की कीमत. च्यायला. मागे एका बातमीत वाचलेलं की जगभरात सर्वात जास्त आत्महत्या या २१-३० वयोगटातील माणसांच्या होतात. ऐन उमेदीचं वय. या वयातच इतकी माणसं इतकी निराश का व्हावीत? हेच वय कळू लागण्याचं असतं म्हणून तर नव्हे? जाऊ देत. आपण आता तिशी पार केली याचं मिलिंदला एकदम हायसं वाटलं. पण तरी केव्हा केव्हा विचार येतोच. समोरून दुसरी ट्रेन येताना बघून मिलिंद प्लॅटफॉर्मच्या टोकाशी गेला. जावं का थेट रुळावर? १०-२० सेकंदांचा प्रश्नये फक्त. प्ले. पॅाझ. स्टॅाप! जाऊ देत. आज नको. चेंबुरला अपाँइटमेंट आहे त्या कांबळेची. दिलेली वेळ पाळायला हवी. जीव काय केव्हाही देता येईल, असं मनाशी ठरवून तो रेटून ट्रेनमध्ये शिरला.

सकाळी सकाळी तरी थोडं पॅाझिटिव्ह राहिलं पाहिजे. म्हणून हा विषय सोडून तो शेजारच्या माणसांचं बोलणं ऐकायला लागला. दोघे ५०शी उलटलेले दिसत होते.

पहिला- जगात चांगली माणसं वाईट माणसांपेक्षा जास्त आहेत.
दुसरा- अगदी. अगदी. म्हणूनच जग चाललंय.

‘बुलशीट!’ मिलिंदने मनातल्या मनात जोराने म्हटलं. चांगली माणसं जास्तयेत म्हणे. चांगली माणसं म्हणजे नक्की काय? फक्त वैयक्तिक चांगुलपणाला चांगलं म्हणावं का? किंवा का म्हणावं? वैयक्तिक चांगुलपणा तर जगातल्या ९९% लोकांकडे असतो. एखादा अट्टल गुन्हेगारसुद्धा आपल्या ओळखीपाळखीच्या माणसांशी चांगलाच वागतो. ऑफिसातला शरदसुद्धा त्याच्या नेहमीच्या रांडेला वैयक्तिक चांगुलपणापोटी १०० रुपये जास्त देतो. या सगळ्याला चांगुलपणा म्हणावं का? यापेक्षा वाईट असलेलं काय वाईट? बरं झालं आठवलं आज ऑफिसमध्ये शरदला पण भेटायचंय. तो काहीतरी स्टोरी आहे सांगत होता. बोललं पाहिजे त्याच्याशी. तितकंच थोडं आणखीन काम मिळेल.

विचार थांबल्यावर इतका वेळ आपण उभे आहोत याची त्याला जाणीव झाली. सुदैवाने ठाण्याला २-४ माणसं उठली आणि बसायला जागा मिळाली. ४थ्य सीटवर. यापेक्षा जास्त तो मुळात एक्स्पेक्टच करायचा नाही. तोही मग सीटबरोबर ८० अंशांच्या कोनात, व्यवस्थित कुले अॅडजस्ट करून बसला. मुंबईत आल्यावर १ महिन्यातच त्याने ही क्लृप्ती शोधली होती. सुरुवातीला एक कुला सीटवर आणि दुसरा अधांतरी असं बसायचा तो. त्यामुळे मग एक कुला भयंकर दुखत राहायचा दिवसभर. त्यानंतर ८० अंशांच्या कोनात सीटवर दोन्ही कुल्यांचा अर्धा भाग टेकवून तो बसायला लागला. मग कुले दुखणं कमी झालं. त्याला बसल्या बसल्या स्वत:चं कौतुक वाटू लागलं. मग उगाच कोलटकरांची एक कविता आठवली –

प्रत्येकाला अमुक इतके गाल असायला पाहिजेत
असं कुठाय
किंवा इतकेच कुले पाहिजेत
असंही नाही


कोलटकर याबाबतीत पूर्ण चुकले. उपनगरात राहणाऱ्या, ४थ्या सीटवरून प्रवास करणाऱ्या माणसांचे कुले दणकट असायलाच हवेत. कोलटकर बहुधा फर्स्ट क्लासने प्रवास करत असणार! च्यायला काही करायला नसलं की आपण काहीही विचार करत सुटतो हे त्याच्या लक्षात आलं. इतक्यात कुर्ला आलं. गर्दीत मिसळून तो पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरला. मग पुन्हा ट्रेनने चेंबुरला.

स्टेशनवरून उतरल्यावर लगेच तिसऱ्या गल्लीत कांबळे राहायचा. त्याने आंबेडकर नगर मधल्या काही पोरांना घेऊन एक संस्था उभी केली होती. ३ वर्षांपूर्वी. गेल्या वर्षी सफाई कामगारांचा मोर्चा कव्हर करत असताना मिलिंद आणि त्याची ओळख झालेली. बोलणं एकदम तडफदार. मनस्वी. तो घरात शिरला. कांबळेच्या पोराने पाणी आणून दिलं. वर्षभरात कांबळेचं घर एकदम भरल्यासारखं दिसत होतं. दारात बुलेट उभी होती. त्याला एकदम पिंग आठवला - टू बी रिच इज ग्लोरीअस! जाऊ देत पण आपल्याला काय. तर काही तरी बोलायचं म्हणून त्याने विचारलं,” काय मग कितवीला आहे छोटा?”

त्यावर कांबळेचं उत्तर-“११वीला आहे. सायन्सला. १०वीला ८२% होते. मग म्हटलं घे सायन्स. त्याला आर्ट्सला जायचं होतं. पण म्हटलं आर्ट्सला जाऊन कोणाचं भलं झालंय?”

मिलिंदने उगाच हसल्यासारखं केलं. च्यायला आर्ट्स घेऊन कोणाचं भलं झालंय- हे वाक्य पिडणार आता आपल्याला. आता पासून परत कुणाला असले फालतू प्रश्न विचारायचे नाहीत हे त्याने मनातल्या मनात ठरवून टाकलं.

कांबळे बोलतच होता – "मी सांगतो मिलिंदजी, गेल्या वर्षी जे आंदोलन केलं ते फुकट गेलं बघा. सगळ्या मागण्या तशाच्या तशा आहेत अजून. च्यायला हे स्वच्छता अभियान म्हणून बोंबलतात ते काय फक्त झाडू घेऊन फोटो काढण्यापुरता काय? एवढं असेल तर द्या की सफाई कामगारांना कायम नोकऱ्या. लागू करा तुमचे वेतन आयोग. सेफ्टी स्टँडर्डस वाढवा की. वाढवा बजेट त्याचं. मग आम्हीपण येतो बोंबलायला. काय मी काय चुकीचं बोलतो काय?”

कांबळेची ही सवय मिलिंदला माहित होती. मी काय चुकीचं बोलतो काय? असं वाक्याच्या शेवटी बोलायची. त्याला उत्तर अपेक्षित नसायचं.

मग मिलिंदने विचारलं,” किती वाजता झालं? दोघेही ऑन द स्पॉट गेले का? डिटेल्स घेतलेयत का तुम्ही?” कांबळेने बरीच माहिती दिली आणि त्याबरोबरच पाठपोठ लिहून काढलेले दोन कागदसुद्धा. ते बघून मिलिंद खुश झाला. आता यातच इकडे तिकडे एडिट केलं की झालं. तेवढ्यात कांबळेने विचारलं, “त्या दोघांच्या घरी जायचं का मग? इथे जवळच झोपडी आहेत त्यांची.”

मग त्याला जावंच लागलं. ड्रेनेजच्या पाईपमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू. च्यायला, हे कसलं डेंजर वाटतंय. हे असलं काही तरी प्रत्यक्षात घडताना पाहिलं की जगण्याची जी काही उरली सुरली इच्छा आहे तीही निघून जाते. एका गल्लीच्या तोंडाशी असलेल्या घरात कांबळे शिरला. त्याच्या मागे मिलिंद. घर नव्हतंच ते. दरवाजापासून समोरच्या भिंतीपर्यंत जायला तीन ढेंगा पुरल्या असत्या. कोपऱ्यात फोटो. हा गेल्या वर्षी मोर्च्यात होता. कांबळेच्या बरोबर मागे. कांबळे जोरजोरात घोषणा द्यायचा- होश में आके बात करो

मग हा सगळ्यांना इशारा करून जोरात- बात करो, बात करो.

बात तो तुमको करनी होगी
(करनी होगी, करनी होगी)
न्याय तो तुमको देना होगा
नही देंगे तो कैसे लेंगे
लढ के लेंगे, लढ के लेंगे –

न्याय! बोचा! न्याय आणि बोचा या फार गुळगुळीत गोष्टी आहेत. जनरली वजन जास्त असणाऱ्याकडे त्या जास्त प्रमाणात असतात. जाऊ दे पण. आपण फार फार तर लिहू शकतो. मग काय होणार? वर्तमानपत्रातल्या ८०-८५ कॉलमपैकी आतल्या कुठल्या तरी पानावरचा एक कॉलम त्याला अलॉट होणार. मग ते प्रिंट होणार. वाचणारे त्याला इग्नोअर करणार. मग पुढल्या दिवशी ही बातमी शिळी होणार. मग पुन्हा आपण एक-दोन वर्षांनी असाच कुठला तरी रिपोर्ट काढायला कोणाच्या तरी घरी जाणार. च्यायला. पण अशी माणसं मरत राहायला हवीत. तरच आपल्याला न्यूज मिळत राहतील आणि पैसेसुद्धा. जाऊ देत. आपण सुद्धा इग्नोअर करायला शिकलं पाहिजे. इग्नोअरन्स इज स्ट्रेन्थ!

शेवटी १० मिनिटांतच काम आहे सांगून मिलिंद घराबाहेर पडला. कांबळेचा निरोप घेतला आणि थेट स्टेशनवर. तिथून कुर्ला. मग करीरोड. तिकडून चालत चालत लोअर परेलला. ऑफिसमध्ये.

ऑफिसात शिरला आणि समोर बर्वे. हे ज्येष्ठ पत्रकार. आता रिटायर झालेले. पण अधून मधून यायचे कशाला न कशाला. म्हातारी माणसं जशी थोडीफार बडबडत राहतात ते सोडलं तर तसे निरुपद्रवीच. यांची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली. ४ वर्षांपूर्वी बर्वे काकू गेल्या तेव्हा ती भारतात आलेली. तेव्हा बर्वे म्हणलेले की आता मी गेल्यावरच येतील बहुतेक ही. एरवी प्रसन्न, आनंदी दिसणाऱ्या बर्वेकाकांचा इतका कडवट स्वर मिलिंदने त्याआधी ऐकला नव्हता. कारणं वेगवेगळी असली तरी त्या दोघांचाही अमेरिकेवर मनस्वी राग होता. म्हणून मग मिलिंद आणि त्यांचं एकदम छान जुळलं. 

ते मुडात असले की जुन्या आठवणी, किस्से सांगत बसायचे.आज पण तसेच बोलू लागले,”हल्ली आवर्जून वाचावं असं एकही साप्ताहिक किंवा संपादकीय सापडत नाही. चार ओळी वाचल्या की कळून येतं हा लेखक हिंदुत्ववादी आहे की समाजवादी की साम्यवादी. जो तो फक्त प्रचारकाचं काम करत सुटलेला. यु नो काय प्रॉब्लेम आहे, पत्रकारिता हा एक सार्वजनिक व्यवसाय आहे, खासगी नाही हेच कळत नाही या लोकांना. यु नो मिलिंद, ‘माणूस’चा अंक कधी येईल याची अक्षरश: आम्ही वाट बघायचो. आता माजगावकर हिंदुत्ववादी माणूस. पण ‘माणूस’ने चुकुनही प्रचाराचं काम केलं नाही. काय एक एक लेख असायचे. अरुण साधूंचा ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’, विजय तेंडुलकरांचं ‘रातराणी’ आणि असे किती तरी.आताच्या कुठल्याच संपादकीयांमध्ये दम नाही तसा. असो. तू सांग. काय चालूये सध्या? आता तिशी ओलांडली असशील न तू? लग्न करून टाक हं लवकर.एकट्याने वैताग येतो बघ. खास करून उतारवयात. बोलायला लागतं बघ कुणी तरी. किंवा निदान आजूबाजूला खाडखूड करत बसणारं तरी. माणसांच्यात राहतोय असं वाटायला हवं बघ माणसाला. बरं मी येतो. तू काम कर बाबा तुझं. दादरला आलास तर ये वेळ काढून घरी.”

मग निरोप वगैरे. बर्वे एकदम हळवा झाला होता. म्हातारपणात किंवा एकटी राहिल्यावर होत असावीत कदाचित माणसं.बाय द वे, हा बर्वे इतका गृहीत का धरतो की आपण म्हातारे होऊ म्हणून? आय मिन पुढल्या २५ वर्षांनंतरचं प्लानिंग वगैरे. अमुक इन्श्युरन्स, तमुक मेडिक्लेम. उतारवय म्हणे. च्यायला त्याआधीच कोणी ट्रेनच्या खाली आडवा आला तर किंवा ड्रेनेजच्या पाईपमध्ये गुदमरून मेला तर? च्यायला हा बर्वे उगाच भुंगा लावून गेला डोक्याला.

मग मिलिंद शरदच्या डेस्कवर गेला. शरद तिकडे नव्हता म्हणून बाजूच्या डेस्कवरच्या नीरजाला त्याने विचारलं. ती म्हणाली येईलच इतक्यात, म्हणून तिथेच बसला.

नीरजा काही तरी टाईप करत होती कम्प्युटरवर. त्याची नजर कीबोर्डवरच्या तिच्या निमुळत्या बोटांवर गेली. मग भरलेल्या दंडावर. मग अजून वर पाहिलं तर तिच्या गालापर्यंत रुळणारे मोरपिसाचे कानातले. निशी घालायची असले कानातले. सेम टू सेम. मिलिंदने तिच्या कानातल्या मोरपिसावर कविताही केलेली. च्यायला, मोरपीसावर कविता वगैरे. त्या आठवणीने त्याला मळमळून आलं. मग त्याने मनातल्या मनात निरजाला शिवी घातली. भोसडीची, हिला आजच हे कानातले घालून यायचे होते काय?

इतक्यात शरद आला. नीरजाला म्हणाला ‘मंत्रालयात काम आहे म्हणून. काही असलं तर फोनवर कळव. तिथूनच घरी जाणारे.’ मग माझ्याकडे वळून, चल खाली बसुयात. मग सगळं आवरून तिथून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग मीसुद्धा.

खाली आल्यावर म्हणाला,”तुला काही काम आहे का?”
मिलिंदने मानेनेच नाही म्हटलं.
“चल मग, मंत्रालयातलं काम उरकून घेऊ. मग मी पण मोकळाच आहे.”
मग चर्चगेटपर्यंत ट्रेनने. उतरल्या उतरल्या ‘कॅफे भारत’ मध्ये जेवले दोघे. मग टॅक्सीने मंत्रालयात. तिकडे शरदला अर्धा तास लागला काम आटपायला. तेवढ्या वेळात मिलिंदने सकाळचा रिपोर्ट बनवून मेल करून टाकला.

शरद आल्यावर मग दोघे चालत चालत समुद्रावर निघून आले.

मग उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा.

“काय म्हणतोयस? आई कशीये? तब्येत वगैरे ठीकाये न?”

“हो व्यवस्थित. गेल्या आठवड्यातच फोन झाला होता.”

शरदला माहित होतं मिलिंदचं वडलांशी फार पटत नाही. म्हणून त्याने फक्त आईची चौकशी केली. मिलिंदला पण म्हणून शरद बरा वाटायचा. लोकांच्या जखमा खरवडून काढायच्या नसतात हे त्याला चांगलं ठाऊक होतं.

मग शरदने खिशातून गोल्डफ्लेक काढली आणि पेटवली. छाती भरून खोल दम घेताना सिगरेटचा ठिपका एकदम गडद होऊन राहिला.

मग म्हणाला,”साल्या कधी कधी वाटतं तुझं आहे तेच बरंय च्यायला. टेन्शन नाही कसलंच. आमचं बघ, १० वर्षांपासून झक मारतोय इकडे. पण प्रमोशन कोणाला दिलं त्या कुलकर्णीला. चार वर्षं पण नाही झाली तिला. झोपली असणार साली. च्यायला तो मॅनेजिंग एडिटर गे असता ना तर दाखवलं असतं तिला. इकडे आपलं काहीच फ्युचर नाही बघ.”

मग थोडं कामाचं बोलणं. मग अजून एक सिगरेट. मग एकदम मुडात येऊन सांगू लागला

“ साला सांताक्रूझला एक नवीन कॉंटॅक्ट मिळालाय. कसल्या कडक आयटेम आहेत तिथे. फुल्टू कॉलेज बेब्स. पैसे जास्त आहेत पण कधी तरी जायला सहिच्ये. बाकी नेहमीसाठी फरीदा आहेच आपली. यु नो, फरीदा इज माय ट्रू लव्ह.”

हे शरदचं नेहमीचं होतं.

मिलिंदला मग उगाच निशीची आठवण आली. भयंकर. ते कानातले घालत असेल का अजून? छे सकाळच्या फोटोत तर नव्हते. तिच्या स्कुटीवरून भटकताना त्याचं लक्ष तिकडेच असायचं. पुणं कसलं आवडायचं तेव्हा मिलिंदला. निशीशी ब्रेकअप नंतर हेच पुणं नकोसं झालेलं. त्यानंतरचा दीड महिना दीड करोड वर्षांसारखा वाटला. दिवस खायला उठायचा. बाहेर पडलो आणि अचानक भेटली तर म्हणून मग दिवसभर होस्टेलच्या रूमवरच. दीड महिना लायब्ररी पण बंद. रूमबाहेर फक्त जेवायला पाउल ठेवायचा. तेही दोन दिवसातून एकदा. इतका अपराधीपणा का यावा भेन्च्योद? पण तो येतोच. मग दीड महिन्यात एकलकोंडेपणाची सॉलिड सवय लागली. इतकी की दीड महिन्यात निशीची सवय पण सुटली. मग सरळ मुंबईत. मुंबईत आल्यावर तर अजूनच. दिवसरात्र एकटेपणा पुरायचा त्याला. कुठल्या तरी दिवशी अगदीच अनावर झालं तर एखादी कविता वगैरे. त्याहून जास्त अनावर झालं तर रात्री २-३ वाजता उठून इंद्रिय हातात घेऊन आठवणी ढवळत राहणं. पण जसजसं रुटीन सेट होत गेलं तसतसं हे ढवळणंही कमी होऊ लागलं. त्यात दिवस दिवस उपाशी. चहा आणि पाव खाऊन दिवस काढणं. पोटात भूक असली की आठवणी हा प्रकार किंवा फॉर दॅट मॅटर इतर कुठलाही प्रकार बूर्झ्वा वाटू लागतो. जाऊ देत पण. आता इतक्या वर्षांनी हे सगळं परत कशाला? I think evening should be blamed for this, and the fucking sea and this asshole Sharad, and that whore Neeraja.


च्यायला इंग्लिशमध्ये विचार चालू झाले म्हणजे मेजर नॉनसेन्स. पुन्हा समुद्रावर यायचं नाही. संध्याकाळी तर चुकुनही नाही हे त्याने मनातल्या मनात पक्कं केलं.

“तू येणार का बे? एकदा चल की.”

मिलिंदने मानेनेच नको म्हटलं. तरी शरदचं चालूच.

“काय प्रॉब्लेम आहे तुझा? यू आर नॉट कमिटेड. अनमॅरीड. यू कॅन डू धिस स्टफ यार. जातीचा-बितीचा काही प्रॉब्लेम आहे काय? तर तसं सांग. माझा गोरेगावला पण आहे एक कॉंटॅक्ट. त्याच्याकडे जी.एस.बी. पोरीपण असतात. एकदम कडक.”

“नको यार. खरंच नको.” मिलिंदने निग्रहाने म्हटलं.

तसं शरद वैतागला.

“तू साल्या गांडू आहेस. स्वत:ला फार पुरोगामी वगैरे समजणारा गांडू. दारं बंद करून मूठ मारणारे, आपलं नागडेपण दुसऱ्या कोणाला दिसणार नाही याची काळजी घेत बसणारे गांडू लोक. तू अशा सर्व गांडू लोकांचा कॅप्टन आहेस. तुझ्यापेक्षा जास्त पुरोगामी फरीदा आहे. शी इज रेडी फॉर एनी थिंग. अमुक नको, तमुक नको असलं काही नाही. जज करणं नाही. शी इस मोअर प्रोग्रेसिव्ह दॅन यू अँड पुरोगामीज लाइक यू एवर विल बी.”

शरद कायच्या काय सुटला होता. मिलिंदने काहीच उत्तर दिलं नाही. त्याला एव्हाना माहित झालं होतं, असल्या गोष्टींवर शरद सारख्याशी बोलून काही उपयोग नव्हता. पण मग डोक्यात पुन्हा भुंगे नाचू लागले.

‘शरद इतक्या पोरींसोबत झोपला असेल पण तरी फरीदाकडे का जातो? फक्त तिलाच जास्तीचे पैसे का देतो? सेक्स हा काय फक्त शरीराशी होत असतो काय? मनाचा, मुल्यांचा, आवडीचा संबंधही असतोच न सेक्सशी. आपण कुणाला तरी हवेसे वाटतो, शरीरासकट, मनासकट, विचारांसकट ही इच्छा नसते का आपली? निशीच का आवडायची आपल्याला इतकी? तिच्या आधी काय मुली भेटल्या नव्हत्या का? किंवा तिच्या नंतरही? एखादी स्त्री आपल्याशी सेक्स करायला तयार होते म्हणून आणि म्हणूनच वासना वाटणं खरंच शक्य आहे का? स्वत:च्या बुद्धीपासून तुटलेला सेक्स खरंच समाधान देईल का? मयेकर. तिचं काय? ती आपल्याला आवडते याचं कारण फक्त तिची छाती आहे का? ती स्वत:चं घर स्वत: चालवते, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे हे कारण नसेल का?’

च्यायला, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. दाराच्या फटीतून दिसणारं. आता आपण स्वत:पण सुटलोय हे मिलिंदच्या लक्षात आलं. शरद बोलला ते सगळंच चुकीचं नसेल कदाचित. जाऊ देत. सेक्स, प्रेम, पैसा, वडील हे असे विषय दिवसाच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी कुठेही उपटले तरी आपली उदास होते हे त्याला आता पूर्णपणे पटलं होतं. मग शरदचा निरोप घेतला आणि सी.एस.टी. ची बस पकडली.

रात्र झाली होती. ट्रेन खचाखच भरलेली. ट्रेनमध्ये कशीतरी बसायला जागा मिळाली. दिवसभराचा थकवा आता जाणवायला लागला होता. त्याच्या डोळ्यांसमोर पूर्ण दिवस तुकड्या तुकड्यांनी जमा होत गेला. ट्रेन-ड्रेनेजची पाइपलाइन-मयेकर-शरद-फरीदा-कांबळे-समुद्र. कुठेच सलगता नाही. आपल्या कामाप्रमाणेच सगळे स्ट्रिंग्ससारखे तुटलेले. कशाचा कुठे पत्ता नाही. मग त्याला ट्रेनच्या जागी ड्रेनेजची पाइपलाइन दिसू लागली. त्यात गुदमरत उभे असणारे लोक. गुदमरण्यासाठी बाहेरून आत शिरणारे लोक. आणि तरीही बाहेर पडणाऱ्यांपेक्षा आत शिरणारे जास्त. व्यस्त प्रमाण. च्यायला. ठाणे गेलं. आता अजून थोडा वेळ. मग डोंबिवली. मग घर. झोप. किंवा जागरण. किंवा जागरण आणि मधेमधे झोप. मग पुन्हा उद्या हेच. हेच पुन्हा उद्या.

गाडी स्टेशनला लागली. मग पुढे निघून गेली. दिव्यांचा प्रकाश रुळांवर पडून परावर्तित होत होता. ट्रेनचं इतकं ओझं घेऊन रोज रात्री लुकलुकत राहणाऱ्या रुळांना आपलं ओझं काही फार नाही. पडावं का शांतपणे इथेच? आता नको पण. भूक लागलीये मरणाची की मरणाचीच भूक? प्ले. पॅाझ. स्टॅाप! छे पोटातली भूक जास्त. ट्रेनच्या येरझारा एनी वे चालूच असतात. जीव द्यायचाच आहे तर उपाशीपोटी का मरा. असं ठरवून मिलिंद समोरच्या खानावळीत शिरला.

3 comments:

pramod said...

👍👍👍👍

भारत ज्ञानोबा गोरे said...

Nice guru

Meghana Bhuskute said...

खूप दिवसांनी न कंटाळता सलग वाचावं वाटलं.

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!