Thursday, December 1, 2016

जागरण आणि फालतुगिरी

घड्याळात वाजला एक
आधी हातातलं पुस्तक फेक
एक वाजता आणखी काय सुचणार?

दुपारी एकच्या सुमारास लायब्ररीत वाचत बसलेलो, तर समोरच्या आरामखुर्चीत एक मुलगी येऊन बसली. डाव्या पायावर उजवा पाय वगैरे ठेवून. हातात कुठलं तरी जाडजूड पुस्तक. खिडकीच्या जाळीतून तिच्या पायाच्या तीन बोटांवर तुटक तुटक ऊन पडलं होतं. आणि त्याखाली मग तिच्या बोटांची सावली. तिने पाय बाजूला केला की ऊन खाली जमिनीवर पडायचं आणि सावली गायब. त्यात मधूनच तिच्या नखांवर ऊन पडलं की एकदम चमकून जायची तिची नखं. मग मला मजा वाटली. असं मोजून आठ वेळा झाल्यावर मग मात्र मला कंटाळा आला. च्यायला तिची नखंही केवढी आकर्षक होती. नाहीतर माझी नखं. एक अर्धवट तुटलेलं. कुठे घाण अडकलेली. आणि बोटांवर मातीचे काळसर डाग. 
तर मग एलिअटची कविता आठवली एकदम–

I can connect
Nothing with nothing
The broken fingernails of dirty hands.
My people humble people who expect nothing

च्यायला काय संबंध. पण जाउ देत.

I can connect
Nothing with everything
And everything with nothing

हे हे. असो.
रात्री बारा नंतर सगळं माफ असतं असं माझा एक मित्र म्हणतो.
हा मित्र ग्रेट आहे पण. याने मागे कुठे तरी वाचलेलं की सिगरेटचा शेवटचा तृतीयांश फार वाईट असतो. म्हणून मग तेव्हापासून हा दोन तृतीयांश सिगरेट ओढतो आणि उरलेली टाकून देतो. मग ती कम्पेन्सेट करायला म्हणून दर दोन सिगरेटनंतर एक एक्स्ट्रा सिगरेट ओढतो. वर म्हणणं काय तर खर्च वाढलाय हल्ली सिगरेटचा. पण तब्येतीची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार?
थोडक्यात काय तर फालतुगिरी!
===

घड्याळात वाजले दोन
हातात घेतला फोन

 तर फोन आणि जागरण यांचा फार जवळचा संबंध आहे. दोन्हींच्या दुसऱ्या बाजूला कोणी ना कोणी असतंच. असलेलं किंवा नसलेलं. असलेलं असेल तर त्रास आणि नसलेलं असेल तर आणखी त्रास. त्रास अटळ आहे एकूण.

तर फोन ही आता गरज राहिलेली नसून ते व्यसन झालेलं आहे. मुंबई-पुणे-मुंबई. च्यायला हा एक पिक्चर भयंकर डिप्रेस करणारा आहे असं एक अतिशय बेवडा मित्र म्हणतो. तसं तर दारू पिणारे लोक कशानेही डिप्रेस होऊ शकतात. हे एक बरं असतं. म्हणजे पूर्वी हाच मित्र एकदा बरेच पेग पोटात गेल्यावर गांधीजींचं भजन म्हणत चक्क लहान मुलासारखा रडत सुटलेला. मग तावातावाने माझ्यासकट जो जो आठवेल त्याला शिव्या देत सुटला. तू साधा चहा पण पीत नाहीस. तू चुत्या आहेस वगैरे. असो पण. हा विषय नाही. 

तर हा पिक्चर उदास करून जातो हे मात्र खरंय.
पण सिनेमा तर सिनेमा असतो. सिनेमापेक्षा प्रत्यक्ष घडलेले प्रसंगच जास्त टोकदार असतात. सिनेमा फक्त ते टोक त्वचेच्या आत रुतवण्याचं काम करतो. जिथे टोकं जास्त, तिथे भळभळही जास्त.
च्यायला हे कसलं छापील वाक्य आहे आणि युजलेसही. 
माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं आणि मी काहीतरी भलतंच लिहिलं. पण त्याने काय फरक पडतो. तसंही काफ्का म्हणतो की All language is but a poor translation. म्हणजे आपण जे काही लिहितो, वाचतो, बोलतो ते सगळं poor translationच.

उदाहरणार्थ मला तू आवडतोस.
Poor translation.
माझं तुझ्यावर प्रेम आहे.
आणखी Poor translation.
मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही.
बेकार बेक्कार translation.
तू नाही आलास तर मी लग्नच करणार नाही. 
बोचा.
बोच आणि बोचा यात फक्त एका मात्रेचा फरक आहे. बाकी काही नाही.
तर एकूणच लिहिणं, वाचणं
, बोलणं ही फालतुगिरीच.
=== 

घड्याळात वाजले तीन
दूध दही ताक धिना धीन.

जमलं एकदाचं च्यायला. तरी लोणी राहिलंच.
तर दुधापासून दही बनतं.. दह्यापासून ताक..
ताकापासून लोणी.. पण उलट मात्र नाही..
माणसांचं पण असंच असतं का?
म्हणजे आधी दुधासारखी स्वच्छ वगैरे. मग हळू हळू दह्यासारखी घट्ट आणि आंबट होत गेलेली. मग बऱ्यापैकी घुसळली गेली की आंबटपणा जाऊन ताकासारखी सुटी, प्रवाही होत गेलेली. आणि शेवटी लोण्यासारखी मऊ, फिकट; कुठल्यातरी खुंटीवर लटकलेली
-
मी यापैकी नक्की कुठल्या स्टेजवर आहे?
दह्याच्या असणार बहुतेक..
किंवा दुधाच्याच.. फक्त नासलेल्या!

तर मुद्दा काय तर माणूस, जीवन, आयुष्य असले शब्द घुसवले की पाणचट गोष्टीतून पण उच्च कोटीचं तत्त्वज्ञान निर्माण करता येतं.
उदाहरणार्थ “
No parking in front of the gate – तसं झालंय आयुष्याचं” किंवा
“कृपया पुढे सरकत रहा- आयुष्यात!” वगैरे. इंस्टंट तत्त्वज्ञान च्यायला.

तर मुद्दा हा की मी हे का लिहिलंय? किंवा मीच हे लिहिलंय का?
की अमुक अमुक वेळच्या मी हे लिहिलंय? हो हेच जास्त appropriate होईल. ते theory of parallel world सारखं. ही थिअरी बरीये तशी. खासकरून जबाबदारी झटकायला!
मध्ये एक भिकार नाटक पाहिलेलं ज्यात
parallel worlds दाखवलेली. ‘अमर फोटो स्टुडीओ’ म्हणून. शॉट होतं. मनस्विनीने लिहिलेलं म्हणून गेलेलो. पण बकवास होतं च्यायला. असो.

तर हे जे लिहिलंय याला नक्की काय म्हणावं? वाङगमय वगैरे तर नक्कीच नाही. वाङगमय. वांगंमय. गंमतच. तर वाङगमय हा शब्द कुठून आला याची एक गोष्ट ऐकलेली पूर्वी. कदाचित त्यावेळच्या माझ्याकडूनच.
हां तर खूप खूप वर्षांपूर्वी एका गावात कुणीतरी लेखक राहायचा. अतिशय प्रतिभावंत पण तरी गरीब. खायचे प्यायचे वांधे असायचे. शेवटी त्याने उदरनिर्वाह(!) चालवायला भीक मागायला सुरुवात केली. पण कुणी भीकही देईना. तर गावातलीच एक बाई त्याला म्हणाली की तू मला काहीतरी  दिलंस तर मी तुला रोज जेवायला देईन.(चावटपणा नको इथे.) तर मग लेखकाने तिला रोज १ कागद पाठपोठ लिहून देण्याचं मान्य केलं. मग दररोज दुपारी १ वाजता हा वाढ गं माय, वाढ गं माय असं म्हणत हिच्या दाराशी. तीही त्याला अन्न द्यायची आणि कागद घेऊन अडगळीच्या जागी सांभाळून ठेवायची. तर वर्षानुवर्षं हे असंच चालू राहिलं. या बाईच्या घरातील अडगळ लेखकाच्या कागदांनी समृद्ध होत गेली. शेवटी बऱ्याच वर्षांनी तो लेखक मरण पावला. मग या बाईने ते सगळे कागद बाहेर काढले. एकत्र बांधले आणि प्रसिद्ध केलं. लिखाणाला तिने नाव दिलं “वाढ गं माय”. हे फार म्हणजे फार पॉप्युलर झालं. तसंही साधारणपणे लेखक मेल्यावर त्याचं लिखाण जास्त खपतं असा इतिहास आहे. म्हणजे खपाल तर खपेल असं काहीतरी.  तर पुढे या नावाचा अपभ्रंश वगैरे होऊन त्यातून वाङगमय या शब्दाची निर्मिती झाली. तर असं आहे एकूण.

च्यायला मी काय लिहायचं ठरवलेलं आणि काय लिहून काढलं –
तर आता हेच आपण जीवनात असं जोडून लिहू. म्हणजे तत्त्वज्ञान तयार.
तर एकूण काय, तत्त्वज्ञान वगैरे म्हणजे फालतुगिरीच.
=== 

घड्याळात वाजले चार..
जागरण झालंय फार
इससे आप पड सकते है,
बीमार- बहोत बीमार..
अब बस भी हुआ यार
हे यमक सोप्पंय म्हणून इतकं लिहिलं. नाहीतर इतकी फालतुगिरी कोण करेल?
बाकी जागरण झालं की सगळ्यात आधी डोळ्यांना कळत असावं.
डोळे कशासाठी?
जागरण झालंय का ते कळण्यासाठी..

तर डोळ्यांवरून आठवलं. परवा शिवडीला बसने जात होतो तर एक बाई पुढच्या सीटवर अजून एका बाईसोबत गप्पा मारत बसलेली. तर तिच्या पाठीवर तीन चार ठिकाणी ओरबाडल्याच्या खुणा नव्हे जखमाच होत्या. अगदी ताज्या आणि व्हिजिबल.
उगाच अस्वस्थ वाटू लागलं मग. मग वाटलं पाठीवरच्या जखमा दिसतात तरी. पण छातीवरच्या  जखमांचं काय? किंवा कदाचित त्याच्याही आतल्या?
पण काहीही केलं तरी सारखी नजर त्या जखमांकडेच जात राहिली. अर्थात ती बाई दिसायला तितकीशी बरी नव्हती म्हणूनही कदाचित माझी नजर आणखी खोल गेली नसावी.
तर शिवडी आल्यावर बसमधून उतरलो नि मागे न वळता तडक रेल्वे स्टेशनवर. तर या दोन्ही बायका ट्रेनमध्ये माझ्या सीटसमोरच. मग मी नीट त्या बाईकडे पाहिलं तर इतका प्रसन्न चेहरा होता तिचा. डोळेही एकदम टपोरे, बोलके आणि पाणीदार – एखाद्या विचारवन्तासारखे. थोडेसे जास्तच. सारखा विचार करून डोळ्यांत पाणी येत असावं बहुतेक. पण तिचा चेहरा बघून मग मला बरंच बरं वाटलं. मग चेंबूर येईपर्यंत तेच सगळं डोक्यात. मग मात्र विसरून पण गेलो. ते डायरेक्ट आता आठवलं. तसंही उसनी आणलेली दु:खं किती काळ लक्षात ठेवणार? ---

किती काळ लक्षात ठेवणार
घड्याळात वाजले चार ---

तर मुद्दा काय तर चार हे यमक फारच सोप्पये एकूण. इतकं सोपं सगळंच असतं तर – तरी कोणी ना कोणी फालतुगिरी केलीच असती.
च्यायला हा रस्ता अटळ आहे आणि अटळ आहे फालतुगिरीसुद्धा!
 ===

घड्याळात वाजले पाच
आता आडवा तिडवा नाच

“In the morning however, we shall – dance!”
Thus spoke Zarathustra.  

च्यायला. हे पुस्तक कंप्लीट डोक्यावरून गेलेलं. फक्त त्यातलं हे वाक्य लक्षात आहे अजूनही –
He who climbs upon the highest mountains laughs at all tragedies, real or imaginary.
अर्थ काय? नाही माहीत.

बरं हे पुस्तक मी का वाचायला गेलो? कारण एका मित्राने बोलता बोलता सांगितलं की त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला हे पुस्तक आवडायचं. त्यात त्याने एक्स चा उच्चार पण अगदी जोर वगैरे देऊन केलेला. म्हणूनही च्यायला.
तर एक्स-गर्लफ्रेंड हीसुद्धा एक गोष्टच. छे गोष्ट नव्हे दंतकथा. हो दंतकथाच. लांबी खूप जास्त आणि तात्पर्य झाटभर असलेली. दंतकथेला दंतकथा म्हणूनच म्हणतात का? पण प्रत्येक कथेला तात्पर्य असायलाच हवं का? तात्पर्य नसलेल्या गोष्टी जनरली लोकांना आवडत नसाव्यात, किंवा पटत नसाव्यात बहुधा. आणि तरी लोक अख्खंच्या अख्खं आयुष्य जगतात हे विशेष.

बाय द वे आयुष्यातला ष हा पोटफोड्या का असतो?  

असो पण. दिवसाची सुरुवात आणि जागरणाचा शेवट इतक्या डीप गोष्टीनी करू नये. उगाच जागरण लांबू शकतं अशाने.

पण जागरण लांबतं म्हणजे काय? जागरणाला शेवट असतो का? उलट जागरण ही गोष्ट माझ्या मते सलग असते. म्हणजे गणितात piecewise continuous function असतं तसं जागरणही तुकड्यातुकड्यांनी सलगच असतं.

सलग नसते ती झोप. सलग नसते ती रात्र. सलग नसतो तो दिवस. सलग नसते ती मैत्री.  सलग नसतात ती माणसं. सलग नसतं ते प्रेम. सलग नसतं ते लग्न. सलग नसतात ती नाती. सलग नसतात ती वर्षं. 
पुन्हा पोटफोड्याच ष च्यायला!
जागरण मात्र सलगच. अनेक डोळ्यांचं. अनेक स्वप्नांचं. अनेक रात्रींचं. अनेक दिवसांचं. अनेक 
महिन्यांचं. अनेक वर्षांचं. अनेक युगांचं. स्वत:चं आणि जगाचंसुद्धा.

तर एकूण काय तर जागरण ही एक अनंतकाळ चालणारी सलग फालतुगिरीच!

0 comments:

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!