Saturday, May 28, 2016

बॅकग्राऊंडला वाजत राहणारी भिकारचोट गाणी...

सकाळी उठल्यापासून(मी) ते रात्री झोपेपर्यंत(मीच) किंवा त्यानंतरही.. म्हणजे स्वप्नातल्या स्वप्नातही झोपेपर्यंत, मेंदूच्या कुठल्या तरी रिकाम्या कोपऱ्यात मला सारखी काही गाणी वाजताना ऐकू येतात.
सतत.
वर्षानुवर्षे.
दिवसेंदिवस.
तासन तास.
क्षण न क्षण.

च्यायला यापेक्षा जास्त डिटेलमध्ये आपण घुसुच नाही शकत कशाच्या? म्हणजे आपण फार फार तर क्षणापर्यंत पोचू शकतो. दोन क्षणांच्या मधल्या भागात नाहीच. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या प्रत्येक क्षण सोबत वगैरे राहू. पण त्या क्षणांच्या मधल्या गॅपमध्ये पुन्हा सगळे भयंकर एकटेच. जाऊ दे पण, उगाच च्यायला तत्त्वज्ञान वगैरे.

तर मुद्दा हा की, माझ्याही नकळत मग मी ती गाणी गुणगुणायलाही लागतो.
हाहाहेहेहंहूहू.. डाडाडेडेडंडूडू... गागागेगेगंगूगू... -- शी च्यायला, चुत्येगिरी नुसती
--
अर्थात त्यातली बरीचशी गाणी मी सवयीनेच गुणगुणतो. उदाहरणार्थ सकाळी कुंथत बसलेलं असताना मला ‘हे भलते अवघड असते’ या गाण्याशिवाय प्रेशरच येत नाही आणि मग आपोआप मागे गुणगुण सुरु होते –
हे भलते अवघड असते..
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहिसे लांब होताना...

डोळे पाणावतात एकदम. च्यायला संदीप खरे ग्रेट आहे. याच्यामुळे सकाळची एक सिगरेट कमी झाली. आता त्या प्रमाणात माझं आयुष्य वाढणार. तर मग ही सिगरेट कम्पेनसेट करायला आता मध्यरात्री वगैरे उठलं पाहिजे. तर त्याआधी झोपायलाही हवं. तर असो.

आता मी टी.व्ही. बघतोय आणि त्यात वर्षभरापूर्वीच्या योगासनं, मोदी, मुस्लिम वगैरे चोथा झालेल्या विषयावर परत चर्चा चालुये. म्हणजे मुस्लीमान्कडच्या लोकांचा याला विरोध, कॉंग्रेसकल्यांचा त्यांच्या विरोधाला सपोर्ट, डाव्यांकडून मोदी कंपनीचा निषेध आणि भाजपाकडल्यांचा यांच्या विरोधाला आणि त्याहून त्यांच्या सपोर्टला कडाडून वगैरे विरोध. चुत्येगिरी नुसती. च्यायला जाऊ दे पण, उगाच राजकारण वगैरे. 

तर मुद्दा हा की टी.व्ही. चालू असतानाही मला उगाच गाणी ऐकू येतात – गोली मार भेजेमें वगैरे. गुलजार च्यायला. हा माणूस भन्नाट आहे. हा माणूस आपला बराच वेळ फुकट घालवतो. म्हणजे याला मानला पाहिजे. कसलं लिहितो साला-

याद है, एक दिन
मेरे मेज पे बैठे-बैठे
सिगरेट की डिबिया पर तुमने
छोटे-से इस पौधे का
एक स्केच बनाया था!

आकर देखो,
उस पौधे पर फूल आया है!

हाय गुलजार! हे असं लिहिणारा माणूस गोली मार भेजेंमें पण लिहू शकतो हे खरंच थोर आहे. हे जमायला हवं. काय जमायला हवं? गोळी मारायला कि गाणं लिहायला? दोन्ही अशक्यच—असो. 

मुद्दा काय तर सिगरेट आणि गुलजार हे कॉंबिनेशन अफलातून आहे. संध्याकाळी मी कधी चुकून मरीन लाईन्सला गेलो आणि चुकुनच सिगरेट मारायला लागलो की छातीच्या भयंकर जोरात ठोक्यामधून हे गाणं धडधडत राहातं –

दिल में कुछ जलता है, शायद धुआँ धुआँ सा लगता है
आँख में कुछ चुभता है
, शायद सपना कोई सुलगता है
दिल फूँको और इतना फूँको
, दर्द निकल जाए
इतना लंबा कश लो यारों, दम निकल जाए-------

प्रिय गुलजार, खरंच होऊ शकतं का असं? जाऊ देत च्यायला. तबू कसली दिसते पण या गाण्यात. ती तर अजून पण क्लासच दिसते. त्यात आता भरलीये पण कमालीची. तर असो.

हा गाणी ऐकू येण्याचा प्रकार केव्हा चालू झाला नक्की आठवत नाही. पण बहुतेक मी १०वीला असताना असावा. तेव्हा शाळेत संध्याकाळच्या वेळी almost रोज अदनान सामीचं ‘कभी तो नजर मिलाओ’ गाणं खिडकीतून ऐकू यायचं – कसलं तूफान आवडायचं मला तेव्हा ते. असं वाटायचं हे गाणं माझ्यासाठीच लिहिलंय – म्हणजे ते जो नही कहा है कभी तो समझ भी जाओ वगैरे. असो पण. शाळा कॉलेजमध्ये आपण कसे होतो वगैरे डोक्यात आलं की उगाच nostalgic वगैरे व्हायला होतं.

नंतर १२वीला असताना गुरुदत्तचा प्यासा पाहिला आणि “ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है” हे इतकं भयंकर आत रुतलं की कुठल्याही प्रसंगी, विशेष करून लोकांच्या मते आनंदाच्या वगैरे प्रसंगी हमखास हे गाणं चालू होतं बॅकग्राऊंडला. गुरुदत्त मागे उभा राहून शाल घेऊन, दोन्ही हात पसरून ओरडत असतो पण कोणाला काही नसतं त्याचं.शेवटी तोच कंटाळून जातो. 

या पिक्चरच्या शेवटी गुरुदत्त वहिदाला घेऊन कुठे तरी दूर निघून जातो. मला ही जागा बघायचीय च्यायला. या जागेचा पत्ता सापडायला हवा यार. सापडेलही कधीतरी.. पण मी कोणासोबत जाणार? किंवा माझ्यासोबत कोण येणार?फारफार तर सिनेमा, समुद्र किंवा एखादा ट्रेक अशा भंपक ठिकाणी येईलही कोणी, पण या असल्या ठिकाणी कोण मरायला येइल? गुरुदत्त you are a lucky man यार...

नंतर असंच एकदा रेडीओवर नूर जहानचं गाणं ऐकलं –

लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे
अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजे
और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा
मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना मांग 

आयचा घो त्या फैजच्या! (फैज की फैझ?) हे गाणं कुणीही वयाच्या १८व्या वर्षी ऐकू नये. निघता निघत नाही डोक्यातून(की डोळ्यातून). भेन्चोद – फैज डिझर्व करतो साला ही शिवी – तेव्हापासून ते आतापर्यंत मी फैज आणि नूर जहान दोघांच्याही वेड्यासारखा प्रेमात पडतो अधूनमधून...

मी कधी जरा बऱ्या मूडात असलो की कुमार गंधर्व बॅकग्राऊंडला चालू होतात. कुमार आणि अनिल हे भन्नाट कॉकटेल आहे. ट्रेनमधून जाताना कधी विंडोसीट मिळाली की मागे कुमारांचं गाणं चालू होतं ‘उड जायेगा...’ वगैरे. 

हे हे विंडोसीट मिळणं म्हणजे पण आनंदाचाच क्षण. आणि तसंही मला प्रवास करताना खिडकीपाशी बसायला फार आवडतं. इन्फॅक्ट कॉलेजला असताना मी वर्गातल्या एका मुलीच्या चक्क प्रेमात पडलो होतो काही दिवस, तिने स्वत:हून मला खिडकीपाशी बसायला दिलेलं म्हणून. तर असो. 

मुद्दा काय तर एक फुफ्फुस घेऊन, कुमार तुटक तुटक असं जे गातात ते इतर कोणाहीपेक्षा खूप जवळचं वाटतं. तसंही मला तुटक तुटक, अपूर्ण गोष्टीचंच भारी वेडय पहिल्यापासून. तर रेल्वेच्या खिडकीच्या जाळीमधून दिसणारी तुटक तुटक झाडं, इमारती, पोस्टर्स पाहिले की अपोआप कुमारांची गुणगुण सुरु होते. ट्रेनच्या खिडकीतून मग माझं  जगदर्शन चालू होतं.. तर आता हे लिहिताना माझ्या लक्षात आलं की माझ्या लायब्ररीतल्या खिडक्यानाही अशा जाळ्या लावल्यायेत नि त्यातून समोरची इमारत, फौंटनचा रस्ता, त्यावरची माणसं आणि निळंपांढरं आकाश तुटक तुटक दिसतं. तर कोणी म्हणेल त्यात काय एवढं? ते तर संडासच्या खिडकीतून पण दिसतं. तर खरच्ये ते.

हां पण समजा ट्रेन पूर्ण रिकामी असेल तर मात्र मी दरवाज्याशी उभा राहतो. एका हाताने दांडी पकडून दुसऱ्या हाताच्या बोटांनी मी ट्रेनचा दरवाजा वाजवत सुटतो आणि मग फार भयानक गाणी वाजत राहतात. म्हणजे माझं कराओके आणि गाणारे मेहदी हसन, बेगम अख्तर, रफी, तलत, मुकेश, लता, किशोर,सोनू, कुमार सानू वगैरेपैकी कोणीही किंवा सगळेच.

जनरली हा प्रकार रंजिश ही सही पासून सुरु होतो. पुरेशी स्टेशन्स मागे पडली की मग बेगम अख्तर चालू होते –

आप को प्यार है मुझ से के नहीं है मुझ से
जाने क्यों ऐसे सवालात ने दिल तोड़ दिया

हे गाणं १०-१२ वेळा तरी रिपीट मोडवर चालू राहातं आणि त्याच्या अधेमधे मग इतर गाणी. अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का वगैरे.

जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता था.. हे गाणं आलं की मात्र बाकी गाणी बंद. रिस्पेक्ट एकदम. च्यायला नुकताच एका मित्राच्या लग्नाला गेलेलो, तर त्याच्या वरातीत हे गाणं वाजवत होते. आणि वर लोक त्यावर नाचत पण होते. लोक येडझवे असतात. त्यातही लग्नांमध्ये घोड्याच्या आजूबाजूला नाचणारे तर आणखीनच च्यायला. हेहे गुगल सजेशन मध्ये येडझवे दाखवतंय हे बेस्ट आहे. असो.

लता मात्र एकदा आली की डोळ्यातून एखादा तरी थेंब निपटून काढतेच. लताचं तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा हे चालू झालं की बंदच होत नाही काही केल्या. इन्फीनाईट मोडवर चालूच राहातं. खास करून ट्रेकला वगैरे गेलो आणि उगाच खूप साऱ्या पायवाटा वगैरे दिसल्या की लता गुणगुणू लागते

इन रेशमी राहो में, एक राह तो वो होगी
तुम तक जो पहुचती है, इस मोड़ से जाती है...

च्यायला परत गुलजार.
गुलजार एके गुलजार.
गुलजार दुणे गुलजार.
गुलजार रेस टू गुलजार.
गुलजार रेस टू इन्फीनीटी.
हा व्यापून राहिलाय सगळं.

तू मुंबई सोडताना फोन केला होतास माझं पॅब्लो नेरुदाचं पुस्तक तुझ्याकडे राहिलंय म्हणून. तेव्हा या गुलजारने केवढं छळलं होतं मला. काय तर म्हणे

एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गीले, सूखा तो मैं ले आई थी
गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो--------

जाऊ देत. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है? निरोपाच्या प्रसंगांबद्दल मला फार बोलायला आवडत नाही. पण का माहित नाही पण निरोपाच्या कुठल्याही प्रसंगी मला गीता दत्तचं एक गाणं कायम विळखा घालून बसतं—

मुझे जाँ ना कहो मेरी जाँ
मेरी जाँ, मेरी जाँ

जाँ ना कहो अनजान मुझे
जान कहा रहती है सदा
अनजाने क्या जाने, जान के जाए कौन भला

मला पूर्वी याचा अर्थ कळायचाच नाही. म्हणजे साधारणतः २५व्या वर्षी माणूस जितका बावळट(म्हणजे चुत्या) असतो त्यापेक्षा मी जरा जास्तच बावळट(म्हणजे चुत्या) होतो म्हणूनही असेल. पण जेव्हा या गाण्याचा अर्थ कळला, तेव्हा हे गाणं अगदी अंगावर आलं. त्यातल्या अर्थासकट. पण असो. निरोपाविषयी फार बोलू नये माणसानं...

समुद्राला लागून असलेल्या गल्ल्यांमधून निरुद्देश भटकत राहाणं हा प्रकार मला फार आवडतो. निरुद्देश. कसला भारी शब्दये हा. भारी. हेहे. तर मुद्दा हा की अशा वेळी हमखास किशोर- आर.डी.ची गाणी आठवू लागतात. प्यार हमें किस मोड पे ले आया वगैरे. आर.डी. बाप आहे च्यायला. किंवा मग

हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके
झिंगालाला हू.. झिंगालाला हू.. हुर्र हुर्र----
झिंगालाला... च्यायला.. इसको लागा डाला तो लाईफ झिंगालाला...
झिंग. झिंगाट. झिंगालाला.
झिंगालालाच बेस्टये एकदम.

तर मुद्दा हा की या गल्ल्यांमध्ये केवढी शांतता असते. समुद्रावर नसते ती जनरली. समुद्रावर उगाच कारण नसताना पळणारे लोक, हॉर्नचे आवाज, एकमेकांना चिकटलेली जोडपी, येणाऱ्याजाणाऱ्यांकडे बघत बसणारी रिकामटेकडी माणसं, लाटा आणि लाटांवर निरंतर चालत राहणारी भिकारचोट गाणी – आणि भिकारचोट आठवणीसुद्धा—

च्यायला आठवणींवरून आठवलं बाल्झॅक म्हणतो True love rules especially through memory.
च्यायला, म्हणजे रोजचा हस्तमैथुन हे पण खरं प्रेमच तर – आयचा घो या लेखकांच्या—काय तरी आपलं लिहून ठेवतात. असो पण.

तर मी आता हस्तमैथुन करताना कुठलं गाणं ऐकू येतं हे आठवायचा प्रयत्न करतोय पण काहीच आठवत नाहीये.
येस. आठवलं. ते फरीदा खानुमचं---
आज जाने की जिद ना करो....

च्यायला. कोणाचं काय तर कोणाचं काय.. कुणी म्हणेल की काय चुत्येगिरी आहे? पण हे फॅक्ट आहे. पिक्चरमधेपण एखादा सेक्स सीन चालू असेल तर हे गाणं वाजू लागतं बॅकग्राऊंडला माझ्या.असो पण. 

तुम्ही जर इथपर्यंत वाचत आला असाल तर तुम्ही थोर आहात यात शंका नाही. किंवा मग तुमच्याकडे फुकट घालवायला चिक्कार वेळ असणार हे नक्की.

तर मला बऱ्याचदा एखादा पिक्चर पाहिला की एकदम डिप्रेशन येतं. उदाहरणार्थ मध्ये बऱ्याच वर्षांनी रजनीगंधा पाहिला. अमोल पालेकरचा. इंजिनीअरिंगला असताना एकदा पाहिलेला, पण तेव्हा कळला नव्हता. आता परत पाहिला तर फारच उदास वाटू लागलं. म्हणजे हे असं सगळ्यांचंच होतं का? पहिलं प्रेम ही काय भयंकर गोष्ट असते ना? ओके आय शुड राइट पहिलं ‘सिरीअस’ प्रेम. असो तर तेव्हापासून मग कुठलाही भिकार प्रेमपट पाहिला की त्यातलं ते गाणं नेहमी रेंगाळत राहतं

कई बार यूँ भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है, मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे, अन्जानी आस के पीछे, मन दौड़ने लगता है

-- म्हणजे पुन्हा पुन्हा आपण हातचं सोडून पुन्हा त्याच त्याच गोष्टींच्या मागे का धावत सुटतो? Psychology नक्कीच काही तरी टर्म असणार याला. तर असो. त्याने काय फरक पडतो.

पण ही मागे चालणारी अखंड गाणी किंवा अखंड चालणारी गाणी किंवा अखंड गाणी – चालणारी – होय हे शेवटचं जास्त भिकार वाटतंय, हेच चांगलंय; हं तर अखंड गाणी – चालणारी – हैराण करून सोडतात हे मात्र खरं. खास करून झोपताना रफी, मुकेश वगैरे जीवावर उठतात. डोळे बंद केले तरी मुकेश ओरडत बसतो- आंसू भरी है ये जीवन की राहें वगैरे किंवा

तेरे प्यार को इस तरह से भुलाना
ना दिल चाहता है, ना हम चाहते है किंवा

मधेच गिरिजादेवीचं किन संग प्रीत लगाये...
च्यायला हे गाणं चालू झालं की झोपेचं खोबरं.

किंवा त्याहून भयंकर म्हणजे ते ईश्कियातलं –
डर लगता है तनहा सोने में जी

किंवा... किंवा... किंवा..

तर मुद्दा काय गाणी प्रचंड आहेत. वेळ पण प्रचंड असतोच. तो असा नाही तर तसा आपण फुकट घालवतोच. पण त्यात बॅकग्राऊंडला अशी गाणी असली की तो फार हळूहळू फुकट जातो. एकदम भसकन नाही जात.
टागोर म्हणतात — Music fills the infinite between two souls.

मला वाटतं ही गाणी माझ्यातालीच पोकळी भरून काढतात आणि मग त्याहून मोठी पोकळी निर्माण करतात. 
तर एकूण काय – हे सगळं पोकळच--

2 comments:

Sadhana Guldagad said...

Ekandarit sarv vichar karta tu chhan lihal Aahes.pan bolu aapan tu bhetlyvar

Sadhana Guldagad said...

Ekandarit sarv vichar karta tu chhan lihal Aahes.pan bolu aapan tu bhetlyvar

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!