Thursday, July 14, 2016

शेवटी शून्य आणि पारिजात...

आज संचेतीच्या सिग्नलला पुढच्या बाईकवाल्याच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं ‘शेवटी शून्य’. च्यायला म्हटलं खरये.. शेवटी शून्यच. मग उगाच ‘बाकी शून्य आठवलं’ – झवझव म्हणते सोट्या पूस, याच्यात नाहीतर त्याच्यात घूस... जियो यार. परत वाचायला पाहिजे हे पुस्तक. कसंही असलं तरी.

मग उगाच माझ्या लांबच्या ओळखीतल्या एकाने जीव दिला गेल्या वर्षी त्याची आठवण झाली. च्यायला पी.एच.डी. झालेला माणूसही जीव देतो हे थोर आहे. म्हणजे शेवटी शून्यच. जाऊ देत च्यायला पण. जीव दिला म्हणजे नक्की काय? जिवंत असणं म्हणजे नक्की काय? जिवंत असण्याची नक्की खूण किंवा लक्षण काय? सातव्या मजल्यावरून त्याचं शरीर जमिनीवर येऊन आदळलं म्हणजे नक्की काय झालं – potential energy चं kinetic energyत रुपांतर आणि परत पुन्हा kinetic energyचं potential energyत. बस्स हे आणि इतकंच.. बाकी श्वासोच्छवास वगैरे म्हणजे अंधश्रद्धाच! ३ वर्षांची मुलगी पण होती त्याला. तिला हे फिजिक्स कसं समजावणार?

कामू म्हणतो आत्महत्येपेक्षा जगायला जास्त हिम्मत लागते. गांड च्यायला. रोज सकाळी अमुक वाजता उठून दात आणि गांड घासून इस्त्री केलेले किंवा न केलेले कपडे घालून अमुक एका ठिकाणी जाऊन पुन्हा गांड घासणं आणि मग घरी येऊन ठरल्या वेळी जेवण, टी.वी. आणि ऑप्शन असेल तर सेक्स करून मग झोपणं इत्यादी साठी हिम्मत लागते काय?

कोणी महान माणसाने जर गांड हा शब्द मराठीच्या इतिहासातून खोडून टाकायचा ठरवलं तर किती वर्षं लागतील? हजार तरी किमान. पण कोण असली चुत्येगिरी करेल?

असो. ते energyवरून आठवलं. मला oracle शिकवणारे सर एकदा असंच गप्पा मारताना मला म्हणलेले – Communication is only by energy म्हणून. होय च्यायला. एनर्जी. ऊर्जा. ती पाहिजेच. ती नसेल तर कोणाला कितीही वेळा भेटा, बोलणं होतच नाही. होते ती फक्त शब्दांची फेकाफेक. फेकच च्यायला. म्हणून मी कदाचित भेटत नसेन का कोणाला आजकाल? पण भेटलो नाही तरी मी केवढ्या जणांशी बोलत असतो सतत. आणि माझ्याशीही केवढे जण बोलत असतात. communicationची हीच पद्धत बरी. भेटलो की उगाच विषय काढून काढून तास (ग्लास नाही!) भरत राहायचे. नकोच च्यायला.

मग कॅम्पपर्यंत या बाईकच्या मागे मागेच. पुढे तो वळल्यावर उगाच Slaughterhouse 5 आठवलं - Everything is nothing, with a twist. पुन्हा तेच. शून्यच. आणि तरी मी बाईक चालवतोच. मैलाचे आकडे पुढे पुढे जात राहतातच. घड्याळाचे काटे, वेळ, अगणित गाड्या, आकाशातले ढग, माणसं, हा, ही, तो, ती, तू, मी(?) सगळंच--- so it goes च्यायला. या कर्टने नक्कीच दासबोध वाचला असणार.

देवलंड पितृलंड | शक्तिवीण करी तोंड |
ज्याचे मुखीं भंडउभंड | तो एक मूर्ख ||

इति दासबोध. म्हणजे मी पण मूर्खच. तर मग कोण नाहीये? असो.

बाईकचा नंबर मात्र १६८१ होता. ४१ चा वर्ग. म्हणजे इथे मात्र शेवटी शून्य नाही. च्यायला टिपिकल पुणेकर. च्युणेकर. जाऊ देत. पुणे=च्युणे=चणे=कणे. यमक=गमक. हीहाहा. च्यायला पाठीत कण्याऐवजी चणे असते तर? कदाचित वाकताना इतका त्रास झाला नसता!

आता इतका टाईप करताना इटाका असं टाईप झालं.
इटाका भारी शब्द मराठीत का नाहीये?

घरी आलो तर स्टारस्पोर्ट्सवर गांगुलीची कुठली तरी इनिंग दाखवत होते. च्यायला गांगुली लास्ट टेस्टमध्ये शून्यावर आउट झाला होता. ब्रॅडमनपण. म्हणजे शेवटी शून्य. आणि तरी दोघेही ग्रेटच. ब्रॅडमनला ग्रेट फक्त सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं. नाहीतर त्याच्याबद्दल बॅटिंग अॅव्हरेज सोडून आपल्याला काडीची माहिती नाही. गांगुली मात्र ग्रेटच. च्यायला त्याच्या आधीचे सगळे कॅप्टन कसे होते. असो.


शेवटी शून्य काढूनही लोक यांना थोर समजतात. म्हणजे एकूणच ‘शेवटी शून्य’ या तत्त्वज्ञानात कुठेतरी घाण लोचा असणार. म्हणजे शून्याच्या आधीचा आकडा जाम मॅटर करतो एकूणच. 

येस. शून्याच्या आधीचा आकडा. 
त्यासाठीच सगळे धडपड करत असतील काय?
मी हे लिहितोय तेही त्यासाठीच का?
म्हणजे काहीच नाही तर निदान लिहून तरी बघू असं काहीतरी.

शून्याच्या आधीचा आकडा जास्तच डिप्रेस करून जातो.
तर असोच च्यायला.

म्हणूनच कामूने लिहिलं असणार की - आयुष्य निरर्थक आहे असं लक्षात आलं की ते जास्त चांगल्या प्रकारे जगता येतं. 
निदान शून्याच्या आधी काही तरी असलंच पाहिजे ही निरर्थक धडपड तरी नाही.


निरर्थक.

ही निरर्थकाची रांग लांबच्या लांब
उमजेल जिथे त्या ओळीपाशी थांब
---------------------------------------------------------------------------------
पहाटे दूध आणायला बाहेर पडलो तर जाताना एका घराच्या अंगणात पारिजाताचा सडा दिसला. मस्त वाटलं. फार पूर्वी एक गोष्ट ऐकली होती पारिजाताच्या फुलांची. पारिजातका नावाची राणी सूर्यावर प्रेम करायची. पण जसे पुष्कळ लोकांच्या प्रेमाचे लागतात तसेच तिच्याही प्रेमाचे लागले. सूर्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून मग या राणीने आत्महत्या केली. आणि तिच्या राखेतून मग पारिजाताचं झाड आलं. पण दिवसा तिला सूर्याकडे बघणं अनावर झालं. हे असं झाडांचंही होतं म्हणजे. म्हणून मग हे झाड सूर्यास्तानंतर फुलांनी बहरून येतं आणि सूर्योदयापूर्वी आपली फुलं अश्रुंसारखी गाळून टाकतं. याला म्हणावं खरं प्रेम. च्यायला.


तात्पर्य काय तर झाडंसुद्धा गाळतात. अश्रू.
फरक फक्त इटाकाच की इथे आत्महत्येनंतरचा सडा सुगंधी असतो.

तर याचा आणि वर जे लिहिलंय त्याचा काडीचाही संबंध नाही, नसावा, नसेलच. जे हवं ते घ्या च्यायला. काय फरक पडतो? 
हे लिहिलं कारण मला पारिजातक आवडतो. बाकी शून्य, त्याच्या आधीचे आकडे वगैरे भंकसच. पारिजात आणि त्याचा सडा इटकंच काय ते खरं.

4 comments:

shraddha chorgi said...

इतक्या भारी लेखानंतर टुक्कार reactions/feedback चा column नको हवा होता. काय किंवा खरंच फरक पडतो का? :D

youngvivek said...

शेवटी माझी कमेंट म्हणजे पण काय? शून्यच! ��

Pratik Umbarkar said...

After all remains ZERO.. bhari

abhijit said...

Bhariiiiiiii....हिथं i च्या जागी o टाकू का????????


.मी english मधील O म्हटलं....

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!