Wednesday, October 26, 2011

आणखीन एक युजलेस दिवस

लक्ष दुसरीकडे लागावं म्हणून त्याने पुस्तक वाचायला घेतलं. आना करेनिना. “All happy families resemble one another; Each unhappy family is unhappy in its own way.” पहिलंच वाक्य वाचून त्याने मनातल्या मनात टॉलस्टॉयला शिवी घातली नि डाव्या बाजूचे बंध तुटलेली चप्पल पायात सरकवून घराबाहेर पडला. तसं हे असं तडकाफडकी, कुणालाच न सांगता निघून जाणं नेहमीचच झालेल. त्यामुळे त्याचं असं पुस्तक भिरकावून निघून जाणं कुणालाच खटकलं नाही.
बिल्डींगच्या आवाराबाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या मारुतीकडे पाहून त्याने हात जोडले. सवयीचा भाग म्हणून. तसं म्हटलं तर दिवसातल्या ९० टक्के गोष्टी तो सवयीचा भाग म्हणूनच करायचा. एकदा का माणसाला सवय झाली की जगणं एकदम सोपं होऊन जातं असं पूर्वी कुठेतरी वाचलेल्याचं आठवलं त्याला. नि त्याच्या मनात उगाचच एक वळणदार प्रश्नचिन्ह बनलं. मग गल्लीच्या टोकाशी असलेल्या चांभारापाशी येऊन थांबला. डाव्या पायातली चप्पल काढून त्याच्याकडे दिली नि चप्पल कशी शिवतात ते नीट न्याहाळू लागला. सगळ्याच गोष्टी अशा शिवता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं असा एक विचार उगाच त्याच्यात डोकावून गेला. पण तिकडे त्याने दुर्लक्ष केलं.
मग चप्पल घालून रस्त्याच्या कडेने, आज कुठे जायचं या विचारात चालू लागला. रस्त्यातले दगड पायाने उगाचच इकडे तिकडे उडवत. त्यातला एक दगड घरंगळत बरोब्बर समोरच्या गटाराच्या जाळीतून आत जाऊन पडला. ते बघून तो बेहद्द खूष झाला. एक युजलेस समाधान त्याच्या चेहरयावर पसरलं. जरा पुढे गेल्यावर फुटपाथच्या कडेला झोपलेल्या कुत्र्याकडे त्याचं लक्ष गेलं. आधी त्याला वाटलं जोरात जाऊन त्या कुत्र्याच्या पाठीत लाथ घालावी. पण जरा जवळ गेल्यावर त्याला उगाच त्याची दया आली. त्या कुत्र्याचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला. त्याने मनाशीच म्हटलं, जाऊ देत. हाही कोडगा दिसतोय. लाथ घालण्यापेक्षा कुठल्यातरी बोथट गोष्टीने टोचावं याला. एकवेळ जोराची लाथ कोणी सहन करेलही, पण एकाच गोष्टीने एकाच जागेवर टोचणं नाही सहन होत हे त्याला अनुभवाने माहीत झालेलं.
अचानक तिथेच समोर असलेल्या डोसेवाल्याकडे त्याची नजर गेली नि आपण काहीच न खाता घराबाहेर पडलोय याची त्याला जाणीव झाली. मग तिकडे जाऊन त्याने मसाला डोश्याची ऑर्डर दिली. त्याला उगाच ३-४ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. तेव्हाही असाच दिवस दिवस भटकायचा तो. फक्त तेव्हा खिशात पैसे नसायचे म्हणून उपाशीपोटी. त्यामानाने आता तशी चैनच. त्याने सावकाश डोसा संपवला. त्याच्या एकदम लक्षात आलं की, खात असताना त्याच्या डोक्यात कुठलेच विचार येत नाहीत. म्हणून त्याने अजून एक डोसा मागवला. पोट भरल्यावर त्याला थोडं प्रसन्न वाटू लागलं.
तसाच चालत चालत कबुतरखान्यापाशी आला. तिकडे पसरलेली गर्दी बघितली नि स्टेशनला जायचा विचार त्याने सोडून दिला. इतकी सगळी माणसं बघून त्याला अमाप कंटाळा आला. म्हणून तो जवळच्याच पुस्तकांच्या दुकानात शिरला. काहीतरी छान वाचावं म्हणून त्याने बालकवींचं पुस्तक हातात घेतलं. ते चाळत असताना एका ओळीपाशी त्याची नजर खिळली. निष्प्रेम मनाला कोठेही सुख नाही. मनातल्या मनात पुन्हा एकदा ते वाक्य घोळलं – निष्प्रेम मनाला कोठेही सुख नाही. त्याला बालाकवीन्चा प्रचंड राग आला. म्हणून त्याने चिडून पुस्तक मुद्दाम उलटंच रॅकमधे सरकवलं, मनातल्या मनात एक शिवी हासडली नि तिथून बाहेर पडला.
बाहेर पडल्या पडल्या त्याला आपल्या वागण्याचं एकदम हसूच फुटलं. मागे पाहिलेल्या एका नाटकातलं वाक्य उगाच त्याला आठवलं - Nothing is funnier than unhappiness, it's the most comical thing in the world. And we laugh, we laugh, with a will, in the beginning. But it's always the same thing. Yes, it's like the funny story we have heard too often, we still find it funny, but we don't laugh any more. “खरंच्ये च्यायला !” असं पुटपुटला नि चालू लागला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीत त्याची नजर गेली. तिथे एक जोडपं त्यांच्या गोंडस, गोजिरवाण्या लहान मुलाला भरवत होतं. एरवी त्याला एकदम मस्त वाटलं असतं. कारण लहान मुलं त्याच्या अगदी विशेष आवडीची. पण आता त्याला उगाच सकाळचं वाक्य आठवलं.. All happy families resemble one another.. आता तर त्याला खुपच राग आला. “हा टॉलस्टॉय काय पाठ सोडत नाही भोसडीचा!” असं दात चावून म्हणाला नि समोरच उभी असलेली बस पकडली. कुठली तेही पाहिलं नाही. म्हणून मग २५ चं तिकीट काढलं. ही एक बेस्टने त्याच्यासारख्या माणसांसाठी केलेली सोयच!
बसमध्ये चढल्याचढल्याच त्याला खिडकीपाशी जागा मिळाली नि त्याचा चेहरा एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसरा बनला. कॉलेजमधली एक मुलगी तर त्याला इतक्याचसाठी आवडायची की तिने त्याला एकदा स्वत:हून खिडकीपाशी बसायला दिलेलं. तो मागे जाणारया गर्दीकडे मग टक लावून बघत बसला. त्याचाही कंटाळा आल्यावर दप्तरातून त्याने उगाचच कॅल्कलसचं पुस्तक काढलं नि एका गणितात डोकं खुपसलं. पुढच्या बसस्टॉपला एक तंग फोर्मल्स घातलेली, डोळ्याला गॉगल लावलेली एक मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याच्या हातातल्या पुस्तकाकडे तिने पाहिल्यासारखं केलं नि मग मोबाईलवर काहीतरी टाईप करत बसली. आधीच परफ्युमचा प्रचंड वास त्याच्या डोक्यात गेला होता. त्यात तिने केस मोकळे सोडल्यावरचा सुवास येऊ लागल्यावर तर त्याला अगदीच राहावलं नाही. शेवटी तो उठला. उठताना नकळत तिच्या शर्टाच्या दोन बटणातून त्याची नजर आत शिरली. तसं त्याला स्वत:चीच प्रचंड चीड आली. मागच्या दरवाजाकडे उतरायला जाऊ लागला आणि त्याची नजर समोरच्या पाटीकडे गेली. “कृपया पुढे सरकत रहा.” हे वाक्य त्याच्यासाठीच लिहिलंय असं क्षणभर त्याला वाटून गेलं नि विचारांची एक अख्खी रांग त्याच्या डोक्यातून पुढे सरकली. पुढे जात रहाणं खरंच इतकं सोपं असतं? एकट्याला शक्य असेलही कदाचित, पण सर्वांना घेऊन पुढे जाणं निव्वळ अशक्य. त्यापेक्षा हवं त्या ठिकाणी मागच्या बाजूने उतरणंच बरं, असं ठरवून त्याने धावत्या बसमधूनच उडी टाकली.
बाजूलाच एकदम चकचकीत वातावरण. काळ्या काळ्या काचांच्या दोन उंच इमारती. कुठल्या तरी बड्या विदेशी कंपनीचं आवार. पॉश गाड्या. स्वच्छ रस्ते. युनिफॉर्म घातलेले रखवालदार. बाहेरच्या टपरीवर दिमाखात सिगरेट ओढत खिदळत असलेले तरुण-तरुणी. त्याला उगाच कसंतरी वाटू लागलं. सहजच आवारात लावलेल्या फुलझाडांवर त्याची नजर गेली. सफेद, निळी, गुलाबी, जांभळी अशा बरयाच रंगाची फुलं होती तिथे. इतके सगळे रंग एकत्र पाहून त्याला एकदम ओकारीसारखं झालं. म्हणून त्याने चालण्याचा वेग वाढवला.
लोअर परेल स्टेशनच्या जवळ फूटपाथपाशी आपोआपच त्याचा वेग मंदावला. उघड्यावर मांडलेले संसार, विटांच्या चुलीवर उकळत असलेलं कसलं तरी कालवण, पोटं पुढे आलेली, काळीकुळकुळीत नागवी पोरं, गालहाडं नि कानाशिलाच्या जागी खळगी झालेली म्हातारी सगळं काही शांतपणे बघत तो पुढे चालत राहिला. एरवी त्याच्या डोक्यात भलेमोठे भोवरे तयार झाले असते. न्याय-अन्याय, श्रीमंत-गरीब वगैरे वगैरे. पण आज मात्र त्याला आपण एकदम बारकं असल्याची एक युजलेस जाणिव होत राहिली. पुढे जाताजाता “तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे |” इतकं पुटपुटला नि निर्विकार चालत राहिला.
पुढे एका मॉलपशी येऊन पोचल्यावर त्याला थोडा थकवा जाणवला. तसा तिथेच थोडा वेळ उभा राहिला. बाजूच्या दुकानाच्या काळ्या काचेत बघून त्याने केसांचा भांग नीट केला. त्याचे खोल डोळे त्या काचेत एकदम चमकत होते. त्याला पूर्वी कुणीतरी म्हटलेलं, तुझे डोळे एखाद्या विचारवंतासारखे एकदम पाणीदार आहेत. ते आठवलं अचानक. सारखा विचार केला म्हणजे डोळ्यात पाणी येणारच असं उगाच त्याच्या मनात येऊन गेलं.
मग तसाच त्या काचेत तो एकटक बघत राहिला. आता त्याला त्याच्या जागी एक उच्चशिक्षित प्रोफेसर दिसू लागला. गिरगावात आपण एका मोठ्या फ़्लॅटमधे राहत आहोत, सगळीकडे हसण्याचा, खिदळण्याचा आवाज ऐकू येतोय असं दिसू लागलं. त्याने अनेक सुखवस्तू घरांमध्ये पाहिलेलं तसं चकचकीत, आनंदी वातावरण. इतक्यात काचेमागे काहीतरी हललं नि तो भानावर आला. फिराकचा एक शेर त्याच्या पापणीत भरून राहिला. “दिखा तो देती है बेहतर हयात के सपने.. खराब हो के भी ये जिंदगी खराब नही.” काय पर्फेक्ट ठिकाणी आपल्याला हा शेर आठवला याचं आणखीन एक युजलेस समाधान त्याच्या भुवईवर उमटलं.
तिथून निघताना त्याला स्वत:चा चेहरा अगदी स्पष्ट त्या काचेत दिसला. वर आलेली गालहाडं, लांबत बनत चाललेला चेहरयाचा आकार, खोल खोल आणि तरीही स्वप्नाळू डोळे हे सगळं बघून अगदीच थकून गेल्यासारखं वाटलं. पण अजून बराच दिवस शिल्लक होता. मग रस्त्याच्या कडेला जाऊन, गटारापाशी छाती दाबून तो खोकू लागला. शेवटी कफाचा एक मोठा बेडका थुंकल्यावर त्याला थोडं बरं वाटू लागलं. थोडीशी गिचमीड कमी झाल्यासारखी वाटली. मग चर्चगेटची बस पकडली नि शेवटच्या स्टॉपला उतरला.
तिथून चालत चालत मग मारीन ड्राईव्हवर. अथांग पसरलेला अरबी समुद्र त्याला प्रचंड आवडायचा. इतका की माणसं, पुस्तकं आणि समुद्र यातलं काय जास्त आवडतं असं जर कोणी विचारलं असतं तर त्याने जराही वेळ न लावता समुद्र असं उत्तर दिलं असतं. बुडत चाललेला लालातांबुस सूर्य आणि तसंच पिवळसर तांबूस, अस्थिर पाणी, दूरवर आपल्याच नादात हलत असलेल्या होड्या, समुद्राच्या आतापर्यंत घुसलेली जमीन, मोठमोठाले दगड, उंचच्या उंच वाढलेल्या इमारती, भरधाव चाललेल्या आलिशान गाड्या.. हे सगळं बघून त्याला अजूनच बारकं बारकं वाटू लागलं. मग बराच वेळ तो दगडांपाशी येऊन फुटणारया लाटांकडे एकटक बघत बसला. त्या लाटांचं असं संथपणे एकामागून एक येणं, दगडावर आदळून फुटणं, फेसाळणं आणि गडप होणं या सगळ्याचा त्याला विलक्षण हेवा वाटू लागला. सर्वांनाच कुठे सापडतात असे किनारे असा एक विचार उगाच त्याच्या मनात आला, पण तो त्याला तितकासा प्रिय वाटला नाही. म्हणून कपडे झटकून तो चालायला लागला. पुन्हा एकदा दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशाने भरून राहिलेले रस्ते, हवेत भरून राहिलेला खारट वास आणि गाड्यांचा गोंगाट हे सगळं साठवून घेतलं नि समुद्राचा निरोप घेतला.
मग चालत चालत फौंटनजवळ येऊन पोचला. एक वडापाव पोटात ढकलला, उसाचा रस प्यायला नि कामावरून सुटलेल्या, घाईघाईने परतणारया लोकांचे चेहरे बघत बघत सी.एस.टी.ला येऊन पोचला. ठाण्याला जाणारी ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणे त्याला चौथ्या सीटवर बसायला मिळालं. यापलीकडे तो कधी अपेक्षासुद्धा नाही करायचा. समोरच एक जोडपं उभं होतं. ती बाई त्या माणसाला ट्रेनमधल्या गर्दीवरून बडबडत होती. ट्रेनऐवजी टॅक्सीने गेलो असतो तर असं काहीतरी चालू होतं त्यांचं. मग किंचित रडारड. मग ती बाई गप्पच बसली. तिचा नवरा बरंच समजावत होता आणि तिचं मौनव्रत. बोलणारया माणसांपेक्षा न बोलताच माणसं जास्त दुखावतात हे पुन्हा एकदा त्याला पटलं. त्याला पुन्हा टॉलस्टॉय आठवला. मग पुन्हा टॉलस्टॉयला शिवी. अर्थातच ती बाई दिसायला बरयापैकी होती म्हणून तो आपुलकीने ते सगळं इतका वेळ बघत होता. एरवी ट्रेनमधल्या माणसांचे मरगळलेले चेहरे त्याला नकोसे होऊन जायचे. पण त्याहूनही त्याला सतत आनंदी दिसणारे, चेहरयावर दु:खाची एकही रेष नसलेले लोक आणखीन परके वाटायचे. स्टेशनवर उतरल्यानंतर त्याने सरळ घर गाठलं.
घरात शांतता होती. आश्चर्यच. त्याने थोडं खाकरल्यासारखं केलं. फुकट गेलं. कोपरयात पाहिलं तर टॉलस्टॉयचं पुस्तकं तसंच दुमडून पडलेलं. ते उचललं, सरळ केलं नि कपाटात ठेऊन दिलं. मग खिडकीपाशी जाऊन चिमण्यांचं घरटं बघत बसला. त्या तरी चिवचिव करतील असं वाटलं त्याला. पण तिथेही नुसताच शुकशुकाट. खिडकीत लावलेलं तुळशीचं रोपटं अगदीच सुकून गेलंय हे त्याच्या लक्षात आलं. पण ते त्याला तितकंसं महत्त्वाचं वाटलं नाही. मग थोड्या वेळाने स्वयंपाकघरात जाऊन जेवण घेतलं. पोटात ढकललं. गॅलरीत बराच वेळ येरझारा घातल्या. मग डायरी काढली. तारीख टाकली आणि नोंदवलं –
आणखीन एक युजलेस दिवस!
-------------------------------------------------------------------------------
शतानंद
मन करा रे प्रसन्न / सर्व सिद्धीचे कारण /
मोक्ष अथवा बंधन / सुखसमाधान इच्छा //

0 comments:

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!