Showing posts with label Nostalgia. Show all posts
Showing posts with label Nostalgia. Show all posts

Wednesday, December 20, 2017

Blankest Year

आज काहीतरी शोधताना जुनी डायरी सापडली. त्यात शेवटून दुसऱ्या पानावर ही कविता. कविता नाही फक्त ट ला ट.
Hunger Lining

आलिशान हॉटेलात बसून
welfare economics च्या
चर्चा करणारी मंडळी
acidity होईल म्हणून
ताटातलं अर्ध अन्न
तसंच शिल्लक ठेवतात...

आणि hunger indexच्या
आकडेवारीच्या कागदावर
कालचा शिळा भात आणि
उरलेली डाळ कालवत
रस्त्यावरची अर्धपोटी पोरं
आनंदाने जेवतात...
३० डिसेंबर,२०११

तेव्हा नुकतंच लाल शाईचं फौंटन पेन घेतलं होतं, त्याने लिहिलेली. तेव्हा काही महिने फार वापरली लाल शाई. आता काळी किंवा निळीच वापरतो. अर्थात कुठल्याच रंगाने तसा काही फार फरक पडत नाही. अक्षर जसं यायचं तसंच येतं. विचार मात्र बदलू शकतात कदाचित. असो. त्यावेळेस कुठलं तरी poverty वरचं पुस्तक वाचलेलं, म्हणून लिहिली असावी. कुठलं पुस्तक तेही आता आठवत नाही च्यायला. तसंही पुस्तकाच्या पानांमधून गरिबी समजून घेणं ही चुत्येगिरीच. आणि त्यावरून ट ला ट जुळवत बसणं ही आणखीन मोठी चुत्येगिरी. असो.

नुकतंच एक मैत्रीण म्हणाली तू इतक्या शिव्या देत जाऊ नकोस, फार बरं नाही दिसत ते म्हणून. तर मी म्हटलं बरं. पण खरं तर तिने असं म्हटल्यावर एकदम हुतुतूतले आदी(सुनील शेट्टी) आणि पन्ना(तबू) आठवले.
आदी – गाली मत दिया कर यार. तेरे मूंह से अच्छी नही लगती.
पन्ना – क्यों किस करता है तो बास आती है क्या?
       ... तो तू सिगरेट छोड दे.
आदी - ... अच्छा एक बात बता ये सिगरेट पेहले आयी या करप्शन?
पन्ना – सिगरेट.
आदी – कैसे?
पन्ना – सिगरेट में नशा है. नशेमें power है. Power में करप्शन.
च्यायला हे खरं लॉजिक. नाहीतर mathsमध्ये शिकवतात ती नुसती भंकस.
तिला विचारणार होतो तू हुतुतू पाहीलायस का? पण म्हटलं जाऊ देत च्यायला. नसेल पाहिला तर बरंच आहे. असले उदास करणारे सिनेमे खरं तर सेन्सॉर बोर्डाने येऊच नाही दिले पाहिजेत. पण आपलं सेन्सॉर बोर्ड येडझवं आहे. छान इंद्रियं चाळवणारे सिनेमे नको तेवढं कापतं आणि असले उदास करणारे सिनेमे मात्र येऊ देतं.

च्यायला परत शिवी! मी आता एक नियम बनवणारेय की किमान १० वाक्यांच्या मध्ये एकही शिवी लिहायची नाही. मग हे जमलं की २० वाक्यं. मग ३०.. ५०.. १००.. १०००.. १००००.. १ लाख.. १ कोटी.. १ अब्ज..
भेन्च्योद. इतकं कोण लिहिणार?

पण हुतुतूतला आदीचा एक dialogue मात्र मला फार आणि केव्हाही आठवत राहतो.
‘इन हंडीयो में सवाल बहोत उबलते है. ठीक कहते है वो, इस जनरेशन के पास सवाल बहोत है, जवाब कोई नही. जियो तो इस जहर भरे, करप्शन भरे माहोल में या फिर मर जाओ. साफ सुधरी हवा खाने के लिए जाएंगे भी तो कहा? पैसा, रुपया, आराम – आराम है मुझे? मेरा तो दम घुट रहा है. बस जी रहा हूं. जैसे कोई वक्त पुरा कर रहा हूं --- ’

च्यायला प्रत्येक वर्ष संपताना ही जाणीव अधिकाधिक तीव्र का होत जाते? कुठेही असलो, कुणाबरोबरही असलो तरी डोक्यात हेच..
बस जी रहा हूं. जैसे कोई वक्त पुरा कर रहा हूं ---

जाऊ देत पण हा विषय. जाऊच दे च्यायला---
विषय. वर्ष. आणि विष.
तिन्हीत व आणि पोटफोड्या ष कॉमन. आणि तीनही पचवणं जाम जाम अवघड.
तर विषय त्यातल्या त्यात बरा. कारण तो बदलता तरी येतो. वर्ष तर बदलत राहतातच. नकळत. आणि विष बदलून काय उपयोग? असो.

डायरीच्या सुरुवातीला ग्रेसच्या चंद्रमाधवीचे प्रदेश मधल्या कविता लिहिलेल्या. तेव्हा लायब्ररी लावलेली आणि दर महिन्याला पैसे लागतात म्हणून केवढी तरी पुस्तकं वाचायचो. आवडलं काही की जागून डायरीत उतरवून काढायचो. आता पुस्तकं विकत घेतो आणि कपाटात ठेवून देतो. तर ही फालतुगिरीच. तर त्यात ही कविता सापडली –
जे सोसत नाही असले
तू दु:ख मला का द्यावे
परदेशी अपुल्याघरचे
माणूस जसे भेटावे
मिटल्यावर डोळे मजला
स्मरतात निरंतर नाद
हाकांना मागावे का
त्यांचेच जुने पडसाद?

पडवीच्या देखाव्यातून
दिसतात मनाचे खांब
क्षितिजाच्या जवळी जाता
ते पुन्हा पसरते लांब ---
फार फार फार भयंकर कविता आहे ही. ऐकली की कुठे तरी भलतीकडेच नेऊन सोडते. भलतीकडे तरी ओळखीच्या ठिकाणी. जिथे बाजूला समुद्र वगैरे असतो. बेक्कार खवळलेला. लाटांचा आवाज. एखाद्या ओळखीच्या लयीत. आणि मग समोर तू.
आता अचानक भेटलोच आहोत तर थोडे मनसोक्त तरी भेटू.

थोडे आणि मनसोक्त? तस्साच आहेस बघ अजून.

दाढी वाढलीये ना पण.

उपयोग काय त्याचा. दाढी नाही, दाढ वाढायला हवी. अक्कल दाढ.

आलीये हां तीसुद्धा. बरीच वर्षं झाली आता.

(समुद्राकडे पाठ करून) हो बरीच वर्षं झाली. केवढा बारीक झालायस आणि. नीट जेवत जा बघू. आणि पुस्तकं थोडी कमी वाचत जा किंवा बेस्ट म्हणजे वाचूच नकोस. वर्षभर तरी.”

“हो.”

“समुद्राकडे नाही, माझ्याकडे बघून सांग.”

“हो गं.”

“आणि लिहितोस का अजूनही?

हो थोडं फार. आणि तू?

नाही.

का?
-----
बस्स. इतकंच.
मग पुन्हा लाटांचा आवाज. प्रचंड. फार फार जीवघेण्या लयीत.
च्यायला अर्धवट राहिलेल्या भेटी फार फार छळतात. स्वप्नातल्यासुद्धा! असो.

एक दिवस ना मी NCPAवरून समुद्राच्या कडेकडेने चालत जायचं ठरवलंय. बघू तू भेटतेयस का ते...

तुझ्यात अरण्य, मला सापडावे
माझे मीच व्हावे, अश्वत्थामा |
फिरताना आणि होता तुझी भेट
हृदयात थेट, जावी कळ |

जाऊ देत च्यायला. When you have finished with others, that is my time.
मी आता शहाण्या मुला सारखा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसणारे.. मरेपर्यंत!
च्यायला मरेपर्यंत काय?
तर मी हे लिहिणार नव्हतो. म्हणजे असं काही मी कधी बोलतसुद्धा नाही. पण ते नुकतीच अमृता आणि इमरोझची पत्रं वाचतोय म्हणून इतकं पाणचट लिहिलं असावं. तरी बरं ग्रेस एवढाच कळतो ते. अज्ञानात सुख असतं(?) असं म्हणतातसुद्धा. असो.

त्यापुढे मग पाब्लो नेरुदाची एक कविता.
I can write the saddest lines tonight
I loved her, she loved me too.

मला का माहीत नाही पण नेहमी या ओळींबरोबर १९८४ मधल्या पण ओळी आठवतात
Under a spreading chestnut tree
I sold you, you sold me.

आणि मग कमालीची उदास होते. मग उगाच जुनं सगळं चालू होतं डोक्यात. असं झालं असतं तर किंवा, तसं झालं असतं तर वगैरे. मग ते पण लक्षात कोण घेतोच्या शेवटी असलेलं वाक्य
Of all sad words of tongue or pen,the saddest are these, 'It might have been.म्हणून मला तुझा पाब्लो आवडत नाही. तो वाचल्यावर अपोआप लिहिल्या जातात saddest lines.

पण मग कधी कधी वाटतं की हे असं लिहिणं हे खरं तर तितकंसं वाईट नाहीये. इतर कुणाला वाटत असेल काय काय. पण मला मात्र आवडतं हे. कदाचित हे मीच माझी माझी समजूत घालणंही असेल. पण तरी त्यानिमित्ताने तुझी आठवण येत राहते. मी जगत असतो पुन्हा पुन्हा तुला. भेटत असतो तुला. बोलत असतो तुझ्याशी. 

एक मित्र म्हणाला मध्ये, तू विपश्यनेंला जा म्हणून. विपश्यना का करतात माणसं? विचार घालवायला? छे मला हाच विचार सहन नाही होत. मला तुझा विचार करून कंटाळा किंवा डिप्रेशन नाही येत. I dont feel hurt when I think of you. उलट खूप मस्त वाटतं. तू मला केवढ्या गोष्टी शिकवल्यास. प्रेम ओळखायला, प्रेम करायला. सर्वांवर. स्वत:वर सर्वात जास्त. तू भेटण्याआधी केवढे न्यूनगंड होते माझे माझे. तुझ्या सोबत राहिल्यावर सगळे गळून पडले एक एक करून. आता परतलेत बरेच. पण तरी मी प्रेम करणं नाही थांबवलं. कुणाशीही बोलताना, भेटताना मी शोधत बसतो तुला. कुणाची हनुवटी, कुणाचे केस, कुणाचा स्वभाव, कुणाचं बोलणं आणि काय काय. तुझी जराशी जरी झलक सापडली की मी प्रेमात पडतो त्यांच्याही. म्हणजे खरं तर तुझ्याच. पुन्हा. नव्याने. सोसलेला, पाहिलेला, जगलेला सगळा कडवटपणा नाहीसा होऊन जातो मग. तुला अमृता आवडायची ना. मला फक्त तिच्या या ओळी आवडतात. मनापासून.

नजर के आसमान से
सुरज कहीं दूर चला गया
पर अब भी चांद में
उसकी खुशबू आ रही है

तेरे इश्क की एक बूंद
इस में मिल गई थी
इस लिए मैने उम्र की
सारी कडवाहट पी ली...

किरण नगरकरांची मध्ये एक मुलाखत वाचली. त्यात ते म्हणतात, एखादी व्यक्ती बेपत्ता झाली म्हणून आपण तिच्याशी बोलणं थोडंच थांबवतो? कित्ती खरंय हे. मला हे वाचून तुझी इतकी आठवण आली म्हणून सांगू. मी आजही तुझ्याशी इतकं बोलत असतो. सतत. आणि आता फोनच्या बिलाची काळजीसुद्धा नाही करावी लागत. तुला आठवतंय आपण अगदी सुरुवाती सुरुवातीला भेटलेलो आणि मिसळ खायला म्हणून एका टेबलवर बसलो होतो. कॅंटीनमध्ये. तू माझाच चमचा घेतलास. आणि मी अजून एक चमचा घेऊन आलो तू उष्टा केलास म्हणून. म्याड होतो न मी केवढा. नंतर २ महिन्यातच तुझ्या रूमवर आपण मॅगी खाल्लेली. एकाच टोपात. बोटांनी. एकमेकांच्या. मी दिवसभर उपाशी असलो आणि रात्री तरीही जेवणाचा कंटाळा आला की अजूनही करतो मॅगी. आणि तसच बोटानीच खातो. पोट भरत नाही. पण मन भरून जातं एकदम.
तुला शाहीद कपूर आवडायचा म्हणून मी मॅडसारखा आजसुद्धा त्याचा प्रत्येक चित्रपट बघतो. मला तो मुळीच आवडत नसूनही. फर्स्ट डे, फर्स्ट शो. दोन तिकिटं काढून!

 परवा इराण्याच्या हॉटेलात मैत्रिणीसोबत बसलेलो असताना, तिच्या हातावर एकदम लांबलचक मेंदी पाहिली आणि उगाच तुझी आठवण आली. भयंकर. मग तिच्याशी बोलताना अख्खा वेळ बॅकग्राऊंडला ही कविता.
तू डोके मांडीवरती
ठेवून दीर्घ बिलगावे
अन् खोल अंतराळात
ध्रुवाचे तुकडे व्हावे

तुकड्यांना जमवित असता
बुबुळांत शिरावी नीज
अडकावा चंद्र गळ्याशी
हृदयात भरावी वीज

वीजेने तुटला थेंब
पसरावा फरशीवरती
मेंदीभरल्या बोटांनी
रोखावी नकळत भरती

भरतीच्या वेळी तूही
लाटांचा घेत निरोप
दारातिल उचलुन न्यावे
तुळशीचे हिरवे रोप...
मला ही कविता कित्ती आवडते तुला माहितीये. लोकांना उगाच उदासवाणी वगैरे वाटते. मला नाही वाटत तसं. तुला आठवतंय आपण एकदा रात्री बसने जात होतो, थंडीच्या दिवसात. आणि तू माझं जॅकेट घातलं होतंस. मी इतकी वर्षं झाली तरी अजून वापरतो ते. विरलंय आता थोडं. बाईकवरून जाताना रात्रीचा गार वारा हळूच शिरत राहतो सारखा त्यातून. पण तरीही मला अगदी मस्त वाटत राहतं. उबदार एकदम. आठवणींमध्ये केवढी ऊब असते ना... त्यांचा त्रास कसा होईल?

Infact तुझी आठवण मला शांत करते, माणसांत परत आणते. तुझ्या विचारांचा त्रास नाही होत. बघ तुझा उल्लेख आल्यापासून एकही शिवी नाही लिहिली इथे. कदाचित इतकी वर्षं झालीत म्हणून असेल किंवा कदाचित मी बऱ्यापैकी mature वगैरे झालो असेन(!) आता म्हणूनही. पण आठवणीचा त्रास नाही होत. त्रास जे पुढ्यात वाढलंय ना त्याचा होतो. नाही पचत. नाही रुचत. बदलताही येत नाही. म्हणून सगळा त्रास. त्यात मला ही अशी दिवस दिवस उपाशी राहायची सवय. कितीही अजीर्ण झालं, नॉशिअस वाटलं तरी पुढ्यात जे वाढलंय ते संपवायचंच. हा च आवडत नाही बघ मला. हे असं जबरदस्तीने ताट संपवणं मी लहानपणीसुद्धा केलं नव्हतं. मागे ८वीत असताना एका मित्राच्या घरी गेलेलो, तर त्याच्या बाबांनी पुढ्यातला चिवडा नको म्हटलं तरी संपवायला लावला होता. तेव्हापासून मी त्याच्या घरी परत गेलोच नाही. पण इथे तसं नाही करता येत, म्हणून मग त्रास.

च्यायला, हे पुढ्यात वाढलेलं ताट संपवण्याला पर्याय नाही. नाहीच मुळी. मग तुम्ही विपश्यनेला जा, देवळात-मशिदीत-चर्चमध्ये जा, कीर्तन करा, पोथ्या वाचा, पुस्तकं वाचा, कविता लिहा, नाटकाला, सिनेमाला जा, समुद्रावर जा, पर्वतांवर जा, माणसांत फिरा, नाहीतर गुहांमध्ये राहा, मरेपर्यंत काम करा किंवा रीकामचोट पडून राहा, लग्न करा/करू नका, पोरं काढा/काढू नका, संन्यास घ्या, प्रेम करा, लफडी करा, सेक्स करा, हस्तमैथुन करा, दारू प्या, सिगरेट ओढा, जॉइंट मारा, कामाठीपुऱ्यात जा, पोरींसोबत झोपा- ५० वर्षाच्या,३० वर्षाच्या, १६ वर्षाच्या, १० वर्षाच्या किंवा गर्भाशयातल्या, ते नाही पुरलं तर पोरांसोबत झोपा, मग हिजड्यानसोबत पण झोपा, नाही तर मग प्रेतांसोबत झोपा, दुर्लक्ष करा, शिव्या घाला. काहीही करा. पण हे लक्षात असू दे - पर्याय नाही म्हणजे नाहीच.
The only way out is through.
च्यायला हे Robert frost ने आधीच लिहून ठेवलंय. कवी होता ना साला. कुठल्या ना कुठल्या पॉईंटला लक्षात आलंच असेल त्याच्याही.
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे

बघ तुझी आठवण बाजूला काढली की काय काय बाहेर पडतं ते. जाऊ देत पण. प्रत्येक वर्षं संपताना हे असं होत राहातंच. रोज मरे त्याला कोण... १० वर्षांपूर्वी बरोब्बर ३१स्ट डिसेंबरलाच एक गाणं ऐकलेलं. नादा सर्फ या माणसाचं. Blankest year म्हणून. फार फार आवडतं मला ते.
Oh, fuck it
Im gonna have a party

I had the blankest year

I saw life turn into
a T.V. show
It was totally weird
The person I knew I didnt really know

Time don
t move
Were the only ones who do
Bending reason
Cause its all we hold on to

Oh, fuck it
(fuck it)
Im gonna have a party
Oh, fuck it (fuck it)
Im gonna have a party
तेव्हापासून दर ३१स्टला हे गाणं ऐकतो मी. कुठेही असलो तरी.
लावून बोचरे हळवेसे संगीत
ठेवतो स्वत:ला दिवसरात्र गुंगीत
रोखावा अलगद श्वास गळा दाबून
तशी सर्व मनाला मारत जाते धून

मरो च्यायला. मरोच.

पुढल्या वर्षीसाठी मी संकल्प करणारे – काही म्हणजे काहीच वाचायचं नाही. लिहायचंही नाही. कवितापण नाही. कुण्णाकुणाला भेटायचं नाही. फक्त फिरायचं. NCPAपासून. चालत चालत. समुद्राच्या कडेकडेने. समुद्र नेईल तिथे तिथे... 

Saturday, May 28, 2016

बॅकग्राऊंडला वाजत राहणारी भिकारचोट गाणी...

सकाळी उठल्यापासून(मी) ते रात्री झोपेपर्यंत(मीच) किंवा त्यानंतरही.. म्हणजे स्वप्नातल्या स्वप्नातही झोपेपर्यंत, मेंदूच्या कुठल्या तरी रिकाम्या कोपऱ्यात मला सारखी काही गाणी वाजताना ऐकू येतात.
सतत.
वर्षानुवर्षे.
दिवसेंदिवस.
तासन तास.
क्षण न क्षण.

च्यायला यापेक्षा जास्त डिटेलमध्ये आपण घुसुच नाही शकत कशाच्या? म्हणजे आपण फार फार तर क्षणापर्यंत पोचू शकतो. दोन क्षणांच्या मधल्या भागात नाहीच. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या प्रत्येक क्षण सोबत वगैरे राहू. पण त्या क्षणांच्या मधल्या गॅपमध्ये पुन्हा सगळे भयंकर एकटेच. जाऊ दे पण, उगाच च्यायला तत्त्वज्ञान वगैरे.

तर मुद्दा हा की, माझ्याही नकळत मग मी ती गाणी गुणगुणायलाही लागतो.
हाहाहेहेहंहूहू.. डाडाडेडेडंडूडू... गागागेगेगंगूगू... -- शी च्यायला, चुत्येगिरी नुसती
--
अर्थात त्यातली बरीचशी गाणी मी सवयीनेच गुणगुणतो. उदाहरणार्थ सकाळी कुंथत बसलेलं असताना मला ‘हे भलते अवघड असते’ या गाण्याशिवाय प्रेशरच येत नाही आणि मग आपोआप मागे गुणगुण सुरु होते –
हे भलते अवघड असते..
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहिसे लांब होताना...

डोळे पाणावतात एकदम. च्यायला संदीप खरे ग्रेट आहे. याच्यामुळे सकाळची एक सिगरेट कमी झाली. आता त्या प्रमाणात माझं आयुष्य वाढणार. तर मग ही सिगरेट कम्पेनसेट करायला आता मध्यरात्री वगैरे उठलं पाहिजे. तर त्याआधी झोपायलाही हवं. तर असो.

आता मी टी.व्ही. बघतोय आणि त्यात वर्षभरापूर्वीच्या योगासनं, मोदी, मुस्लिम वगैरे चोथा झालेल्या विषयावर परत चर्चा चालुये. म्हणजे मुस्लीमान्कडच्या लोकांचा याला विरोध, कॉंग्रेसकल्यांचा त्यांच्या विरोधाला सपोर्ट, डाव्यांकडून मोदी कंपनीचा निषेध आणि भाजपाकडल्यांचा यांच्या विरोधाला आणि त्याहून त्यांच्या सपोर्टला कडाडून वगैरे विरोध. चुत्येगिरी नुसती. च्यायला जाऊ दे पण, उगाच राजकारण वगैरे. 

तर मुद्दा हा की टी.व्ही. चालू असतानाही मला उगाच गाणी ऐकू येतात – गोली मार भेजेमें वगैरे. गुलजार च्यायला. हा माणूस भन्नाट आहे. हा माणूस आपला बराच वेळ फुकट घालवतो. म्हणजे याला मानला पाहिजे. कसलं लिहितो साला-

याद है, एक दिन
मेरे मेज पे बैठे-बैठे
सिगरेट की डिबिया पर तुमने
छोटे-से इस पौधे का
एक स्केच बनाया था!

आकर देखो,
उस पौधे पर फूल आया है!

हाय गुलजार! हे असं लिहिणारा माणूस गोली मार भेजेंमें पण लिहू शकतो हे खरंच थोर आहे. हे जमायला हवं. काय जमायला हवं? गोळी मारायला कि गाणं लिहायला? दोन्ही अशक्यच—असो. 

मुद्दा काय तर सिगरेट आणि गुलजार हे कॉंबिनेशन अफलातून आहे. संध्याकाळी मी कधी चुकून मरीन लाईन्सला गेलो आणि चुकुनच सिगरेट मारायला लागलो की छातीच्या भयंकर जोरात ठोक्यामधून हे गाणं धडधडत राहातं –

दिल में कुछ जलता है, शायद धुआँ धुआँ सा लगता है
आँख में कुछ चुभता है
, शायद सपना कोई सुलगता है
दिल फूँको और इतना फूँको
, दर्द निकल जाए
इतना लंबा कश लो यारों, दम निकल जाए-------

प्रिय गुलजार, खरंच होऊ शकतं का असं? जाऊ देत च्यायला. तबू कसली दिसते पण या गाण्यात. ती तर अजून पण क्लासच दिसते. त्यात आता भरलीये पण कमालीची. तर असो.

हा गाणी ऐकू येण्याचा प्रकार केव्हा चालू झाला नक्की आठवत नाही. पण बहुतेक मी १०वीला असताना असावा. तेव्हा शाळेत संध्याकाळच्या वेळी almost रोज अदनान सामीचं ‘कभी तो नजर मिलाओ’ गाणं खिडकीतून ऐकू यायचं – कसलं तूफान आवडायचं मला तेव्हा ते. असं वाटायचं हे गाणं माझ्यासाठीच लिहिलंय – म्हणजे ते जो नही कहा है कभी तो समझ भी जाओ वगैरे. असो पण. शाळा कॉलेजमध्ये आपण कसे होतो वगैरे डोक्यात आलं की उगाच nostalgic वगैरे व्हायला होतं.

नंतर १२वीला असताना गुरुदत्तचा प्यासा पाहिला आणि “ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है” हे इतकं भयंकर आत रुतलं की कुठल्याही प्रसंगी, विशेष करून लोकांच्या मते आनंदाच्या वगैरे प्रसंगी हमखास हे गाणं चालू होतं बॅकग्राऊंडला. गुरुदत्त मागे उभा राहून शाल घेऊन, दोन्ही हात पसरून ओरडत असतो पण कोणाला काही नसतं त्याचं.शेवटी तोच कंटाळून जातो. 

या पिक्चरच्या शेवटी गुरुदत्त वहिदाला घेऊन कुठे तरी दूर निघून जातो. मला ही जागा बघायचीय च्यायला. या जागेचा पत्ता सापडायला हवा यार. सापडेलही कधीतरी.. पण मी कोणासोबत जाणार? किंवा माझ्यासोबत कोण येणार?फारफार तर सिनेमा, समुद्र किंवा एखादा ट्रेक अशा भंपक ठिकाणी येईलही कोणी, पण या असल्या ठिकाणी कोण मरायला येइल? गुरुदत्त you are a lucky man यार...

नंतर असंच एकदा रेडीओवर नूर जहानचं गाणं ऐकलं –

लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे
अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजे
और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा
मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना मांग 

आयचा घो त्या फैजच्या! (फैज की फैझ?) हे गाणं कुणीही वयाच्या १८व्या वर्षी ऐकू नये. निघता निघत नाही डोक्यातून(की डोळ्यातून). भेन्चोद – फैज डिझर्व करतो साला ही शिवी – तेव्हापासून ते आतापर्यंत मी फैज आणि नूर जहान दोघांच्याही वेड्यासारखा प्रेमात पडतो अधूनमधून...

मी कधी जरा बऱ्या मूडात असलो की कुमार गंधर्व बॅकग्राऊंडला चालू होतात. कुमार आणि अनिल हे भन्नाट कॉकटेल आहे. ट्रेनमधून जाताना कधी विंडोसीट मिळाली की मागे कुमारांचं गाणं चालू होतं ‘उड जायेगा...’ वगैरे. 

हे हे विंडोसीट मिळणं म्हणजे पण आनंदाचाच क्षण. आणि तसंही मला प्रवास करताना खिडकीपाशी बसायला फार आवडतं. इन्फॅक्ट कॉलेजला असताना मी वर्गातल्या एका मुलीच्या चक्क प्रेमात पडलो होतो काही दिवस, तिने स्वत:हून मला खिडकीपाशी बसायला दिलेलं म्हणून. तर असो. 

मुद्दा काय तर एक फुफ्फुस घेऊन, कुमार तुटक तुटक असं जे गातात ते इतर कोणाहीपेक्षा खूप जवळचं वाटतं. तसंही मला तुटक तुटक, अपूर्ण गोष्टीचंच भारी वेडय पहिल्यापासून. तर रेल्वेच्या खिडकीच्या जाळीमधून दिसणारी तुटक तुटक झाडं, इमारती, पोस्टर्स पाहिले की अपोआप कुमारांची गुणगुण सुरु होते. ट्रेनच्या खिडकीतून मग माझं  जगदर्शन चालू होतं.. तर आता हे लिहिताना माझ्या लक्षात आलं की माझ्या लायब्ररीतल्या खिडक्यानाही अशा जाळ्या लावल्यायेत नि त्यातून समोरची इमारत, फौंटनचा रस्ता, त्यावरची माणसं आणि निळंपांढरं आकाश तुटक तुटक दिसतं. तर कोणी म्हणेल त्यात काय एवढं? ते तर संडासच्या खिडकीतून पण दिसतं. तर खरच्ये ते.

हां पण समजा ट्रेन पूर्ण रिकामी असेल तर मात्र मी दरवाज्याशी उभा राहतो. एका हाताने दांडी पकडून दुसऱ्या हाताच्या बोटांनी मी ट्रेनचा दरवाजा वाजवत सुटतो आणि मग फार भयानक गाणी वाजत राहतात. म्हणजे माझं कराओके आणि गाणारे मेहदी हसन, बेगम अख्तर, रफी, तलत, मुकेश, लता, किशोर,सोनू, कुमार सानू वगैरेपैकी कोणीही किंवा सगळेच.

जनरली हा प्रकार रंजिश ही सही पासून सुरु होतो. पुरेशी स्टेशन्स मागे पडली की मग बेगम अख्तर चालू होते –

आप को प्यार है मुझ से के नहीं है मुझ से
जाने क्यों ऐसे सवालात ने दिल तोड़ दिया

हे गाणं १०-१२ वेळा तरी रिपीट मोडवर चालू राहातं आणि त्याच्या अधेमधे मग इतर गाणी. अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का वगैरे.

जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता था.. हे गाणं आलं की मात्र बाकी गाणी बंद. रिस्पेक्ट एकदम. च्यायला नुकताच एका मित्राच्या लग्नाला गेलेलो, तर त्याच्या वरातीत हे गाणं वाजवत होते. आणि वर लोक त्यावर नाचत पण होते. लोक येडझवे असतात. त्यातही लग्नांमध्ये घोड्याच्या आजूबाजूला नाचणारे तर आणखीनच च्यायला. हेहे गुगल सजेशन मध्ये येडझवे दाखवतंय हे बेस्ट आहे. असो.

लता मात्र एकदा आली की डोळ्यातून एखादा तरी थेंब निपटून काढतेच. लताचं तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा हे चालू झालं की बंदच होत नाही काही केल्या. इन्फीनाईट मोडवर चालूच राहातं. खास करून ट्रेकला वगैरे गेलो आणि उगाच खूप साऱ्या पायवाटा वगैरे दिसल्या की लता गुणगुणू लागते

इन रेशमी राहो में, एक राह तो वो होगी
तुम तक जो पहुचती है, इस मोड़ से जाती है...

च्यायला परत गुलजार.
गुलजार एके गुलजार.
गुलजार दुणे गुलजार.
गुलजार रेस टू गुलजार.
गुलजार रेस टू इन्फीनीटी.
हा व्यापून राहिलाय सगळं.

तू मुंबई सोडताना फोन केला होतास माझं पॅब्लो नेरुदाचं पुस्तक तुझ्याकडे राहिलंय म्हणून. तेव्हा या गुलजारने केवढं छळलं होतं मला. काय तर म्हणे

एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गीले, सूखा तो मैं ले आई थी
गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो--------

जाऊ देत. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है? निरोपाच्या प्रसंगांबद्दल मला फार बोलायला आवडत नाही. पण का माहित नाही पण निरोपाच्या कुठल्याही प्रसंगी मला गीता दत्तचं एक गाणं कायम विळखा घालून बसतं—

मुझे जाँ ना कहो मेरी जाँ
मेरी जाँ, मेरी जाँ

जाँ ना कहो अनजान मुझे
जान कहा रहती है सदा
अनजाने क्या जाने, जान के जाए कौन भला

मला पूर्वी याचा अर्थ कळायचाच नाही. म्हणजे साधारणतः २५व्या वर्षी माणूस जितका बावळट(म्हणजे चुत्या) असतो त्यापेक्षा मी जरा जास्तच बावळट(म्हणजे चुत्या) होतो म्हणूनही असेल. पण जेव्हा या गाण्याचा अर्थ कळला, तेव्हा हे गाणं अगदी अंगावर आलं. त्यातल्या अर्थासकट. पण असो. निरोपाविषयी फार बोलू नये माणसानं...

समुद्राला लागून असलेल्या गल्ल्यांमधून निरुद्देश भटकत राहाणं हा प्रकार मला फार आवडतो. निरुद्देश. कसला भारी शब्दये हा. भारी. हेहे. तर मुद्दा हा की अशा वेळी हमखास किशोर- आर.डी.ची गाणी आठवू लागतात. प्यार हमें किस मोड पे ले आया वगैरे. आर.डी. बाप आहे च्यायला. किंवा मग

हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके
झिंगालाला हू.. झिंगालाला हू.. हुर्र हुर्र----
झिंगालाला... च्यायला.. इसको लागा डाला तो लाईफ झिंगालाला...
झिंग. झिंगाट. झिंगालाला.
झिंगालालाच बेस्टये एकदम.

तर मुद्दा हा की या गल्ल्यांमध्ये केवढी शांतता असते. समुद्रावर नसते ती जनरली. समुद्रावर उगाच कारण नसताना पळणारे लोक, हॉर्नचे आवाज, एकमेकांना चिकटलेली जोडपी, येणाऱ्याजाणाऱ्यांकडे बघत बसणारी रिकामटेकडी माणसं, लाटा आणि लाटांवर निरंतर चालत राहणारी भिकारचोट गाणी – आणि भिकारचोट आठवणीसुद्धा—

च्यायला आठवणींवरून आठवलं बाल्झॅक म्हणतो True love rules especially through memory.
च्यायला, म्हणजे रोजचा हस्तमैथुन हे पण खरं प्रेमच तर – आयचा घो या लेखकांच्या—काय तरी आपलं लिहून ठेवतात. असो पण.

तर मी आता हस्तमैथुन करताना कुठलं गाणं ऐकू येतं हे आठवायचा प्रयत्न करतोय पण काहीच आठवत नाहीये.
येस. आठवलं. ते फरीदा खानुमचं---
आज जाने की जिद ना करो....

च्यायला. कोणाचं काय तर कोणाचं काय.. कुणी म्हणेल की काय चुत्येगिरी आहे? पण हे फॅक्ट आहे. पिक्चरमधेपण एखादा सेक्स सीन चालू असेल तर हे गाणं वाजू लागतं बॅकग्राऊंडला माझ्या.असो पण. 

तुम्ही जर इथपर्यंत वाचत आला असाल तर तुम्ही थोर आहात यात शंका नाही. किंवा मग तुमच्याकडे फुकट घालवायला चिक्कार वेळ असणार हे नक्की.

तर मला बऱ्याचदा एखादा पिक्चर पाहिला की एकदम डिप्रेशन येतं. उदाहरणार्थ मध्ये बऱ्याच वर्षांनी रजनीगंधा पाहिला. अमोल पालेकरचा. इंजिनीअरिंगला असताना एकदा पाहिलेला, पण तेव्हा कळला नव्हता. आता परत पाहिला तर फारच उदास वाटू लागलं. म्हणजे हे असं सगळ्यांचंच होतं का? पहिलं प्रेम ही काय भयंकर गोष्ट असते ना? ओके आय शुड राइट पहिलं ‘सिरीअस’ प्रेम. असो तर तेव्हापासून मग कुठलाही भिकार प्रेमपट पाहिला की त्यातलं ते गाणं नेहमी रेंगाळत राहतं

कई बार यूँ भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है, मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे, अन्जानी आस के पीछे, मन दौड़ने लगता है

-- म्हणजे पुन्हा पुन्हा आपण हातचं सोडून पुन्हा त्याच त्याच गोष्टींच्या मागे का धावत सुटतो? Psychology नक्कीच काही तरी टर्म असणार याला. तर असो. त्याने काय फरक पडतो.

पण ही मागे चालणारी अखंड गाणी किंवा अखंड चालणारी गाणी किंवा अखंड गाणी – चालणारी – होय हे शेवटचं जास्त भिकार वाटतंय, हेच चांगलंय; हं तर अखंड गाणी – चालणारी – हैराण करून सोडतात हे मात्र खरं. खास करून झोपताना रफी, मुकेश वगैरे जीवावर उठतात. डोळे बंद केले तरी मुकेश ओरडत बसतो- आंसू भरी है ये जीवन की राहें वगैरे किंवा

तेरे प्यार को इस तरह से भुलाना
ना दिल चाहता है, ना हम चाहते है किंवा

मधेच गिरिजादेवीचं किन संग प्रीत लगाये...
च्यायला हे गाणं चालू झालं की झोपेचं खोबरं.

किंवा त्याहून भयंकर म्हणजे ते ईश्कियातलं –
डर लगता है तनहा सोने में जी

किंवा... किंवा... किंवा..

तर मुद्दा काय गाणी प्रचंड आहेत. वेळ पण प्रचंड असतोच. तो असा नाही तर तसा आपण फुकट घालवतोच. पण त्यात बॅकग्राऊंडला अशी गाणी असली की तो फार हळूहळू फुकट जातो. एकदम भसकन नाही जात.
टागोर म्हणतात — Music fills the infinite between two souls.

मला वाटतं ही गाणी माझ्यातालीच पोकळी भरून काढतात आणि मग त्याहून मोठी पोकळी निर्माण करतात. 
तर एकूण काय – हे सगळं पोकळच--

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!