Sunday, July 31, 2011

राजे

तोंड भरून कौतुकास्तव भेटले कित्येक जिवाभावाचे
ओळखी अनोळखी चेहरे भोवती पोरींचे थवे
विचारतात भलभलते कवितेचे नकोते माझे
आवडल्या कविता माझे हस्ताक्षर कुणाला काय द्यावे

एक चिमणी गोडी पोर नुसतीच हसत आली
आणि माझ्या हिन्दोळ्याला झोका देऊन गेली
"एकदा तिकडे पुण्याकडे जरूर जरूर जरूर या
(कविता नकोय ), राजे, फक्त तुमचे डोळे देऊन जा"

ना. धो. महानोर

Friday, July 29, 2011

कोलाज

खेळ धोकेबाज पूर्वीसारखे
आणखी अंदाज पूर्वीसारखे

त्रास होतो एवढा की भेटती
सारखे आवाज पूर्वीसारखे

भांडल्याने वाढते गं बोलणे
भांडु या का आज पूर्वीसारखे?

रागवू आता पुन्हा, भांडू पुन्हा
वागु या निर्व्याज पूर्वीसारखे

झोपु दे आता उपाशी एकदा
होवु दे नाराज पूर्वीसारखे

यातनांचे दे नवे तुकडे मला
रेखु दे कोलाज पूर्वीसारखे

(१ एप्रिल,२०११)

Friday, July 22, 2011

आठवणीतील गाणी १


हे गाणं मागे आई गुणगुणत बसलेली आणि मला म्हणाली की हे सापडतं का बघ कुठे. आणि पुढच्या मिनिटभरात गुगलवर सापडली ही कविता. गुगलचे अखिल मानवजातीवर अनंत उपकार आहेत. इंजिनियर म्हणून गुगलबद्दल आदर होताच, पण यानंतर तो आणखीनच वाढला.

कवी दत्त यांची सुमारे शतकापूर्वीची ही कविता. या नुसत्या एका कवितेनेच दत्तांच्या प्रेमात पडलो. ही संपूर्ण कविताच आवडते, पण त्यातही पहिलं कडवं जास्त. रोजच्या जीवनातल्या, सभोवताली दिसणारया उपमा इतक्या सहजपणे मांडणं हे सर्वात जास्त आवडलं. दत्तांचा एखादाही कवितासंग्रह सापडू नये हे मात्र खटकलं. कुणाकडे असल्यास जरूर कळवा.



बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा ||धृ||

रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ||
खडबड हे उंदिर करिती ।
कण शोधायाते फिरती ।
परी अंती निराश होती ।
लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।।१।।

बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
वाहतो फटींतून वारा ।
सुकवीतो अश्रूधारा ।
तुज नीज म्हण सुकुमारा ।
हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ।।२।।

जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
दारिद्य्र चोरिल कोण? ।
आकाशा पाडिल कोण? ।
दिग्वसना फाडिल कोण? ।
त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ।।३।।

तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
तरी सोडुं नको सत्याला ।
धन अक्षय तेच जिवाला ।
भावें मज दीनदयाळा ।
मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ।।४।।

Saturday, July 16, 2011

स्वाभाविक

सायंकाळी कधी पापणी थरथरणेही स्वाभाविक
वारा लागुन केव्हा डोळा चुरचुरणेही स्वाभाविक

कितीक वाटा, शहरे, गावे बदलत गेलो तरी पुन्हा
तुझा चेहरा सभोवताली भिरभिरणेही स्वाभाविक

किती निरागस होतो आपण वाट वेगळी होताना
वळून बघता मागे आता हुरहुरणेही स्वाभाविक

रात्ररात्रभर अता रेडिओ ऐकत बसतो कधी कधी
एखाद्या गाण्यात जरासे खरखरणेही स्वाभाविक

किती वेगळे त्यांचे साचे, किती वेगळा घडलो मी
मला पाहुनी सदैव त्यांचे गुरगुरणेही स्वाभाविक

दिवसरात्र तंद्रीत आपुल्या सतत उनाडत असतो मी
वाया गेला हे सर्वांचे कुरबुरणेही स्वाभाविक

कुणी भिकारी पोर मागते खरकटलेले ताट कधी
मेलेल्या हृदयाचें तेव्हा गहिवरणेही स्वाभाविक

................................शतानंद
(२३ मे,२०११)

Friday, July 15, 2011

संभाषण : एक गरज

अंतोन चेकॉव्हची 'मिझरी' (Misery ) नावाची एक गोष्ट वाचलेली. त्याचा नायक, अयोना पोतापाव्ह ( Iona poatapav ) हा एक गरीब टांगेवाला असतो. त्याचा मुलगा आदल्या दिवशी मरण पावलेला असतो. पण हातावर पोट चालत असल्याने त्याला धंदा चालू ठेवणं भाग असतं. मग टांग्यात बसलेल्या प्रत्येकाला तो आपल्या मुलाच्या निधनाबद्दल सांगायचा प्रयत्न करतो. पण जो तो स्वत:च्याच चिंता, दु:खं यात बुडून असतो. अयोनाचं दु:ख ऐकायला कोणाकडेच वेळ नसतो.शेवटी कुणीच आपल्या सोबत शोक व्यक्त करायला नाही हे पाहून अयोना आपल्या घोड्याला मुलाच्या मृत्युची हकीकत सांगू लागतो. कुठलाही निष्कर्ष न काढता इथेच कथा संपते. मागे नवनीत की कुठल्या तरी वहीच्या मागे हे वाचलेलं If animals could talk, the world would lose its best listeners. ते पटतं एकदम.

याउलट अशीच उद्धव शेळके यांची एक कथा वाचलेली. 'दु:ख' म्हणून. कथेचा नायक (नाव आता आठवत नाहीये म्हणून 'राम' म्हणतो) , राम हा एका हॉटेलात वेटरचं काम करत असतो. पण वेटर म्हणून काम करणं त्याला आवडत नसतं. दुसरी एखादी चांगली नोकरी शोधण्यासाठी तो धडपडत असतो. शेवटी एके दिवशी पोलीस भरतीच्या परीक्षेत तो पास होतो आणि त्याला तिथे नोकरी मिळणार असते. ही आनंदाची बातमी कधी कुणाला सांगतो असं त्याला होऊन जातं. मग हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या मालकाला सांगण्याच्या उद्देशाने म्हणून तो मालकाजवळ जातो, तर मालक खेकसून त्याला कामाला लागायला सांगतो. मग सोबत काम करणारयास सांगावं म्हणून प्रयत्न करतो तर त्यालाही वेळ नसतो. शेवटी रामची नेहमी विचारपूस करणारा एक गिर्हाईक हॉटेलमध्ये शिरतो तसा तो एकदम खुलून जातो. पण त्या माणसासोबत एक बाईसुद्धा असते. त्यामुळे आज तो काही न बोलता फक्त ऑर्डर देऊन मोकळा होतो. तो हॉटेलमध्ये असताना कधी एकदा आपली बातमी त्याला सांगतोय असं रामला होऊन जातं. शेवटी तो निघताना घालमेल अनावर होऊन राम त्याला सांगतो की त्याला पोलिसात नोकरी मिळाली म्हणून. तर तो इसम ओळखही न दाखवता निघून जातो आणि रामच्या डोळ्यात पाणी तरळतं.

पहिली कथा दु:ख कुणाला तरी सांगण्याबद्दलची तर दुसरी सुख सांगण्याबद्दलची. शेवट मात्र सारखाच. आपलं ऐकायला कुणीही नसणं याच्याइतकं एकटेपण किंवा सल दुसरा कुठलाच नसावा. मागे कुठेतरी ऐकलेलं, Girls always need a listener म्हणून. ते बदलून Everyone always needs a listener असं करावसं वाटतं. ज्यांना असं ऐकणारं कुणी मिळत नाही ते दुर्दैवी, आणि ज्यांना मिळतं ते खरे भाग्यवान. इतकी सारी सामाजिक जाळी विणणारी संकेतस्थळे, वैचारिक, सांस्कृतिक इ-कट्टे वगैरे यासाठीच नाही का?

मला माझाच पुण्यातील पहिला आठवडा आठवतो. संध्याकाळपासून इ.एस.आय.च्या खोलीत एकटा असायचो. त्यात भ्रमणध्वनी खराब. त्यामुळे वैतागून पहिल्याच दिवशी मी डायरीत लिहिलेलं, 'मला एका दिवसात कळून चुकलंय की मी मुळीच एकटा राहू शकत नाही.'आणि थॅंकफुली मला नंतर एकही दिवस एकट्याने राहावं लागलं नाही. संभाषण ही इतकी महत्वाची गरज आहे हे तेव्हा कळलं.

बाकी या निमित्ताने माझी बडबड सतत ऐकून घेणाऱ्या, माझी भिकारातली भिकार कवितासुद्धा शांतपणे ऐकून घेणाऱ्या, पाणचटाहून पाणचट पीजे सहन करणाऱ्या, फोनवर किंवा कट्ट्यावर तासनतास गप्पा मारणाऱ्या आणि गप्प गप्प राहिलो तर प्रसंगी शिव्या घालून मला बोलतं करणाऱ्या सर्व मित्रमंडळीना एकदा भयंकर धन्यवाद.

................................शतानंद
मन करा रे प्रसन्न / सर्व सिद्धीचे कारण /
मोक्ष अथवा बंधन / सुखसमाधान इच्छा //

अट्टाहास

तीन वर्षांपूर्वी ब्लॉगरावर खातं उघडलेलं. बी.इ.चा प्रोजेक्टच होता तो माझा म्हणून. म्हणजे ब्लॉग आज्ञावली बनवण्याचा.(आज्ञावली हा शब्द वी.जे.टी.आय.चे उपकार) तर नंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर मी आणि विक्रमने ब्लॉग लिहिण्यास सुरूवात करायचं ठरवलेलं, त्याने लिहिलं आणि मी आपल्या स्वभावास जागून काहीही लिहिलं नाही. तर हे स्वाभाविकच होतं. आज सकाळीच त्याचा ब्लॉग वाचत बसलेलो तर म्हटलं लिहावंच काहीतरी. म्हणून हे खरडणं.

मलाही थोडंफार कळतं हे सांगण्याचा अट्टाहास म्हणून.. म्हणूनच कदाचित.. हे लिहितोय. पण त्याहीपेक्षा जे काही थोडेफार, तोकडे का होईना, पण आलेले अनुभव ,हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकी वाचलेली पुस्तकं, भेटलेली-पाहिलेली-ओळखीची-अनोळखी माणसं, प्रसंग या साऱ्यातून जे शिकता आलं, जगता आलं त्यातून स्वाभाविकपणे जे सुचलं, उमटलं ते मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. प्रामाणिक!

जरूर भेट द्या.. ..ब्लॉगला! प्रतिक्रियांचे स्वागत आहे. (हे वाक्य त्याच्या ब्लॉगवरूनच copy-paste केलंय!) चांगल्या प्रतिक्रियांचे जास्त स्वागत आहे. कारण मला कौतुक करून घ्यायला प्रचंड आवडतं. तर हे फारच झालं! असो.

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!