Friday, November 29, 2013

निरोप


तू डोके मांडीवरती
ठेवून दीर्घ बिलगावे
अन् खोल अंतराळात
ध्रुवाचे तुकडे व्हावे

तुकड्यांना जमवित असता
बुबुळांत शिरावी नीज
अडकावा चंद्र गळ्याशी
हृदयात भरावी वीज

वीजेने तुटला थेंब
पसरावा फरशीवरती
मेंदीभरल्या बोटांनी
रोखावी नकळत भरती

भरतीच्या वेळी तूही
लाटांचा घेत निरोप
दारातिल उचलुन न्यावे
तुळशीचे हिरवे रोप...

२७, ऑक्टोबर २०१३

Wednesday, July 10, 2013

हे आणि इतकंच...


पुढे सताड अरबी समुद्र,
मागे R.K.चा कॉमन मॅन
आणि मध्ये मी..


आज मुद्दामच समुद्राकडे पाठ करून बसलो..
म्हटलं दर वेळी एवढा का भाव द्यायचा याला..
बसू देत आता खवळत.. एकटाच..


मग बघत राहिलो कॉमन मॅन..
हा साला इतकी वर्षं झाली तरी इथेच उभा..


याचे थकलेले, मळखाऊ डोळे..
त्यातला मनस्वी शीण..
कसला शीण आला असेल त्यांना इतका -
समोर बसणाऱ्या जोडप्यांचा,
कारण नसताना पळणाऱ्या लोकांचा,
की समुद्राच्या निर्लज्ज लाटांचा?
(च्यायला पाठमोरं बसलं तरी लाटांचं आपलं चालूच..)


याचे कान पण दोन इंच जास्तच लांब झालेले..
पिचले असणार गाड्यांच्या हॉर्नला,
माणसांच्या मठ्ठ गर्दीला किंवा
किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या अखंड लाटांना..
(च्यायला प्रत्येकालाच कुठे सापडतात असे किनारे..)


याच्या अर्धवर्तुळाकार भुवया..
त्यांच्या आकारावरूनच कंटाळ्याची तीव्रता जाणवत रहाते..
आणि तरी हा अजूनसुद्धा
कौतुकाने बघतोय सगळं..
जोडपी, पळणारे लोक, आणि
हरामखोर लाटा...
(च्यायला सतत एकाच गोष्टीचं इतकं कौतुक
फक्त कॉमन मॅनच करू शकतो..)


डोक्यावरचं टक्कल..
कपाळावरच्या समजूतदार रेषा..
वय झालं आता याचं..
वाढत्या वयासोबत कंटाळाही वाढत जात असावा..
नाहीतर इतकी वर्षं तेच तेच बघून पण
हा जागचा हलत नाही हे नवलच..


बरं आता हे एवढं सगळं लिहिलं
याचा नेमका हेतू किंवा पर्पज काय?
तर काहीच नाही..
तू नाहीयेस आता
तर त्या कॉमन मॅनकडे लक्ष गेलं –
हे आणि इतकंच...!
----१० जुलै, २०१३----

Monday, January 14, 2013

व्यर्थ गीत

हल्ली का माहीत नाही पण उगाच गुणगुणत असतो ही कविता... च्यायला अजून महिनाभर तरी हे असंच चालणार हे नक्की... असो.

व्यर्थ या गीतात माझ्या
व्यर्थ तू गुंतून जावे 
अन अशा या सांजवेळी
व्यर्थ मी व्याकूळ व्हावे

व्यर्थ माझे सूर हे अन
व्यर्थ सारया भावना या
गीत कंठातील माझ्या 
वाहुनी जाइल वाया

व्यर्थ या शब्दांस माझ्या
ओढ नाही चांदण्यांची
व्यर्थ या माझ्या स्वरांना
साथ ओल्या पापण्यांची

व्यर्थ वारे वाहणारे
व्यर्थ हे आहेत तारे
तू जिथे नाहीस तेथे
व्यर्थ सारे व्यर्थ सारे

व्यर्थ या गीतांत वेड्या 
वेचला मी जन्म सारा
व्यर्थ आता सांत्वनाला
कोरडा आला किनारा

व्यर्थ हा आक्रोश माझा
तू पुन्हा यावे म्हणुनी
जीवनाच्या पायथ्याशी
व्यर्थ गावे स्पंदनांनी

व्यर्थ या मातीत आता 
प्रीत माझी पाझरावी
जीव हा माझा जळावा
अन तुला गीते स्मरावी?

व्यर्थ माझ्या इंद्रियांनी
शेवटी संन्यास घ्यावा
व्यर्थ सारया जीवनाला
अन निराळा अर्थ द्यावा.
(१३ एप्रिल, २००५)

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!