Friday, November 18, 2011

बोलायाला निवांत काही...

आज सहजच डायरी उघडली आणि नेमकी ही कविता समोर. २ वर्षांपूर्वी वाचलेली. आवडली म्हणून लिहून ठेवलेली. आणखीही चार जणांनी वाचावी म्हणून इथे टंकवतोय. इंदिरा संतांची मला अत्यंत आवडणारी ही कविता.. एवढ्या सहजपणे एखादा प्रसंग कवितेत कसा सांगू शकतं कोणी याचं आश्चर्य वाटतं. असो.

हे वरचं वाचलं नसतं तरी चाललं असतं!


बोलायाला निवांत काही
हॉटेलामधि शिरलो आपण
आणिक कुठल्या उत्साहाने
मागविलेही पदार्थ खच्चुन.

बोलावे तो – तशी नेमकी
जाणीव झाली कशी विसंगत :
नव्हते काहीच बोलायाला;
डोळे होते डोळा चुकवित.

न्याहाळत मी जपानी तरुणी;
तूंहि काढली नोट खिशातुन;
अर्धा कपही चहा न सरला;
निमुटपणाने उठलो तेथून !

नकळत वळली दूर पावलें
कशांतून तरि सुटलो वाटुनि;
नकळत वळले बाजुस डोळे
परतायाची ओढ लागुनी !

------- इंदिरा संत.
(काव्यसंग्रह – शेला)

Wednesday, November 9, 2011

गिचमीड

एखाद्या रात्री कधीतरी जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि तडतडतात बाहुल्या..
मुक्यानेच सांगू लागतं दुखलेलं पाणी,
“इतकं हळवं चुकूनसुद्धा असू नये कोणी..

गाऊ नये कोणी कधी उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं इतकं होऊ नये ज्ञानी..
वाचूच नये मुळात कुठलं जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो दूर ठेवावं मस्तक..

जशी नजरेस दिसतात तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात तसेच समजावेत मित्र..
उगाच फार खोल आत नेऊ नये दृष्टी,
खरया समजाव्यात सारया सुखांताच्या गोष्टी..

पेनाच्या जिभेवरच सुकू द्यावी शाई,
फार त्रास होईल असं लिहू नये काही..
हळवं बिळवं करणारे मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची सगळी दारं बंद..

सायंकाळी एकटं एकटं फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये आर्त, उत्कट सूर..
चालू नये सहसा फार ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी तर मिळवावेत हात..

जमल्यास चारचौघात बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी भांडावं उसळून..
आवडणार नाही पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी होऊ नये थोर..

घट्ट घट्ट बसलेल्याही सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी आणू नये आठी..
साकळू देऊ नये फार खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित होत जावं व्यक्त..

माणसांचं मनास लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका त्यांचासुद्धा भार..
तुटून जावीत माणसं एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा प्रत्येकालाच फोन..

ठेऊ नये जपून वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत असा गुंतवू नये प्राण..
जमा होत राहील सारखा पापणीआड थेंब,
इतकंसुद्धा मन लावून करू नये प्रेम..

श्वास घेणंसुद्धा अगदीच वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून जगण्याचा अर्थ..
वाटलं जर केव्हा सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे हे करून घ्यावं मान्य..”

इतकं समजावूनसुद्धा जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे, थरथरतात बाहुल्या..
आतून आतून सगळ्याचीच मग येत राहते चीड,
दिवस जितका सुटसुटीत तितकीच रात्र गिचमीड...
&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp
(२ नोव्हेंबर, २०११)

Wednesday, October 26, 2011

आणखीन एक युजलेस दिवस

लक्ष दुसरीकडे लागावं म्हणून त्याने पुस्तक वाचायला घेतलं. आना करेनिना. “All happy families resemble one another; Each unhappy family is unhappy in its own way.” पहिलंच वाक्य वाचून त्याने मनातल्या मनात टॉलस्टॉयला शिवी घातली नि डाव्या बाजूचे बंध तुटलेली चप्पल पायात सरकवून घराबाहेर पडला. तसं हे असं तडकाफडकी, कुणालाच न सांगता निघून जाणं नेहमीचच झालेल. त्यामुळे त्याचं असं पुस्तक भिरकावून निघून जाणं कुणालाच खटकलं नाही.
बिल्डींगच्या आवाराबाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या मारुतीकडे पाहून त्याने हात जोडले. सवयीचा भाग म्हणून. तसं म्हटलं तर दिवसातल्या ९० टक्के गोष्टी तो सवयीचा भाग म्हणूनच करायचा. एकदा का माणसाला सवय झाली की जगणं एकदम सोपं होऊन जातं असं पूर्वी कुठेतरी वाचलेल्याचं आठवलं त्याला. नि त्याच्या मनात उगाचच एक वळणदार प्रश्नचिन्ह बनलं. मग गल्लीच्या टोकाशी असलेल्या चांभारापाशी येऊन थांबला. डाव्या पायातली चप्पल काढून त्याच्याकडे दिली नि चप्पल कशी शिवतात ते नीट न्याहाळू लागला. सगळ्याच गोष्टी अशा शिवता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं असा एक विचार उगाच त्याच्यात डोकावून गेला. पण तिकडे त्याने दुर्लक्ष केलं.
मग चप्पल घालून रस्त्याच्या कडेने, आज कुठे जायचं या विचारात चालू लागला. रस्त्यातले दगड पायाने उगाचच इकडे तिकडे उडवत. त्यातला एक दगड घरंगळत बरोब्बर समोरच्या गटाराच्या जाळीतून आत जाऊन पडला. ते बघून तो बेहद्द खूष झाला. एक युजलेस समाधान त्याच्या चेहरयावर पसरलं. जरा पुढे गेल्यावर फुटपाथच्या कडेला झोपलेल्या कुत्र्याकडे त्याचं लक्ष गेलं. आधी त्याला वाटलं जोरात जाऊन त्या कुत्र्याच्या पाठीत लाथ घालावी. पण जरा जवळ गेल्यावर त्याला उगाच त्याची दया आली. त्या कुत्र्याचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला. त्याने मनाशीच म्हटलं, जाऊ देत. हाही कोडगा दिसतोय. लाथ घालण्यापेक्षा कुठल्यातरी बोथट गोष्टीने टोचावं याला. एकवेळ जोराची लाथ कोणी सहन करेलही, पण एकाच गोष्टीने एकाच जागेवर टोचणं नाही सहन होत हे त्याला अनुभवाने माहीत झालेलं.
अचानक तिथेच समोर असलेल्या डोसेवाल्याकडे त्याची नजर गेली नि आपण काहीच न खाता घराबाहेर पडलोय याची त्याला जाणीव झाली. मग तिकडे जाऊन त्याने मसाला डोश्याची ऑर्डर दिली. त्याला उगाच ३-४ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. तेव्हाही असाच दिवस दिवस भटकायचा तो. फक्त तेव्हा खिशात पैसे नसायचे म्हणून उपाशीपोटी. त्यामानाने आता तशी चैनच. त्याने सावकाश डोसा संपवला. त्याच्या एकदम लक्षात आलं की, खात असताना त्याच्या डोक्यात कुठलेच विचार येत नाहीत. म्हणून त्याने अजून एक डोसा मागवला. पोट भरल्यावर त्याला थोडं प्रसन्न वाटू लागलं.
तसाच चालत चालत कबुतरखान्यापाशी आला. तिकडे पसरलेली गर्दी बघितली नि स्टेशनला जायचा विचार त्याने सोडून दिला. इतकी सगळी माणसं बघून त्याला अमाप कंटाळा आला. म्हणून तो जवळच्याच पुस्तकांच्या दुकानात शिरला. काहीतरी छान वाचावं म्हणून त्याने बालकवींचं पुस्तक हातात घेतलं. ते चाळत असताना एका ओळीपाशी त्याची नजर खिळली. निष्प्रेम मनाला कोठेही सुख नाही. मनातल्या मनात पुन्हा एकदा ते वाक्य घोळलं – निष्प्रेम मनाला कोठेही सुख नाही. त्याला बालाकवीन्चा प्रचंड राग आला. म्हणून त्याने चिडून पुस्तक मुद्दाम उलटंच रॅकमधे सरकवलं, मनातल्या मनात एक शिवी हासडली नि तिथून बाहेर पडला.
बाहेर पडल्या पडल्या त्याला आपल्या वागण्याचं एकदम हसूच फुटलं. मागे पाहिलेल्या एका नाटकातलं वाक्य उगाच त्याला आठवलं - Nothing is funnier than unhappiness, it's the most comical thing in the world. And we laugh, we laugh, with a will, in the beginning. But it's always the same thing. Yes, it's like the funny story we have heard too often, we still find it funny, but we don't laugh any more. “खरंच्ये च्यायला !” असं पुटपुटला नि चालू लागला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीत त्याची नजर गेली. तिथे एक जोडपं त्यांच्या गोंडस, गोजिरवाण्या लहान मुलाला भरवत होतं. एरवी त्याला एकदम मस्त वाटलं असतं. कारण लहान मुलं त्याच्या अगदी विशेष आवडीची. पण आता त्याला उगाच सकाळचं वाक्य आठवलं.. All happy families resemble one another.. आता तर त्याला खुपच राग आला. “हा टॉलस्टॉय काय पाठ सोडत नाही भोसडीचा!” असं दात चावून म्हणाला नि समोरच उभी असलेली बस पकडली. कुठली तेही पाहिलं नाही. म्हणून मग २५ चं तिकीट काढलं. ही एक बेस्टने त्याच्यासारख्या माणसांसाठी केलेली सोयच!
बसमध्ये चढल्याचढल्याच त्याला खिडकीपाशी जागा मिळाली नि त्याचा चेहरा एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसरा बनला. कॉलेजमधली एक मुलगी तर त्याला इतक्याचसाठी आवडायची की तिने त्याला एकदा स्वत:हून खिडकीपाशी बसायला दिलेलं. तो मागे जाणारया गर्दीकडे मग टक लावून बघत बसला. त्याचाही कंटाळा आल्यावर दप्तरातून त्याने उगाचच कॅल्कलसचं पुस्तक काढलं नि एका गणितात डोकं खुपसलं. पुढच्या बसस्टॉपला एक तंग फोर्मल्स घातलेली, डोळ्याला गॉगल लावलेली एक मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याच्या हातातल्या पुस्तकाकडे तिने पाहिल्यासारखं केलं नि मग मोबाईलवर काहीतरी टाईप करत बसली. आधीच परफ्युमचा प्रचंड वास त्याच्या डोक्यात गेला होता. त्यात तिने केस मोकळे सोडल्यावरचा सुवास येऊ लागल्यावर तर त्याला अगदीच राहावलं नाही. शेवटी तो उठला. उठताना नकळत तिच्या शर्टाच्या दोन बटणातून त्याची नजर आत शिरली. तसं त्याला स्वत:चीच प्रचंड चीड आली. मागच्या दरवाजाकडे उतरायला जाऊ लागला आणि त्याची नजर समोरच्या पाटीकडे गेली. “कृपया पुढे सरकत रहा.” हे वाक्य त्याच्यासाठीच लिहिलंय असं क्षणभर त्याला वाटून गेलं नि विचारांची एक अख्खी रांग त्याच्या डोक्यातून पुढे सरकली. पुढे जात रहाणं खरंच इतकं सोपं असतं? एकट्याला शक्य असेलही कदाचित, पण सर्वांना घेऊन पुढे जाणं निव्वळ अशक्य. त्यापेक्षा हवं त्या ठिकाणी मागच्या बाजूने उतरणंच बरं, असं ठरवून त्याने धावत्या बसमधूनच उडी टाकली.
बाजूलाच एकदम चकचकीत वातावरण. काळ्या काळ्या काचांच्या दोन उंच इमारती. कुठल्या तरी बड्या विदेशी कंपनीचं आवार. पॉश गाड्या. स्वच्छ रस्ते. युनिफॉर्म घातलेले रखवालदार. बाहेरच्या टपरीवर दिमाखात सिगरेट ओढत खिदळत असलेले तरुण-तरुणी. त्याला उगाच कसंतरी वाटू लागलं. सहजच आवारात लावलेल्या फुलझाडांवर त्याची नजर गेली. सफेद, निळी, गुलाबी, जांभळी अशा बरयाच रंगाची फुलं होती तिथे. इतके सगळे रंग एकत्र पाहून त्याला एकदम ओकारीसारखं झालं. म्हणून त्याने चालण्याचा वेग वाढवला.
लोअर परेल स्टेशनच्या जवळ फूटपाथपाशी आपोआपच त्याचा वेग मंदावला. उघड्यावर मांडलेले संसार, विटांच्या चुलीवर उकळत असलेलं कसलं तरी कालवण, पोटं पुढे आलेली, काळीकुळकुळीत नागवी पोरं, गालहाडं नि कानाशिलाच्या जागी खळगी झालेली म्हातारी सगळं काही शांतपणे बघत तो पुढे चालत राहिला. एरवी त्याच्या डोक्यात भलेमोठे भोवरे तयार झाले असते. न्याय-अन्याय, श्रीमंत-गरीब वगैरे वगैरे. पण आज मात्र त्याला आपण एकदम बारकं असल्याची एक युजलेस जाणिव होत राहिली. पुढे जाताजाता “तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे |” इतकं पुटपुटला नि निर्विकार चालत राहिला.
पुढे एका मॉलपशी येऊन पोचल्यावर त्याला थोडा थकवा जाणवला. तसा तिथेच थोडा वेळ उभा राहिला. बाजूच्या दुकानाच्या काळ्या काचेत बघून त्याने केसांचा भांग नीट केला. त्याचे खोल डोळे त्या काचेत एकदम चमकत होते. त्याला पूर्वी कुणीतरी म्हटलेलं, तुझे डोळे एखाद्या विचारवंतासारखे एकदम पाणीदार आहेत. ते आठवलं अचानक. सारखा विचार केला म्हणजे डोळ्यात पाणी येणारच असं उगाच त्याच्या मनात येऊन गेलं.
मग तसाच त्या काचेत तो एकटक बघत राहिला. आता त्याला त्याच्या जागी एक उच्चशिक्षित प्रोफेसर दिसू लागला. गिरगावात आपण एका मोठ्या फ़्लॅटमधे राहत आहोत, सगळीकडे हसण्याचा, खिदळण्याचा आवाज ऐकू येतोय असं दिसू लागलं. त्याने अनेक सुखवस्तू घरांमध्ये पाहिलेलं तसं चकचकीत, आनंदी वातावरण. इतक्यात काचेमागे काहीतरी हललं नि तो भानावर आला. फिराकचा एक शेर त्याच्या पापणीत भरून राहिला. “दिखा तो देती है बेहतर हयात के सपने.. खराब हो के भी ये जिंदगी खराब नही.” काय पर्फेक्ट ठिकाणी आपल्याला हा शेर आठवला याचं आणखीन एक युजलेस समाधान त्याच्या भुवईवर उमटलं.
तिथून निघताना त्याला स्वत:चा चेहरा अगदी स्पष्ट त्या काचेत दिसला. वर आलेली गालहाडं, लांबत बनत चाललेला चेहरयाचा आकार, खोल खोल आणि तरीही स्वप्नाळू डोळे हे सगळं बघून अगदीच थकून गेल्यासारखं वाटलं. पण अजून बराच दिवस शिल्लक होता. मग रस्त्याच्या कडेला जाऊन, गटारापाशी छाती दाबून तो खोकू लागला. शेवटी कफाचा एक मोठा बेडका थुंकल्यावर त्याला थोडं बरं वाटू लागलं. थोडीशी गिचमीड कमी झाल्यासारखी वाटली. मग चर्चगेटची बस पकडली नि शेवटच्या स्टॉपला उतरला.
तिथून चालत चालत मग मारीन ड्राईव्हवर. अथांग पसरलेला अरबी समुद्र त्याला प्रचंड आवडायचा. इतका की माणसं, पुस्तकं आणि समुद्र यातलं काय जास्त आवडतं असं जर कोणी विचारलं असतं तर त्याने जराही वेळ न लावता समुद्र असं उत्तर दिलं असतं. बुडत चाललेला लालातांबुस सूर्य आणि तसंच पिवळसर तांबूस, अस्थिर पाणी, दूरवर आपल्याच नादात हलत असलेल्या होड्या, समुद्राच्या आतापर्यंत घुसलेली जमीन, मोठमोठाले दगड, उंचच्या उंच वाढलेल्या इमारती, भरधाव चाललेल्या आलिशान गाड्या.. हे सगळं बघून त्याला अजूनच बारकं बारकं वाटू लागलं. मग बराच वेळ तो दगडांपाशी येऊन फुटणारया लाटांकडे एकटक बघत बसला. त्या लाटांचं असं संथपणे एकामागून एक येणं, दगडावर आदळून फुटणं, फेसाळणं आणि गडप होणं या सगळ्याचा त्याला विलक्षण हेवा वाटू लागला. सर्वांनाच कुठे सापडतात असे किनारे असा एक विचार उगाच त्याच्या मनात आला, पण तो त्याला तितकासा प्रिय वाटला नाही. म्हणून कपडे झटकून तो चालायला लागला. पुन्हा एकदा दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशाने भरून राहिलेले रस्ते, हवेत भरून राहिलेला खारट वास आणि गाड्यांचा गोंगाट हे सगळं साठवून घेतलं नि समुद्राचा निरोप घेतला.
मग चालत चालत फौंटनजवळ येऊन पोचला. एक वडापाव पोटात ढकलला, उसाचा रस प्यायला नि कामावरून सुटलेल्या, घाईघाईने परतणारया लोकांचे चेहरे बघत बघत सी.एस.टी.ला येऊन पोचला. ठाण्याला जाणारी ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणे त्याला चौथ्या सीटवर बसायला मिळालं. यापलीकडे तो कधी अपेक्षासुद्धा नाही करायचा. समोरच एक जोडपं उभं होतं. ती बाई त्या माणसाला ट्रेनमधल्या गर्दीवरून बडबडत होती. ट्रेनऐवजी टॅक्सीने गेलो असतो तर असं काहीतरी चालू होतं त्यांचं. मग किंचित रडारड. मग ती बाई गप्पच बसली. तिचा नवरा बरंच समजावत होता आणि तिचं मौनव्रत. बोलणारया माणसांपेक्षा न बोलताच माणसं जास्त दुखावतात हे पुन्हा एकदा त्याला पटलं. त्याला पुन्हा टॉलस्टॉय आठवला. मग पुन्हा टॉलस्टॉयला शिवी. अर्थातच ती बाई दिसायला बरयापैकी होती म्हणून तो आपुलकीने ते सगळं इतका वेळ बघत होता. एरवी ट्रेनमधल्या माणसांचे मरगळलेले चेहरे त्याला नकोसे होऊन जायचे. पण त्याहूनही त्याला सतत आनंदी दिसणारे, चेहरयावर दु:खाची एकही रेष नसलेले लोक आणखीन परके वाटायचे. स्टेशनवर उतरल्यानंतर त्याने सरळ घर गाठलं.
घरात शांतता होती. आश्चर्यच. त्याने थोडं खाकरल्यासारखं केलं. फुकट गेलं. कोपरयात पाहिलं तर टॉलस्टॉयचं पुस्तकं तसंच दुमडून पडलेलं. ते उचललं, सरळ केलं नि कपाटात ठेऊन दिलं. मग खिडकीपाशी जाऊन चिमण्यांचं घरटं बघत बसला. त्या तरी चिवचिव करतील असं वाटलं त्याला. पण तिथेही नुसताच शुकशुकाट. खिडकीत लावलेलं तुळशीचं रोपटं अगदीच सुकून गेलंय हे त्याच्या लक्षात आलं. पण ते त्याला तितकंसं महत्त्वाचं वाटलं नाही. मग थोड्या वेळाने स्वयंपाकघरात जाऊन जेवण घेतलं. पोटात ढकललं. गॅलरीत बराच वेळ येरझारा घातल्या. मग डायरी काढली. तारीख टाकली आणि नोंदवलं –
आणखीन एक युजलेस दिवस!
-------------------------------------------------------------------------------
शतानंद
मन करा रे प्रसन्न / सर्व सिद्धीचे कारण /
मोक्ष अथवा बंधन / सुखसमाधान इच्छा //

taap

taap haa kantalyaachaa baap aahe...

Wednesday, October 5, 2011

वाढदिवस

उठल्यासुठल्या देऊ नको गं भान मला वाढत्या वयाचे
असेच असते वयास चुकवित... फुलावयाचे...
(बा. भ. बोरकर)

Saturday, September 17, 2011

सायकल

मला आईचा केव्हा केव्हा खूप राग येतो. म्हणजे मी छानपैकी झोपलेलो असताना ती जागं करते तेव्हा, किंवा मग 'दात घास' म्हणून पाठीशी लागते तेव्हा, किंवा 'आधी दूध पी' म्हणून ओरडत असते तेव्हा, किंवा तसलं काहीही! पण त्याहूनही जास्त राग तेव्हा येतो जेव्हा ती 'सायकल शीक.. सायकल शीक' असा जप सुरू करते. म्हणजे याऐवजी जर तिने 'ॐ नम: शिवाय' असा जप केला असता ना तर एव्हाना शंकरराव प्रसन्न होऊन प्रकटसुद्धा झाले असते!

तर आज पण एकदम तसंच झालं. म्हणजे आई दादरवरून खरेदी करून आली आणि मी समोर दिसताच लगेच जप सुरू झाला 'सायकल शीक.. सायकल शीक'. ६ अक्षरी मंत्र! बरोब्बर!! तेव्हा माझ्या डोक्यात शंकरराव खरोखर प्रकट झाले तर आई काय करेल ते सगळं चालू झालं. मग ती हात जोडून शंकररावांना म्हणेल की - आमच्या रामला सुबुद्धी वगैरे दे, किंवा आमच्या रामचा पहिला नंबर वगैरे येऊ दे, किंवा आमच्या रामला सायकल वगैरे चालवता येऊ दे, किंवा तसलं काहीही!

तर आई आमच्या समोरच येऊन बसली आणि चालू... "मला साधी भाजी आणायला एवढी पायपीट करावी लागते, त्याचं कुणालाच काही नाही. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून १ लाख वेळा तरी 'सायकल शीक' म्हणून सांगितलं असेल तुला. एव्हाना शिकला सुद्धा असतास."

तर हे ऐकून मी १ लाख म्हणजे एकावर किती शून्य - पाच की सहा, याचा विचार करत बसलो. हातात भस्मासुराचं पुस्तक होतं म्हणून. नाही तर बोटांवर लगेच मोजली पण असती पाच की सहा शून्यं ती! मी काही बोलत नाही हे बघून मग आईचा पारा की काय म्हणतात तो चढला. मग ती अजूनच चिडून बोलली, "आज साध्या कोथिंबीरीच्या जुड्यांसाठी पण मला इतक्या लांब जावं लागलं आणि तू आपला बसला आहेस राजासारखे पाय पसरून, तो भस्मासूर की फस्मासूर वाचत."

म्हणजे मी भाजी आणावी म्हणून सायकल शिकवतायत तर हे मला. म्हणूनच असणार. मग तर मी मुळीच नाही शिकणार. कारण तिथे ती मावशी मी जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा माझे गाल एक फूट तरी ओढते आणि त्याहूनही म्हणजे मला बाळ वगैरे म्हणते. हे म्हणजे तर अतीच! म्हणजे मला एक वेळ राम ऐवजी रावण(!) म्हटलं तरी चालेल. पण बाळ काय? मी मोठा झालोय आता. यावर्षीपासून तर मी शाळेत एकटासुद्धा जाणार आहे. इयत्ता ५वी 'अ'. तर मी हे आईला सांगितलं तर तिचं पुन्हा चालू झालं,

"बरोबरच आहे. तुला सायकल नाही येत ना चालवता अजून, मग लहानच आहेस तू अजून. बाळच एकदम!"

"म्हणून काय झालं? शेजारच्या कामत आजींना पण नाही येत सायकल चालवता. मी कालच विचारलं होतं. त्यांना नाही कुणी बाळ म्हणत!"

हे ऐकलं आणि मग आई जे बोलली ते बोलली. पुढला तासभर मग भजन, कीर्तन वगैरे सारं काही. आमच्या आईचं हे एक बरं की ती एकट्यानेच वाट्टेल तेवढा वेळ बोलू शकते, फक्त समोर कुणी तरी ऐकणारं असलं पाहिजे. आणि त्यातही ते ऐकणारं म्हणजे मी असलो की तर विचारूच नका. तर बर्‍याच वेळाने आई थोडी शांत होणार अशी चिन्हं दिसू लागली आणि नेमके आमचे दादोजी कोंडदेव दारात अवतरले.

"काय? इतका वेळ कुठे गड लढवत होतात?" आईचा गडगडाट सुरूच.

दादाने घरातला आणीबाणीचा प्रसंग लगेच ओळखला असणार, आणि त्यात मी भस्मासूराचं पुस्तक उलटं पकडलंय हे देखील त्याच्या चाणाक्ष चक्षूंनी पाहिलं असणार. तो प्रसंगावधान वगैरे राखून लगेच म्हणाला,

"तूच म्हणाली होतीस की आजपासून क्लासला सुट्टी आहे, तर रामला सायकल शिकव म्हणून! सायकल पंक्चर झाली होती म्हणून मग 'नटसम्राट'कडे गेलो होतो पंक्चर काढायला."

तर 'नटसम्राट' म्हणजे आमच्या शाळेजवळ 'सुंदर सायकल मार्ट' आहे ना त्याचा मालक. श्यामसुंदर. स्वच्छ, काळाकुळकुळीत. पण सुंदर! याच्याजवळ सगळ्या प्रकारचे पाने आहेत. त्यामुळे हा कुठलाही नट अगदी दोन सेकंदात टाइट करून सोडतो. तर म्हणून यास 'नट'सम्राट असा किताब मिळालाय. हे मला आमच्या वर्गातल्या मुकुंदाने सांगितलं होतं एकदा.

तर दादाचं बोलणं ऐकलं आणि त्याबरोबर आईचा पट्टा परत सुरू झाला. मग दादोजी कॊंडदेव क्रूरपणे हसून आत गेले. मला असला राग आला ना त्याचा. असं वाटलं की मी भस्मासूर असायला हवं होतं. मग मी सगळ्यात आधी त्या डबलदांडीच्या सायकलवर हात ठेवून ती भस्म करून टाकली असती आणि मग आमच्या दादोजींच्या मागे लागून त्यांना पळता भुई थोडी केली असती. मग गेले असते ते कैलास पर्वतावर लपायला. ते कैलास पर्वतावर लपणार, इतक्यातच आईने माझ्या हातातलं पुस्तक काढून घेतलं आणि जवळजवळ किंचाळलीच-

"ऊठ आधी या खुर्चीवरून. एक अक्षर ऐकत नाहीस. श्रीरंगा, इथे ये आणि घेऊन जा आधी याला खाली. बघतेच कसा शिकत नाही तो सायकल."

"पण माझे पाय पोचत नाहीत गं जमिनीवर." मी अगदी कळवळून बोललो.

"मी आहे की मागे धरायला." दादोजींनी मध्ये चोच खुपसलीच.

"पण तरी पण.. मला.."

"पण नाही नि बीण नाही. जा रे याला घेऊन खाली. पडला तरी चालेल, पण सायकल आली पाहिजे. जा आधी."

मग काय, सपशेल शरणागती! शेवटी आम्हांला जावंच लागलं. आमच्या चाळीच्या बाजूलाच खूप मोठी जागा आहे. दुपारी गाड्या वगैरे नसतात ना म्हणून मोकळी असते ती. तिथे आम्ही येऊन पोचलो. मग दादोजींनी आम्हांस उपदेश करायला सुरूवात केली.

"हे बघ हा डावीकडचा ब्रेक आहे ना तो मागच्या चाकाचा आणि उजवीकडचा आहे ना तो पुढच्या चाकाचा."

आमचे दादोजी वेडपटच आहेत. सायकलला दोनच तर चाकं असतात! मग मला एकदम सायकल विकत आणली होती ना तो दिवस आठवला. सर्वात जास्त उड्या मीच मारल्या होत्या त्या दिवशी. पण त्यानंतर सायकलची घंटी कशी वाजवायची ते सोडून बाकी काहीच शिकलो नाही मी. मला सगळे 'ढ' म्हणतात ते उगीच नाही.

"लक्ष कुठंय तुझं? हे बघ तुझे पाय नाही पोचत ना सीटवरून, तर कैचीने चालवायला शीक आधी. हे बघ, उजवा पाय या दांडीतून आत घुसवून त्या पॅडलवर ठेवायचा आणि डावा पाय या पॅडलवर. मग अर्धा अर्धा पॅडल मारत जायचं."

"मला नाही जमणार हे असलं. मी सीटवर बसूनच चालवणार."

"तर तर औरंगजेबच ना तू! म्हणे सीटवर बसूनच चालवणार."

"मी नाही चालवत जा मग. मी सांगेन आईला सगळं."

"घे रड्या. बस सीटवर. पण पॅडल हळू मार. समजलं?"

मला वाटलेलं दादोजी नाही म्हणतील. पण कसलं काय? आता सुटका नाही. का नाही?

मग बसलोच मी सायकलवर. श्रीशंकराचं नाव घेतलं आणि मारला पॅडल. दादोजींना सायकल धरून धावावं लागत होतं माझ्यासोबत, हेच काय त्यातल्या त्यात बरं. मग दादोजी कोंडदेवांच्या अगणित सूचना- 'दोन्ही हॅंडल घट्ट धर.' 'हात ब्रेकवर ठेव.' 'समोर बघून चालव.' 'कुणी समोर आलं तर घंटी वाजव.' 'कधी पण मागचा ब्रेक दाबायचा.' वगैरे वगैरे. हे असं बराच वेळ. मग आम्ही घरी आलो आणि आईने बनवलेला गरम गरम शिरा फस्त केला. मग दुसरे दिवशीपासून मी स्वत:च दादोजींसोबत जाऊ लागलो. हे असं शनिवारपर्यंत.

मग रविवारी दुपारी जेवून वगैरे झाल्यावर, दादोजी आम्हाला डबलसीट शाळेच्या ग्राऊंडवर घेऊन आले आणि दिली हातात सायकल. मी आपला नेहमीसारखा सीटवर बसलो. दादोजी मागे पकडून. मग हळू हळू पॅडल मारत सायकल पुढे नेली. "आणखी जोरात मार." दादूजी मागून ओरडत होते. मग मी अजून जोरात पॅडल मारून पुढे गेलो. आणखी. आणखी.

थोड्या वेळाने दादोजींचा आवाजच नाहीसा झाला. म्हणून आम्ही मागे वळून बघितलं तर काय, दादोजी त्या टोकाला. म्हणजे मी स्वत: सायकल चालवली तर एवढी! मग मला जी मजा आली ती आली. आता मी छाती ठोकून आईला सांगणार आहे, मला येते आता सायकल चालवता. मी मोठा झालो आता. पण भाजी आणायला नाही जाणार मी मुळीच. मी शाळेतसुद्धा घेऊन जाईन आता सायकल. मग 'विक्रमवीर चिंटू'सारखी मी पण ३ दिवस ३ रात्र न थांबता सायकल चालवू एक दिवस. मग बघतोच कोण मला 'ढ' म्हणतं ते.

माझ्या डोक्यात असं सगळं चालू असताना अचानक काय झालं कुणास ठाऊक. दोन्ही बाजूंनी आवाज करत जाणारा वारा एकदम गप्पच झाला. आणि माझ्या डोळ्यांसमोर नुसता अंधार अंधार. नाकातोंडाला, शर्टाला, पॅंटला धूळ, माती लागलेली. कोपरातून नि गुडघ्यांतून रक्त यायला लागलेलं. मग तशाच हातांनी डोळे चोळत चोळत मी भर मैदानातच मांडी घालून बसलो. इतक्यात दादोजी माझ्यापर्यंत येऊन पोचले आणि अक्राळ विक्राळ हसत मला उपदेश करू लागले, "हा तुझा शेवटचा धडा! सायकल चालवताना इकडे तिकडे नाही बघायचं!"

वा रे वा! काय पण उपदेशाची वेळ! म्हणजे आपला सख्खा भाऊ इथे भर मैदानात धारातीर्थी पडलाय आणि हे हसतायत. त्याचं ते भयानक हसणं बघून तर मला अजूनच चिडायला झालं आणि रडायला पण आलं. तर हा परत सुरूच- "चल रे रडया. काही नाही झालंय. नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय कुणी पोहायला शिकतं का? तसंच कोपर, गुडघे फुटल्याशिवाय कुणाला सायकल नाही येत चालवता. समजलं. पुरे आता."

हे म्हणजे अतीच होतं. शेवटी मी स्वत:च उठलो. शर्ट नि पॅंट धुळीने माखलेली. ती झाडली. मग डोळे पुसले. तर दादोजींनी मलाच परत बसवलं सायकलवर. मग काय दात-ओठ-जीभ वगैरे सगळं खाऊन बसलो नि सायकल चालवत चालवत मैदानाच्या तोंडाशी नेली. मग दादोजी धावत आले आणि म्हणाले, "थांब. रस्त्यावरून मीच नेतो." मग मी चिडून त्याला म्हटलं, "मी आईला तुझं नाव सांगणार आहे बघ."

तर त्याने उजवा हात हवेत उडवून वगैरे म्हटलं, "सांग जा. आईला माहिती आहे माझं नाव. आम्ही नाही घाबरत तुला. तैमूरलंग कुठचा!"

मग तर मला अजूनच रडू आलं. मग शेवटी दादोजी नि मी डबलसीट घरी आलो. आज रविवार असूनपण घरी कुणीच नव्हतं. आई-बाबा दोघंही बाहेर. मग तर मला अजूनच रडू आलं. मग तसाच सोफ्यावर पडलो आणि जे झोपलो ते झोपलोच. मग रात्री आईने मला जवळ बोलावलं. मग औषध लावलं. मग मी आधी दादोजींबद्दल सांगितलं. तो किती दुष्ट आहे ते सगळं सविस्तर सांगितलं. तर आईने नुसतं 'हं' म्हटलं. मग ती म्हणाली, "हात-पाय दुखत असतील ना? ये मी तेल लावून देते."

मग मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसलो. एकदम थकल्यासारखं वाटत होतं. मग मी आईला म्हटलं, "आई, आज मी मोठा झालो. मला सायकल चालवता येते आता."

"हो बरं. पाहिलं मी आणि बाबांनी. एका ढ मुलाला जमली बुवा सायकल चालवायला."

"म्हणजे? तुम्ही कसं पाहिलंत?"

"म्हणजे तू पडलास ना तेव्हा आम्ही समोरच बसलो होतो, मैदानाच्या कठड्यावर. 'ढ' कुठचा!"

मी मनातल्या मनात १५१ वेळा तरी जीभ चावली असेल. मग आठवलं, मी रडताना समोरच निळी साडी नेसून होती ना ती आईच होती नि सफेद शर्ट घालून होते ना ते बाबा. ते हातसुद्धा दाखवत होते दोघे. आयला, आम्ही 'ढ'च १ नंबरचे. म्हणजे शंभर 'ढ' जर एकत्र आले ना, तर जो मोठ्ठा ढ बनेल ना तोच असणार मी. मग मी काहीच बोललो नाही. मग आपोआपच डोळा लागला. मग डोळ्यांसमोर सगळं येऊन उभं राहिलं. आई, बाबा, दादोजी, सायकल आणि त्यांच्याभोवती एक मोठ्ठा 'ढ'.

[http://www.manogat.com/diwali/2010/node/25.html इथेही आहे]

Sunday, August 28, 2011

शाळा

काल बरयाच दिवसांनी नव्हे महिन्यांनी नव्हे वर्षांनी शाळेपाशी गेलेलो. मोबाईलमधून फोटो काढला. एका दुसरया मजल्यावर उभ्या असलेल्या मुलाला डोळा मारला आणि चिडवून दाखवलं. म्हणून आठवण झाली या कवितेची आणि इतर खूप खूप गोष्टींची. एकदम नॉस्टॅल्जिक की काय म्हणतात तसं काहीतरी. कविता म्हणून चांगली नसेलही पण तरीही आमच्याकरता अतिशय खासच. तर असो. शाळा! शाळाच!!! एवढंच. इतकंच.

रडतच आलो येताना
अन निरोपही घेताना,
येताना निष्पर्ण होतो
बहरून गेलो जाताना.

शाळा म्हणजे नसते ईमारत
चुना-विटांचा खोल्यांची
शाळा असते दुसरी आई
लहान-मोठ्या सारयांची.

८वीतच ओळख झालेले
अनोळखीच चेहरे
तीन वर्षांतच वाटू लागले
आपलेच सगेसोयरे.

किती मोहक आपली
ही नाती असतात
रक्ताच्या नात्यांहूनही
जवळची भासतात.

मैत्री, सहजीवन सारे
इथेच तर अनुभवले
डबेच काय सुखदुखही
आपण वाटून घेतले.

इथेच तर रडलो होतो
मार्क कमी पडले म्हणुन,
दुसरयाच क्षणी हसलो होतो
"त्याने कुठे अडले" म्हणून !

त्या वक्तृत्वस्पर्धा अन
तो क्रिकेटचा खेळ
प्रयत्नपूर्वक पकडलेले
अन सोडलेले काही झेल.

येथेच खिडकीतुन पाहिली
झाडे-झुडुपे अन फुलेसुद्धा
समोरची दुकानं, घरे
इतकेच काय पण मुलीसुद्धा !

येथेच केल्या खोड्या नि
दिला शिक्षकांना त्रास
येथेच तर मारल्या थापा
नि दिल्या शिव्या तासन-तास !

कॅंटीनमधील समोसा,
इडली-सांबाराचा स्वाद
भांडणतंटे, कट्टीबट्टी
अन शिक्षकांशी केलेले वाद

तो तोडलेला बेंच अन
ते वाकवलेले पंखे,
शाळॆचीच तर आठवण
करुन देतात सारखे...

का शाळेमधील असतात या
काही वर्षांच्या भेटी
ती तर असतात सुह्रदांची
जन्मोजन्मींची नाती.

तरीही दडलेल्या असतात
याच भेटींच्या पोटी
नेमक्या ठरवलेल्या
'वक्तशीर' ताटातुटी !

(२००४)

Wednesday, August 24, 2011

The Queen By Pablo Neruda

या माणसाच्या अनेक कविता आवडतात, त्यातली ही एक. का आवडते माहीत नाही. पण आवडते. इतकंच!

The Queen

I have named you queen.
There are taller than you, taller.
There are purer than you, purer.
There are lovelier than you, lovelier.
But you are the queen.

When you go through the streets
No one recognizes you.
No one sees your crystal crown, no one looks
At the carpet of red gold
That you tread as you pass,
The nonexistent carpet.

And when you appear
All the rivers sound
In my body, bells
Shake the sky,
And a hymn fills the world.

Only you and I,
Only you and I, my love,
Listen to me.

By pablo Neruda.

Friday, August 19, 2011

ठणका


येता जाता उठता बसता लागे ठणका
कदाचीत शाबूत असावा अजून मणका

बनती फुटती रोज बुडबुडे गटारातुनी
उडेल केव्हा समुद्रातुनी इथल्या भडका

कशी राहती शांत माणसे इथे नेहमी
कुणालाच का बसला नाही तितका चटका

झिजून गेल्या सर्व पायर‌‍‌या पुराने तरी
गाभारयाला नाही बसल्या कधीच धडका

जरी कितीही वरवर वाढत गेली झाडे
मुळापासुनी कुठे होतसे त्यांची सुटका

आवडायची झाडे, पक्षी, लहान बाळे
आताइतका नव्हतो रे मी पूर्वी चिडका

तिला पाहिले ओझरते अन तेव्हापासुन
या शहराचा घेतलाय मी प्रचंड धसका

विसरून गेली असेलही ती मला कदाचित
किंचितसुद्धा लागत नाही हल्ली ठसका

चुकून पडला पाय शेपटावरी कधी अन
नशीब तोडी आयुष्याचा अजून लचका

(२६ एप्रिल, २०११)

Friday, August 12, 2011

२२ एप्रिल,१०

आज बालेवाडीच्या बसस्टॉपवर उभा होतो. सकाळचे ११.१५. एक म्हातारे
गृहस्थ आले. सोबत ८-९ वर्षांचा त्यांचा नातू. नि विचारू लागले, हडपसरला
इथून गाडी कधीये? म्हणून मग मी चौकशी केली तर १.२० ला होती. मी तसं
सांगितलं नि त्यांना म्हटलं की मनपाला असतात सारख्या गाड्या. तिथून
हडपसरला मिळेल लगेच गाडी. तर ते म्हणाले पैसे जास्त लागतात तसे. आणि
म्हणून ते त्या एवढ्याशा पोराला घेऊन २ तास थांबणार होते. विलक्षण आहे.
१० रुपयाऐवजी १३ रुपये होणार म्हणून ते २ तास थांबणार होते.
कोणत्या गोष्टीची किंमत किती हे परिस्थितीशिवाय कुणीच शिकवू शकत नाही.
याला नक्की काय म्हणावं? आपण किती लहान सहान गोष्टी नाही मिळाल्या तर
दु:खी होतो. पैसे खर्च करताना आपण इतका विचार करतो का? किंवा का करत नाही?
हे असं का? साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तर आणखी खोलात जावं का?
मी ढ आहे यात अजिबात शंका नाही.

Thursday, August 11, 2011

३ मार्च, २००९

आज विद्याविहार स्टेशनवरून पायरया उतरताना बाजूने चालणारया माणसाच्या पायावर पाय पडला. तो साधी कोल्हापुरी चप्पल घालून आणि माझे चांगले किलोभर वजनाचे स्पोर्टस् शूज. पाय पडल्या पडल्या लगेच एकदम कळवळला तो माणूस. मी 'सॉरी' बोलायला जाणार, त्या आधीच काही झालंच नसल्याप्रमाणे तो डाव्या बाजूने शांतपणे पुन्हा पायरया उतरू लागला. राग, चीड असलं काहीच नव्हतं त्याच्या चेहरयावर. आणि 'सॉरी' बोलताच नाही आलं. म्हणजे असं कोरडं 'सॉरी' बोलण्याला काही अर्थच नव्हता. मग कॉलेजला जाता जाता डोकं एकदम गच्च होऊन गेलं म्हणजे एखाद्या माणसात इतकी सहनशक्ती कुठून येते? मी त्याच्या जागी असतो तर असा वागलो असतो का? नकळत का होईना, पण एखादी तरी शिवी आलीच असती जीभेवर, आणि कदाचित तो इसम पुढे गेल्यावर दिलीसुद्धा असती. माझ्यात इतकी सहनशक्ती कधी येईल? किंवा कधीतरी येईल का?
बरं आता हे लिहिताना आणखी एक वाटतंय की, खरंच मी इतक्या घाईघाईने का चाललो होतो? कॉलेज सुरू व्हायला चांगला अर्धा तास तरी शिल्लक होता, मग मी असं धावत का होतो? की फक्त सवय झालीय म्हणूनच धावत होतो? धावताना काय तुडवलं जातं याचा विचार करायचाच नाही का? धावणं गरजेचं आहे का? असो. मरो. मरोच च्यायला.

Sunday, July 31, 2011

राजे

तोंड भरून कौतुकास्तव भेटले कित्येक जिवाभावाचे
ओळखी अनोळखी चेहरे भोवती पोरींचे थवे
विचारतात भलभलते कवितेचे नकोते माझे
आवडल्या कविता माझे हस्ताक्षर कुणाला काय द्यावे

एक चिमणी गोडी पोर नुसतीच हसत आली
आणि माझ्या हिन्दोळ्याला झोका देऊन गेली
"एकदा तिकडे पुण्याकडे जरूर जरूर जरूर या
(कविता नकोय ), राजे, फक्त तुमचे डोळे देऊन जा"

ना. धो. महानोर

Friday, July 29, 2011

कोलाज

खेळ धोकेबाज पूर्वीसारखे
आणखी अंदाज पूर्वीसारखे

त्रास होतो एवढा की भेटती
सारखे आवाज पूर्वीसारखे

भांडल्याने वाढते गं बोलणे
भांडु या का आज पूर्वीसारखे?

रागवू आता पुन्हा, भांडू पुन्हा
वागु या निर्व्याज पूर्वीसारखे

झोपु दे आता उपाशी एकदा
होवु दे नाराज पूर्वीसारखे

यातनांचे दे नवे तुकडे मला
रेखु दे कोलाज पूर्वीसारखे

(१ एप्रिल,२०११)

Friday, July 22, 2011

आठवणीतील गाणी १


हे गाणं मागे आई गुणगुणत बसलेली आणि मला म्हणाली की हे सापडतं का बघ कुठे. आणि पुढच्या मिनिटभरात गुगलवर सापडली ही कविता. गुगलचे अखिल मानवजातीवर अनंत उपकार आहेत. इंजिनियर म्हणून गुगलबद्दल आदर होताच, पण यानंतर तो आणखीनच वाढला.

कवी दत्त यांची सुमारे शतकापूर्वीची ही कविता. या नुसत्या एका कवितेनेच दत्तांच्या प्रेमात पडलो. ही संपूर्ण कविताच आवडते, पण त्यातही पहिलं कडवं जास्त. रोजच्या जीवनातल्या, सभोवताली दिसणारया उपमा इतक्या सहजपणे मांडणं हे सर्वात जास्त आवडलं. दत्तांचा एखादाही कवितासंग्रह सापडू नये हे मात्र खटकलं. कुणाकडे असल्यास जरूर कळवा.



बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा ||धृ||

रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ||
खडबड हे उंदिर करिती ।
कण शोधायाते फिरती ।
परी अंती निराश होती ।
लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।।१।।

बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
वाहतो फटींतून वारा ।
सुकवीतो अश्रूधारा ।
तुज नीज म्हण सुकुमारा ।
हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ।।२।।

जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
दारिद्य्र चोरिल कोण? ।
आकाशा पाडिल कोण? ।
दिग्वसना फाडिल कोण? ।
त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ।।३।।

तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
तरी सोडुं नको सत्याला ।
धन अक्षय तेच जिवाला ।
भावें मज दीनदयाळा ।
मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ।।४।।

Saturday, July 16, 2011

स्वाभाविक

सायंकाळी कधी पापणी थरथरणेही स्वाभाविक
वारा लागुन केव्हा डोळा चुरचुरणेही स्वाभाविक

कितीक वाटा, शहरे, गावे बदलत गेलो तरी पुन्हा
तुझा चेहरा सभोवताली भिरभिरणेही स्वाभाविक

किती निरागस होतो आपण वाट वेगळी होताना
वळून बघता मागे आता हुरहुरणेही स्वाभाविक

रात्ररात्रभर अता रेडिओ ऐकत बसतो कधी कधी
एखाद्या गाण्यात जरासे खरखरणेही स्वाभाविक

किती वेगळे त्यांचे साचे, किती वेगळा घडलो मी
मला पाहुनी सदैव त्यांचे गुरगुरणेही स्वाभाविक

दिवसरात्र तंद्रीत आपुल्या सतत उनाडत असतो मी
वाया गेला हे सर्वांचे कुरबुरणेही स्वाभाविक

कुणी भिकारी पोर मागते खरकटलेले ताट कधी
मेलेल्या हृदयाचें तेव्हा गहिवरणेही स्वाभाविक

................................शतानंद
(२३ मे,२०११)

Friday, July 15, 2011

संभाषण : एक गरज

अंतोन चेकॉव्हची 'मिझरी' (Misery ) नावाची एक गोष्ट वाचलेली. त्याचा नायक, अयोना पोतापाव्ह ( Iona poatapav ) हा एक गरीब टांगेवाला असतो. त्याचा मुलगा आदल्या दिवशी मरण पावलेला असतो. पण हातावर पोट चालत असल्याने त्याला धंदा चालू ठेवणं भाग असतं. मग टांग्यात बसलेल्या प्रत्येकाला तो आपल्या मुलाच्या निधनाबद्दल सांगायचा प्रयत्न करतो. पण जो तो स्वत:च्याच चिंता, दु:खं यात बुडून असतो. अयोनाचं दु:ख ऐकायला कोणाकडेच वेळ नसतो.शेवटी कुणीच आपल्या सोबत शोक व्यक्त करायला नाही हे पाहून अयोना आपल्या घोड्याला मुलाच्या मृत्युची हकीकत सांगू लागतो. कुठलाही निष्कर्ष न काढता इथेच कथा संपते. मागे नवनीत की कुठल्या तरी वहीच्या मागे हे वाचलेलं If animals could talk, the world would lose its best listeners. ते पटतं एकदम.

याउलट अशीच उद्धव शेळके यांची एक कथा वाचलेली. 'दु:ख' म्हणून. कथेचा नायक (नाव आता आठवत नाहीये म्हणून 'राम' म्हणतो) , राम हा एका हॉटेलात वेटरचं काम करत असतो. पण वेटर म्हणून काम करणं त्याला आवडत नसतं. दुसरी एखादी चांगली नोकरी शोधण्यासाठी तो धडपडत असतो. शेवटी एके दिवशी पोलीस भरतीच्या परीक्षेत तो पास होतो आणि त्याला तिथे नोकरी मिळणार असते. ही आनंदाची बातमी कधी कुणाला सांगतो असं त्याला होऊन जातं. मग हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या मालकाला सांगण्याच्या उद्देशाने म्हणून तो मालकाजवळ जातो, तर मालक खेकसून त्याला कामाला लागायला सांगतो. मग सोबत काम करणारयास सांगावं म्हणून प्रयत्न करतो तर त्यालाही वेळ नसतो. शेवटी रामची नेहमी विचारपूस करणारा एक गिर्हाईक हॉटेलमध्ये शिरतो तसा तो एकदम खुलून जातो. पण त्या माणसासोबत एक बाईसुद्धा असते. त्यामुळे आज तो काही न बोलता फक्त ऑर्डर देऊन मोकळा होतो. तो हॉटेलमध्ये असताना कधी एकदा आपली बातमी त्याला सांगतोय असं रामला होऊन जातं. शेवटी तो निघताना घालमेल अनावर होऊन राम त्याला सांगतो की त्याला पोलिसात नोकरी मिळाली म्हणून. तर तो इसम ओळखही न दाखवता निघून जातो आणि रामच्या डोळ्यात पाणी तरळतं.

पहिली कथा दु:ख कुणाला तरी सांगण्याबद्दलची तर दुसरी सुख सांगण्याबद्दलची. शेवट मात्र सारखाच. आपलं ऐकायला कुणीही नसणं याच्याइतकं एकटेपण किंवा सल दुसरा कुठलाच नसावा. मागे कुठेतरी ऐकलेलं, Girls always need a listener म्हणून. ते बदलून Everyone always needs a listener असं करावसं वाटतं. ज्यांना असं ऐकणारं कुणी मिळत नाही ते दुर्दैवी, आणि ज्यांना मिळतं ते खरे भाग्यवान. इतकी सारी सामाजिक जाळी विणणारी संकेतस्थळे, वैचारिक, सांस्कृतिक इ-कट्टे वगैरे यासाठीच नाही का?

मला माझाच पुण्यातील पहिला आठवडा आठवतो. संध्याकाळपासून इ.एस.आय.च्या खोलीत एकटा असायचो. त्यात भ्रमणध्वनी खराब. त्यामुळे वैतागून पहिल्याच दिवशी मी डायरीत लिहिलेलं, 'मला एका दिवसात कळून चुकलंय की मी मुळीच एकटा राहू शकत नाही.'आणि थॅंकफुली मला नंतर एकही दिवस एकट्याने राहावं लागलं नाही. संभाषण ही इतकी महत्वाची गरज आहे हे तेव्हा कळलं.

बाकी या निमित्ताने माझी बडबड सतत ऐकून घेणाऱ्या, माझी भिकारातली भिकार कवितासुद्धा शांतपणे ऐकून घेणाऱ्या, पाणचटाहून पाणचट पीजे सहन करणाऱ्या, फोनवर किंवा कट्ट्यावर तासनतास गप्पा मारणाऱ्या आणि गप्प गप्प राहिलो तर प्रसंगी शिव्या घालून मला बोलतं करणाऱ्या सर्व मित्रमंडळीना एकदा भयंकर धन्यवाद.

................................शतानंद
मन करा रे प्रसन्न / सर्व सिद्धीचे कारण /
मोक्ष अथवा बंधन / सुखसमाधान इच्छा //

अट्टाहास

तीन वर्षांपूर्वी ब्लॉगरावर खातं उघडलेलं. बी.इ.चा प्रोजेक्टच होता तो माझा म्हणून. म्हणजे ब्लॉग आज्ञावली बनवण्याचा.(आज्ञावली हा शब्द वी.जे.टी.आय.चे उपकार) तर नंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर मी आणि विक्रमने ब्लॉग लिहिण्यास सुरूवात करायचं ठरवलेलं, त्याने लिहिलं आणि मी आपल्या स्वभावास जागून काहीही लिहिलं नाही. तर हे स्वाभाविकच होतं. आज सकाळीच त्याचा ब्लॉग वाचत बसलेलो तर म्हटलं लिहावंच काहीतरी. म्हणून हे खरडणं.

मलाही थोडंफार कळतं हे सांगण्याचा अट्टाहास म्हणून.. म्हणूनच कदाचित.. हे लिहितोय. पण त्याहीपेक्षा जे काही थोडेफार, तोकडे का होईना, पण आलेले अनुभव ,हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकी वाचलेली पुस्तकं, भेटलेली-पाहिलेली-ओळखीची-अनोळखी माणसं, प्रसंग या साऱ्यातून जे शिकता आलं, जगता आलं त्यातून स्वाभाविकपणे जे सुचलं, उमटलं ते मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. प्रामाणिक!

जरूर भेट द्या.. ..ब्लॉगला! प्रतिक्रियांचे स्वागत आहे. (हे वाक्य त्याच्या ब्लॉगवरूनच copy-paste केलंय!) चांगल्या प्रतिक्रियांचे जास्त स्वागत आहे. कारण मला कौतुक करून घ्यायला प्रचंड आवडतं. तर हे फारच झालं! असो.

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!