Wednesday, December 13, 2017

सात सक्कं त्रेचाळीस --- it does matter even if it does not add up.

मी ८-९ वर्षांपूर्वी किरण नगरकरांची ३ पुस्तकं वाचलेली. पहिलं रावण आणि एडी, मग ककल्ड आणि मग  सात सक्कं त्रेचाळीस. ही order महत्त्वाची आहे. कारण सात सक्कं ने चालू केलं असतं तर कदाचित एवढं वाचलं नसतं. सात सक्कं वाचायला घेतलं तेव्हा सुरुवातीची काही पानं वाचायला काही दिवस घेतले होते. इतकं डोकं गरगरवून टाकणारं त्याआधी काही वाचलं नव्हतं. अर्थात ककल्ड कमालीची आवडली होती. म्हणून मग सात सक्कं सुद्धा पूर्ण केली होती. तेव्हा त्यातले तुकडे तुकडे आवडलेही होते. पण लक्षात राहिली नव्हती. पण गेल्या महिन्यात एका मित्राचा फोन आला की सात सक्कं वाचतोय, पण डोकं गरगरून गेलं वगैरे म्हणून. त्या निमित्ताने पुन्हा एकदा सात सक्कं वाचली. या वेळी मात्र सात सक्कं वाचणं हा अनुभव होता. अर्थात मधल्या काळात विलास सारंगांचा सात सक्कं वरील एक लेखसुद्धा वाचला होता. त्यामुळेही परत वाचताना किंचित बारकाईने वाचली असावी, किंवा आता तशी सवय झाली असावी.

तर मुद्दा हा की डोक्यात सणकून घुसावी तशी ही कादंबरी घुसत गेली. खरं तर ककल्ड ही प्रचंड आवडण्याचं मुख्य कारण होतं त्यात एकाच गोष्टीबद्दल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची आणि त्यातही या दोन्हीत सतत शिफ्ट करत राहण्याची त्यांची पद्धत. कित्येक प्रसंग नगरकर अक्षरश: डोळ्यांसमोर उभे करतात. सात सक्कं मध्ये मात्र हे नाही दिसत. उलट सात सक्कं मधील बरेच प्रसंग अमुक ठिकाणहून तोडून, मग अजून कुठेतरी असं सारखं सारखं होत राहातं. त्यातही पाठ्यपुस्तकाच्या उलट बऱ्याचदा कोण कोणास म्हणाले हे कुठेच दिलेलं नसल्यामुळे हे जंप आणि कट्स डोक्याच्या काही फूट वरून जातात. त्यामुळे सात सक्कं वाचताना डोकं गरगरणं स्वाभाविक आहे.

तर या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र म्हणजे कुशंक. त्याच्याभोवती मग त्याची प्रेमप्रकरणं, मित्र, शेजारी वगैरेची गुंफण. तीही फार ओबडधोबड. कुठेच अतिरंजित वर्णनं वगैरे न करता, भाषाशुचिता वगैरेची पर्वा न करता नगरकर लिहितात. उद्विग्नतेतून असंबंध लिहून तत्वज्ञान सांगण्याचा अतिबौद्धीक आविर्भाव यात कुठेच दिसत नाही. (मी हे लिहितोय त्यात असू शकेल कदाचित पण कादंबरीत नाही.) यात काही अनुभव वैयक्तिकही आहेत, तसेच्या तसे नसले तरी. हे स्वत: नगरकरांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलंय. त्यामुळे सुरुवातीला या कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत, वगैरे लिहिलेलं मला खटकलं. मजा म्हणजे या कादंबरीतच एका प्रसंगात प्राचिंती व कुशंकचं एक संभाषण आहे –

‘तू लिहितोस ना? कधीतरी बाहेर पडेलच. नाव बदलून. माझ्या प्रायव्हसीचा भंग न करता. ते तुला पैसेसुद्धा देणार नाहीत. Compulsive urge of expression किंवा communication म्हणून प्रकाशित करशीलच.’
अर्थात ते एक रीत म्हणून लिहिलं असावं कदाचित.

कुशंकची यात अनेक प्रेम प्रकरणं येत राहतात- आरोती, चंदनी, ‘तू’ इ. पण सर्वात जास्त स्पेशल यातली ‘तू’च आहे हे जाणवत राहतं. आधी वाचताना ‘तू’ हे सर्वनाम म्हणून वाटत राहातं, पण मग कळून येतं की ते विशेष नाम आहे. खूप खूप विशेष. पूर्ण पुस्तकात ‘तू’च्या नावाचा उल्लेख कुठेच सापडत नाही. आणि म्हणूनच कदाचित ‘तू’ हे पात्र खूप जास्त स्पेशल झालं असावं. कधी कधीतर हे पुस्तक ‘तू’ या एकाच व्यक्तीला उद्देशून लिहिलंय की काय असं वाटत राहातं. त्यातही विशेष करून ‘तू’च्या बाबतीत लिहितानाच desperation हे एक वेगळी पातळी गाठतं. उदा. कुशंक एके ठिकाणी म्हणतो की,

‘काय सांगू तुला मी की, तू मला नाही म्हणून अर्ध वर्षं होऊन गेलं तरी मला अजून शहाणपण आलेलं नाही? दीड-दोन वर्षापूर्वी जेव्हा तुझी पाळी चुकली म्हणून आपण दोघं घाबरलो तेव्हा तू खरोखरच गरोदर राहिली असतीस तर आज मी तुला एखादेवेळी गमावून पण बसलो नसतो ना.’

हे सगळं मला ८-९ वर्षापूर्वी कळण्याचा संबंधच नव्हता. म्हणजे त्यावेळी ब्लू फिल्म्स सोडल्या तर स्त्री-पुरुष संबंधाबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती म्हणूनही असेल. आता मात्र खूप सणकून कळतंय.  माझ्यासाठी जास्तीत जास्त desperation म्हणजे love in time of cholera मध्ये जसा नायक आपल्या प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर, म्हातारपणी जेव्हा तिचा नवरा मरतो, तेव्हा पुन्हा तिला जाऊन भेटतो वगैरे असलं काही तरी स्वप्नाळूपण होतं. किंवा कदाचित अजूनही आहे. पण नगरकर मात्र फार सहजपणे त्या पलीकडे जातात. आणि हे सगळं १९६७ ते १९७४ च्या दरम्यान लिहिलं होतं त्यांनी हे विशेष. इतकं सगळं असूनही कुशंकची कीव वगैरे येत नाही हे महत्वाचं. आपली काही तरी फार इनक्युअरेबल अशी दु:खं असावीत, आणि मग आपल्याला आवडणाऱ्या, एखाद्या जवळच्या, शक्यतो विरुद्ध लिंगी, अशा व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं वगैरे असल्या कल्पना कुशंकला स्पर्शसुद्धा करत नाहीत. 

अर्थात फक्त प्रेमप्रकरणातून दुखावला गेलेला एवढाच कुशंक असता तर हे पुस्तक फार कंटाळवाणं झालं असतं. पण सामाजिक परिस्थिती, देव, धर्म, इत्यादी अनेक गोष्टीवरील कुशंकचे monologues हे निव्वळ अप्रतिम आहेत. आणि खास नगरकरांच्या शैलीतील black humour ठिकठीकाणी यात पेरलेला सापडतो. सात सक्कं मधील स्त्रिया यासुद्धा काळाच्या फार फार पुढच्या अशाच म्हणाव्या लागतील.
     
अजून एक पुस्तक वाचताना जाणवलेली गोष्ट म्हणजे alienation. जगापासून तुटून पडलेला, outsider म्हणून जगत असलेला असा कुशंक. नगरकरांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तारुण्यातलं आयुष्य याबद्दल जेवढं वाचलं, त्यातून लक्षात आलं की हा माणूस पण outsider म्हणून जगला असणार. हे alienation माझ्या मते थोड्या फार प्रमाणात सगळ्यांच्याच वाट्याला येत असतं. कुशंकसारख्याच्या वाट्याला जरा जास्तच. (मी नुकतंच amazon primeवर mr robot पहिल्याने हा alienationचा मुद्दा सुचला असावा) पण महत्वाच हे आहे की तरी सुद्धा एके ठिकाणी human bondage अटळ असं कुशंक म्हणतो.

‘क्या फर्क पडता है’ या ‘तू’च्या तोंडी वारंवार येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मुखपृष्ठावर ठळकपणे दिसतं – फर्क पडता है म्हणून. हा कुशंकचा दृष्टीकोन नक्कीच आशादायी आहे. स्वत:हून किंवा भोवतालच्या जगामुळे  ओढवलेलं कमालीचं दु:खं, टोकाची निराशा या सगळ्यापलीकडे किंवा कदाचित या सगळ्यासकट कुशंक जगत राहतो, अनुभवत राहतो. भोंगळ आशावाद, लैंगिक किंवा इतर गोष्टींमध्ये असणारा दुटप्पीपणा हे सगळं नाकारत, वास्तव स्वीकारून तो जगत राहतो हे विशेष. 

बाकी या पुस्तकासंबंधी बऱ्याच समीक्षा वगैरे लिहिल्या गेल्याचं प्रस्तावनेत वाचलं. प.पू. कुमार केतकर यांनी या पुस्तकाला शब्द मैथुन असे म्हटले. इतरही बऱ्याच जणांनी कठोर टीका केली. या कादंबरीची पहिली आवृत्ती संपायला सुमारे २० वर्षे गेली. एकूण या कादंबरीला बऱ्यापैकी वाळीत टाकण्यात आलं. अर्थात त्यावरील बऱ्यापैकी चर्चा प्रस्तावनेत सापडेलच. फक्त मला हा प्रकार दुर्दैवी वाटतो इतकंच. 
मी यूट्यूबवर त्यांची साधारण ३-४ वर्षापूर्वीची एक मुलाखत पहिली होती. त्या मुलाखतीत बोलताना त्यांनी, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती मी पाहिलीये, असं म्हणून पुढे काही बोलण्याचं टाळलं होतं. इतकी जागतिक कीर्ती मिळवल्यावर, इतक्या वर्षांनीही या माणसाला हे जाणवतं, यावरून त्यांनी ही कादंबरी कुठल्या मन:स्थितीत लिहिली असावी याचा थोडा फार अंदाज येतो. कदाचित त्यामुळेच अधूनमधून कुशंकची कमालीची अस्वस्थ करून जाणारी स्वगतं येत राहतात. हा पार्ट मला तरी बेस्ट वाटला. अर्थात कोणाचाही दृष्टीकोन, मतं ही जर स्वानुभवातून, जगण्यातून, परिस्थितीतून घडत असतील तर ती चुकीची नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. ती एखाद्याला पटतात की नाही हा भाग वेगळा. म्हणूनच कदाचित हा अस्वस्थ करून जाणारा भाग मला निराशावादी सुद्धा वाटला नसावा. 
किंवा खरं तर टोकाचा दुखावलेपणा सांगणारी पुस्तकं, गोष्टी, माणसं मला आवडत असावीत. तसंही काफ्काने लिहून ठेवलंय –
“I think we ought to read only the kind of books that wound or stab us. If the book we're reading doesn't wake us up with a blow to the head, what are we reading for? So that it will make us happy, as you write? Good Lord, we would be happy precisely if we had no books, and the kind of books that make us happy are the kind we could write ourselves if we had to. But we need books that affect us like a disaster, that grieve us deeply, like the death of someone we loved more than ourselves, like being banished into forests far from everyone, like a suicide. A book must be the axe for the frozen sea within us. That is my belief.” 


तर सात सक्कं हेही अश्याच एका पुस्तकांपैकी एक. बाकी पुस्तकाबद्दल बरंच बोलता-लिहिता येईल. मी नगरकरांच्या प्रचंड प्रेमात असल्याने, जसं प्रेमात पडलं की एखाद्या व्यक्तीचं सगळंच स्पेशल वाटत राहतं, तसं मला सर्वच पुस्तक, त्यातले प्रसंग, संवाद, monologues सगळंच फार स्पेशल वाटतंय सध्या. Catcher in the rye मध्ये एक वाक्य आहे 
"What really knocks me out is a book that, when you're all done reading it, you wish the author that wrote it was a terrific friend of yours and you could call him up on the phone whenever you felt like it. That doesn't happen much, though."
मला सात सक्कं वाचल्यावर अगदी असंच वाटत राहिलं जवळ जवळ आठवडाभर. तर मुद्दा हा की सात सक्कं खूप आवडलेल्या गोष्टींच्या(फक्त पुस्तकांच्या नाही) यादीत भरून ठेवलेलं आहे. सात सक्कंच्या एका इंग्रजी रीव्ह्यूमध्ये लिहिलं होतं की Nothing in this Kiran Nagarkar’s book adds up म्हणून. ते बदलून It does matter even if it doesn’t add up असं करावसं वाटतं.

2 comments:

Asita Ajgaonkar said...

मला परत वाचवस वाटतंय

शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर said...

तुम्ही लिहिलेलं अप्रतिम आहे. धन्यवाद.

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!