Saturday, July 25, 2015

काहिच नाही कमी परंतू...

छान चालले असते सगळे
झालो असतो स्थिरस्थावरही
दिनक्रमही ठरलेला असतो
ठरले असते सगळे काही
सगळ्यानंतर...

आठवड्याला एक सिनेमा,
नाटकही एखादे बघतो
हसतो, रडतो, फिरतो, गातो
मस्त रहातो, मजेत जगतो-
तसे निरंतर...

तरी एकट्या सायंकाळी
खिडकीपाशी निवांत बसता
पापण्यांत चुरचुरते किंचित
रेडीओवरी ऐकत असता
बेगम अख्तर...


खिडकीमधली तुळसही तेव्हा
उदासवाणी, मलूल दिसते
काहिच नाही कमी परंतू
सगळे सगळे सगळे असते
तू असतिस तर...  

२०१५

Wednesday, August 27, 2014

आठवण

मारुतीच्या शेपटीसारखी..

वेटोळे घालून बसलेली..
.
.
.
.
तुझी आठवण !
================================

अश्वत्थामा

तुझ्यात अरण्य | मला सापडावे |
माझे मीच व्हावे | अश्वत्थामा ||

फिरताना आणि | होता तुझी भेट |
हृदयात थेट | जावी कळ ||
================================

Friday, February 21, 2014

आठवण

पडलो होतो अलगद मीही
मांडीवरती डोके ठेवुन
तीही बसली होती माझ्या
केसांमध्ये नखे गुंतवुन

वाळूमध्ये गिरवित बोटे
काय काय ती होती सांगत
मीही आणी मिटून डोळे
बसलो ऐकत अनोळख्यागत

मिटता डोळे पडद्यावरती
तयार झाला जुना चेहरा
खोल टपोरे डोळे त्यांच्या-
रंग तळाशी गहिरा गहिरा..

गहि
ऱ्या गहिऱ्या पडद्यावरती
लख्ख आणखी तीच आठवण
हातामधला हात निसटता-
जपता जपता अपुले मीपण..

उठून बसलो त्याच क्षणाला
थोडा खोकत, दाबत छाती
गळ्यात भरला हात चाचपुन
घट्ट ठेवला धरून हाती...!

२१ फेब्रुवारी,२०१४.

Friday, November 29, 2013

निरोप


तू डोके मांडीवरती
ठेवून दीर्घ बिलगावे
अन् खोल अंतराळात
ध्रुवाचे तुकडे व्हावे

तुकड्यांना जमवित असता
बुबुळांत शिरावी नीज
अडकावा चंद्र गळ्याशी
हृदयात भरावी वीज

वीजेने तुटला थेंब
पसरावा फरशीवरती
मेंदीभरल्या बोटांनी
रोखावी नकळत भरती

भरतीच्या वेळी तूही
लाटांचा घेत निरोप
दारातिल उचलुन न्यावे
तुळशीचे हिरवे रोप...

२७, ऑक्टोबर २०१३

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!