Tuesday, July 24, 2012

हल्ली...

...हल्ली वाचणं बंद करायचं ठरवलय... पुस्तकं विरंगुळा म्हणून ठीक असतात – इलाज म्हणून नाही. होय, तसं म्हटलं तर इलाज नसतोच कशाला... तुम्ही पृथ्वीवर आहात यालाच इलाज नाही. येस, You are on earth, there is no cure for that. मी आता जे काही करतो ते नाईलाज म्हणूनच... लवकर उठतो – नाईलाज. घराबाहेर पडतो – नाईलाज. कॉलेजला जातो – नाईलाज. घरी येतो – नाईलाज. सिगरेट ओढतो – नाईलाज. वाचत बसतो – नाईलाज. गाणी ऐकतो – नाईलाज. खातो पितो – नाईलाज. हसतो बोलतो – नाईलाज. शिव्या देतो – नाईलाज. कुठलीही गोष्ट नाईलाज म्हणून करण्याची, स्वीकारत जाण्याची सवय होत चाललीये हल्ली...

...हल्ली कंटाळा येतो आणि तो घालवायचा उपायच सापडत नाही. पूर्वी कंटाळा आला की तुला एखादा एसेमेस टाकायचो. मग त्यावर तुझा मोहक रीप्लाय – कधी मस्त लांबलचक तर कधी फक्त एखादं उदगारवाचक चिन्ह. Inboxमध्ये तुझं फक्त नाव दिसलं तरी कंटाळा पळून जायचा. मग अगदी हायपर कंटाळवाण्या विषयावरच्या गप्पापण मस्त वाटायच्या. आतून आतून एकदम प्रसन्न वाटत राहायचं. त्या एका एसेमेसने एकटेपणा सुसह्य व्हायचा. आता इतके सगळे लोक सोबत असतात आणि तरी मी कानाला हेडफोन्स लावून मेहदी हसन ऐकतोय नि त्याचासुद्धा कंटाळा आलाय. मला नक्की कशाचा कंटाळा आलाय तेच कळत नाही हल्ली...

...हल्ली उगाच येता जाता टोचून बोलणाऱ्या, उपदेश करणाऱ्या माणसांची कमालीची चीड येऊ लागलीये. या सर्वांना एकदा सांगायला हवं की बाबांनो If you must hit me, hit me with an axe! होय च्यायला! आजकाल शब्दांचा कंटाळा आलाय, आणि हे सांगायला पण साले शब्दच वापरावे लागतायेत. आणि साले हे शब्द कधी एकटे नसतात, त्यांना चिकटलेले असतात फारच अर्थ. नेमक्या कुठल्या ठिकाणी चिमटा काढला की एखाद्याला दुखतं हे काही माणसाना चांगलंच कळतं. मला अशा माणसांचा कंटाळा येऊ लागलाय, नव्हे चीड येऊ लागलीये. आणि तरीही मी चिडत नसल्याचं दाखवतो. माझ्यामते याचीच चिडचीड होतेय हल्ली...

...हल्ली रेडिओवर कसली उदास, भिकार, भंगार गाणी ऐकावी लागतात. काय तर म्हणे There’s something left in my head वगैरे. आयचा घो! इंग्लिश गाणी कळत नाहीत म्हणून ती ऐकायला चालू केली तर ती पण कळू लागलीयेत हल्ली. आयपॉड बिघडल्यापासून लोचा झालाय च्यायला. नको नको ते कानावर पडतं. तरी हिंदी गाण्यांपेक्षा ही बरीच. नाहीतर ते रफी, किशोर, तलत, मुकेश वगैरे भोसडीचे तर जिवावर उठतात च्यायला. त्यापेक्षा मराठी गाणी बरी... रुतत तरी नाहीत फार आत. माझ्यामते सगळ्याचा प्रॉब्लेम एकच – कळायला नाही पाहिजे काहीच. अज्ञानात सुख असतं असं बोलतात ते उगीच नाही... मी instrumentals ऐकायला चालू केलंय हल्ली...

...हल्ली चुत्यासारखा रोज temperature चेक करतो, पण साली ती नळी नॉर्मलच दाखवते. कधी वाटतं पाऱ्याने आपला गुणधर्म बदलला की काय? साला temperature नॉर्मल असून पण संध्याकाळची थंडी का वाजत राहते? काहीच झालेलं नाही मग जीभेची चव का गेलीये? ताप आलेला असला तर डॉक्टरकडे तरी जाता येतं. पण आता तर तेही ऑप्शन नाहीये. ऑप्शन. पर्याय. अ-ब-क-ड-इत्यादी. च्यायला ऑप्शन शोधलाच नाही कधी. ऑप्शन होता का? विचारच नाही केला कधी. मी एक नवीन शोध लावलाय – अजिबात विचार केला नाही की temperature, blood pressure सगळं नॉर्मल राहतं. माझं सगळं अॅबनॉर्मलच असतं हल्ली...

...हल्ली मी फारच पथेटीक लिहितोय/ वागतोय/ जगतोय किंवा मरतोय पण म्हणता येईल. जी. एं.ची गोष्ट वाचलेली मागे – ‘प्रवासी’ म्हणून. त्यातला शिकारी म्हणतो – ‘मी सगळं माणसांचं जग गृहीत धरलं, त्यावर निष्कर्ष बसवले, त्यातून तत्त्वज्ञान निर्माण केलं. पण विश्वात मानव हा काही एकटाच जीव नाही हे मला सुचलं नाही...’ तसंच माझं झालंय. मी फक्त तू सोबत असतानाचं जग गृहीत धरलेलं, तू नसतानाचं नाही. म्हणूनच हे असं पथेटीक लिहितोय/ वागतोय/ जगतोय किंवा मरतोय.. आता कोणी यावर फैज ऐकवून दाखवेलही – दुख और भी है जमाने में मुहब्बत के सिवा वगैरे वगैरे – त्यांना ती दुःखं लखलाभ. तत्वज्ञान सांगायला सगळेच पुढे पुढे असतात. खारटशौकीन साले. मला तर घराबाहेर पाउलही नाही ठेववत हल्ली...

...‘हल्ली’ या शब्दाने सुरु होणारी सगळी वाक्यं, परिच्छेद, लेख, निबंध इ. कमालीचे उदास, भकास, निराशाजनक, कुबट वगैरेच कशी होतात हनुमानच जाणो. हल्ली नोकऱ्या मिळणं कठीण झालंय, हल्लीची पिढी म्हणजे इत्यादी इत्यादी. असो पण. उगाच शब्दाला का दोष द्या. शब्द तर नुसते शब्दच असतात. पण तरी एकदा का त्यात वेळ, जागा, माणसं, प्रसंग मिसळले की जे कॉकटेल तयार होतं ते घशाखाली नाही उतरत हे मात्र खरं. वा वा, काय पण लिहिलंय, कॉकटेल वगैरे. च्यायचा.. कालच कॉकटेल पाहिला म्हणून हे सुचलं, दुसरं काय? बाकी या हिंदी चित्रपटातले हिरो कसले लकी असतात भडवे.. नाहीतर आपण. जाऊ देत च्यायला, आता जरा जास्तच कुबट, नासकं, कुजकं होत चाललंय हे. उगाच साला नाकात वास. मळमळ – वळवळ - जळजळ. उलटी – बिलटी – गिलटी. फार सहन नाही होत हल्ली...

6 comments:

विक्रम वालावलकर. said...

hmmmmm...ही कशाची तरी चाहूल आहे.....
असं सर्व वाटतंय म्हणजे नक्कीच...........!!!

शतानंद said...

अगदीच कसली तरी चाहूल नसली म्हणजे मिळवलं...

विक्रम वालावलकर. said...

. मळमळ – वळवळ - जळजळ. उलटी – बिलटी – गिलटी. फार सहन नाही होत हल्ली...
.
अरे मग घे ना धौती योग!

Unknown said...

मानसोपचार करवून घे..नाहीतर विपश्यनेला तरी जा...तशी मलाही त्याची गरज आहेच...शब्दांची पण च्यायला सायकलच आहे रे.

Asita Ajgaonkar said...

Haha....mala geli kityek warshi asach watat...tehi koni ayushyat un nighun wagaire gela nasatana

Asita Ajgaonkar said...

Haha....mala geli kityek warshi asach watat...tehi koni ayushyat un nighun wagaire gela nasatana

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!