Friday, July 22, 2011

आठवणीतील गाणी १


हे गाणं मागे आई गुणगुणत बसलेली आणि मला म्हणाली की हे सापडतं का बघ कुठे. आणि पुढच्या मिनिटभरात गुगलवर सापडली ही कविता. गुगलचे अखिल मानवजातीवर अनंत उपकार आहेत. इंजिनियर म्हणून गुगलबद्दल आदर होताच, पण यानंतर तो आणखीनच वाढला.

कवी दत्त यांची सुमारे शतकापूर्वीची ही कविता. या नुसत्या एका कवितेनेच दत्तांच्या प्रेमात पडलो. ही संपूर्ण कविताच आवडते, पण त्यातही पहिलं कडवं जास्त. रोजच्या जीवनातल्या, सभोवताली दिसणारया उपमा इतक्या सहजपणे मांडणं हे सर्वात जास्त आवडलं. दत्तांचा एखादाही कवितासंग्रह सापडू नये हे मात्र खटकलं. कुणाकडे असल्यास जरूर कळवा.



बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा ||धृ||

रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ||
खडबड हे उंदिर करिती ।
कण शोधायाते फिरती ।
परी अंती निराश होती ।
लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।।१।।

बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
वाहतो फटींतून वारा ।
सुकवीतो अश्रूधारा ।
तुज नीज म्हण सुकुमारा ।
हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ।।२।।

जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
दारिद्य्र चोरिल कोण? ।
आकाशा पाडिल कोण? ।
दिग्वसना फाडिल कोण? ।
त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ।।३।।

तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
तरी सोडुं नको सत्याला ।
धन अक्षय तेच जिवाला ।
भावें मज दीनदयाळा ।
मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ।।४।।

2 comments:

विक्रम वालावलकर. said...

खरंच, गुगलचे अनंत उपकार आहेत.
या कवितेतले पहिले कडवे मलाही माझी आजी म्हणत असल्याचे स्मरण आहे. नवे तंत्रज्ञान जुन्या ठेव्याचे जतन करत असेल तर ती नक्कीच आनंदाची अन् सुदैवाची गोष्ट आहे. पण यामुळे पाठांतर कमी होईल की काय अशी भीती वाटते.
असो.
असा संग्रह इथेही हळूहळू वाढवत नेता येईल. आणि पुढे मग कोणीतरी म्हणेल..."स्वाभाविक" चे मानवजातीवर अनंत उपकार आहेत!

Unknown said...

फारच अप्रतिम, जीवनाच सार! गरीबीची कथा, व्यथा कवी दत्तानी मांडली आहे.

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!