Saturday, July 16, 2011

स्वाभाविक

सायंकाळी कधी पापणी थरथरणेही स्वाभाविक
वारा लागुन केव्हा डोळा चुरचुरणेही स्वाभाविक

कितीक वाटा, शहरे, गावे बदलत गेलो तरी पुन्हा
तुझा चेहरा सभोवताली भिरभिरणेही स्वाभाविक

किती निरागस होतो आपण वाट वेगळी होताना
वळून बघता मागे आता हुरहुरणेही स्वाभाविक

रात्ररात्रभर अता रेडिओ ऐकत बसतो कधी कधी
एखाद्या गाण्यात जरासे खरखरणेही स्वाभाविक

किती वेगळे त्यांचे साचे, किती वेगळा घडलो मी
मला पाहुनी सदैव त्यांचे गुरगुरणेही स्वाभाविक

दिवसरात्र तंद्रीत आपुल्या सतत उनाडत असतो मी
वाया गेला हे सर्वांचे कुरबुरणेही स्वाभाविक

कुणी भिकारी पोर मागते खरकटलेले ताट कधी
मेलेल्या हृदयाचें तेव्हा गहिवरणेही स्वाभाविक

................................शतानंद
(२३ मे,२०११)

1 comments:

विक्रम वालावलकर. said...

नेहेमीसारखीच मेलेल्या हृदयाला स्पर्शून, हलवून जाणारी कविता केली आहेस. अर्थात तुझ्याकडून ते 'स्वाभाविक'च अपेक्षित आहे म्हणा!

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!